जागतिक आरोग्य युद्धभूमीवर पेटलेल्या करोना विरुद्ध ड्रॅगन महायुद्धाची झळ बसू लागल्याने अनेक देश चिंताग्रस्त आहेत. काही देशांनी आपापल्या नागरिकांना चीनमधून हलवले. काहींनी चिनी नागरिकांसाठी आपली देशद्वारे बंद केली आहेत, तर काहींनी चीनवाऱ्यांवर प्रतिबंध घातले आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेलाही करोनासंसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. ‘अॅपल’सारख्या मोठमोठय़ा कंपन्यांनी चीनमधील आपली कार्यालये आणि दुकाने बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत करोनासंसर्गाच्या संकटाकडे काही जागतिक प्रसिद्धी माध्यमे कोणत्या भिंगातून पाहतात?
या युद्धात सध्या तरी करोना विषाणूची सरशी होत आहे आणि ड्रॅगन त्याच्याविरुद्ध लढताना दररोज मृतांचे आकडे जाहीर करीत आहे. त्यांतील वाढ चिंताजनक असली, तरी मृतांचा खरा आकडा आणि सरकारी आकडा यांत जमीन-अस्मानाचे अंतर असू शकते, अशी चर्चा जगभर आहे. ती सुरू असतानाच गेल्या आठवडय़ात मृतांच्या संख्येबद्दलच्या एका आकडय़ाने मात्र काही वेळ का होईना, धरणीकंप घडवला. तो आकडा होता २४,५८९!
ज्या दिवशी चीन सरकारने मृतांची संख्या ३०४ झाल्याचे जाहीर केले, त्याच दिवशी चीनमधील ‘टेन्सेंट’ या माहिती-तंत्रज्ञान कंपनीने बळींच्या संख्येचा हा महास्फोट घडवला. हा आकडा सरकारी आकडेवारीपेक्षा ८० पट. ‘टेन्सेंट’च्या ‘एपिडेमिक सिच्युएशन ट्रॅकर’ या संकेतस्थळपृष्ठावर (वेबपेज) हा आकडेस्फोट झाल्यावर नेटकरांनी त्याचे ‘स्क्रीन शॉट्स’ समाजमाध्यमांवर प्रसारित करून त्याची तीव्रता सर्वव्यापी केली. चीनमधली कम्युनिस्ट राजवट, तेथील कमालीची गुप्तता वा लपवाछपवी, अभिव्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी यांमुळे या आकडय़ाला महत्त्व.
चीन आणि तैवान यांच्यातले विळ्या-भोपळ्याचे सख्य लक्षात घेतले, तर ‘तैवान न्यूज’ने केलेल्या टिप्पणीचा अर्थ स्पष्ट होतो. मृतांचा खराखुरा आकडा ‘टेन्सेंट’ने अपघातानेच फोडल्याचे भाष्य करून मृतांची आणि रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असताना मृत्युदर मात्र स्थिर असल्याच्या विसंगतीवर ‘तैवान न्यूज’ने बोट ठेवले आहे. (‘टेन्सेंट’ने ते संकेतस्थळपृष्ठ मागे घेऊन नंतर सरकारी आकडेवारी जाहीर केली.) अनेक रुग्ण उपचारांअभावी रुग्णालयाबाहेरच प्राण सोडत असल्याचा गौप्यस्फोटही वुहानमधील सूत्रांच्या हवाल्याने या वर्तमानपत्राने केला. ‘सीएनएन’नेही ‘टेन्सेंट’च्या आकडेवारीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ही आकडेवारी चुकून प्रसिद्ध झाली असली, तरी असे होणे गंभीर असल्याचे म्हटले आहे. ‘सीएनएन’बरोबर ‘द सन’नेही ‘तैवान न्यूज’चा हवाला देणारे वृत्तांत प्रसिद्ध केले आहेत.
करोनासंसर्गाच्या निमित्ताने चीन आणि तैवानमध्ये राजकारणही रंगले आहे. त्यातील रंग उलगडून दाखणारा ‘पॉलिटिक्स ऑफ करोना व्हायरस’ हा लेख ‘अल् जझिरा’ने संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. चीन ज्याच्यावर आपला हक्क सांगतो ते तैवान हे लोकशाहीवादी बेट करोना संकटातही राजकीय आव्हानांचा सामना करत आहे, असा या लेखाचा सारांश. तैवान आणि चीनमधील करोनाग्रस्तांची आकडेवारी जाहीर करताना जागतिक आरोग्य संघटनेचीही कशी कोंडी होतेय, यावरही त्यात भाष्य आहे.
आणीबाणीच्या परिस्थितीत तैवानची कोंडी करून राजकारण शिजवण्याच्या चीनच्या वृत्तीवर ‘दी डिप्लोमॅट’मधील लेखातही कोरडे ओढले आहेत. करोनाशी लढताना तैवानला चीनने निर्माण केलेल्या अडथळ्यांशीही दोन हात करावे लागत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेत तैवानला स्थान देण्याची आंतरराष्ट्रीय मागणी आहे, परंतु करोनाची माहिती अद्ययावत करण्याबाबतही त्या देशास प्रतिबंध आहे. अन्य देशांप्रमाणे आपल्या नागरिकांना वुहानमधून आणण्यासाठीही तैवानला संघर्ष करावा लागत असल्याचे वास्तवही या लेखात अधोरेखित केले आहे.
रशियन वृत्तवाहिन्यांना मात्र ‘फेकन्यूज’ची बाधा झाली आहे. करोनाचा फैलाव हा अमेरिकेचा कट असल्याचा प्रचार रशियन वृत्तवाहिन्यांवर कसा सुरू आहे, त्याचा वृत्तान्त ‘बीबीसी’ने प्रसिद्ध केला आहे. काही वृत्तवाहिन्यांच्या प्राइम टाइम वृत्तांमध्ये चुकीच्या माहितीवर आधारित खास वार्तापत्रे प्रसारित केली जात आहेत. त्यात ‘टीव्ही नेटवर्क्स’, ‘चॅनल वन’ आघाडीवर आहेत, असे ‘बीबीसी’ने म्हटले आहे. करोना विषाणू हे अमेरिकी गुप्तचर संस्थांनी निर्माण केलेले जैविक अस्त्र असून त्याचा संसर्ग फक्त आशियाई लोकांनाच होतो, अशा जावईशोधावर आधारित माहिती रशियन माध्यमे पसरवत असल्याचेही हा वृत्तान्त म्हणतो.
करोनामुळे अनेक देशांत चीनविरोधी भावना वाढीस लागल्याची दखल ‘हारेत्झ’ या इस्राएली वर्तमानपत्राने घेतली आहे. दक्षिण कोरिया, जपान, व्हिएतनाममधील हॉटेलांनी चिनी ग्राहकांसाठी दरवाजे बंद केले आहेत. फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंडमधील वर्तमानपत्रांनी चीनद्वेषी भूमिका घेतल्याचे त्यात नमूद केले आहे. सीडनीच्या ‘द डेली टेलिग्राफ’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीच्या मथळ्याचे शब्द होते : ‘चायना किड्स स्टे होम’!
संकलन : सिद्धार्थ ताराबाई