‘सत्यकथा’ म्हटलं की श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांचीच नावं आठवतात. पटवर्धन तसे ‘सत्यकथा’चे संपादक सहा-सात र्वषच होते. पण मौजेत त्यांनी जवळपास चाळीस वर्षे काम केले. ‘सत्यकथा’ बंद पडल्यावर पाचेक वर्षांनी म्हणजे १९८७मध्ये ते मौजेतून निवृत्त झाले होते. तेव्हापासून पटवर्धन हे जवळपास अज्ञातवासात असल्यासारखेच होते.  त्यामुळे त्यांच्याशी बोलून त्यांचा काळ, संपादकीय दृष्टिकोन जाणून घ्यावा या हेतूने काही महिन्यांपूर्वी त्यांच्याशी चार-पाच तास निवांत गप्पा मारल्या. त्यातून पटवर्धन यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही नवे कंगारे उलगडले.
पटवर्धन शिवाजी पार्कच्या शाळेत शिकले. तिथे त्यांना शिकवायला साक्षात पु. ल. देशपांडे होते. ते पटवर्धन यांना इंग्रजी शिकवत. या शाळेत पटवर्धन यांच्या दोन वर्ग पुढे बाळासाहेब ठाकरे होते. त्यावेळी पटवर्धन काहीबाही लिहीत होते. एकदा त्यांनी मॅझर्ड झिलावू या पोलिश लेखकाच्या एका लेखाचा अनुवाद केला आणि पु.लं.ना दाखवला. ते म्हणाले, ‘हे उद्या मला एका स्वतंत्र कागदावर सुवाच्य अक्षरात लिहून दे.’ तो अनुवाद पु.लं.नी त्याकाळी प्रचंड दबदबा असलेल्या ‘अभिरुची’मध्ये छापून आणला. साल होतं १९४६. पण त्यानंतर काही पटवर्धन यांनी अनुवाद केले नाहीत. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर ‘नाना तऱ्हा’ झाल्या. त्यात अनुवाद प्रकरण मागे पडत गेलं. हे आपलं काम नाही असं त्यांनी ठरवून टाकलं.
‘योगायोग’ या शब्दाला पटवर्धन यांच्या आयुष्यात बरंच स्थान आहे. कारण ते ‘सत्यकथे’त आले तेही योगायोगानेच. श्रीपु तेव्हा रुइया कॉलेजमध्ये शिकवत होते. पटवर्धन त्यांचेच विद्यार्थी. ‘मौज’चे तत्कालीन संपादक ग. रा. कामत हे चित्रपटसृष्टीत नशीब आजमावयाला चालले होते. त्यामुळे श्रीपुंनी पटवर्धन यांना मौजमध्ये यायची ऑफर दिली. मौजसारख्या संस्थेत काम करण्याची संधी मिळतेय तर का सोडा, असा विचार करून पटवर्धन तयार झाले. आधी मौज साप्ताहिकात रुजू झाले. (तसे तर ते आधीपासूनच रुजू होते म्हणा!) सत्यकथा ही विशिष्ट लेखकांचीच मक्तेदारी होती आणि तिचं स्वरूप सदाशिवपेठी होतं, या आरोपात कितपत तथ्य आहे, असं विचारल्यावर पटवर्धन म्हणाले की, ‘फारसं नाही.’ पटवर्धन यांनी सुर्वे, ढसाळ, दि. के. बेडेकर अशा अनेक लेखकांना मौजेतून लिहितं केलं. तरीही काही लेखक आमच्याकडून सुटले हे त्यांना मान्य होतं. ‘कुठलंही मासिक हे सर्व साहित्याला सामावून घेऊच शकत नाही. त्यामुळे उगाच भलत्या गमजा मारू नयेत,’ असा पटवर्धनांचा स्वत:वर शेरा मारला!
मौज हा तत्कालीन लेखक-चित्रकार-नाटककार अशा सांस्कृतिक क्षेत्रातल्या प्रस्थापित आणि नवोदितांचा गप्पांचा अड्डा होता. त्यांना सांभाळायचं काम सुरुवातीला श्रीपु करत, नंतर ते पटवर्धन यांच्याकडे आलं. त्यातील शिरा ताणून, घसा फोडून उच्चरवाने बोलणाऱ्यांना ते युक्तीने ‘सत्यकथा’साठी लिहितं करत. त्यावर चर्चा व्हावी असं त्यांना वाटत असे. पण बऱ्याचदा त्यावर काहीच चर्चा होत नसे. असे एकदा पटवर्धन यांनी ‘चार डावे दृष्टिक्षेप’ या नावाने मराठी साहित्याची मार्क्‍सवादी समीक्षा करणारे चार लेख छापले. पण त्यावर कसलाही प्रतिसाद नाही की चर्चा नाही. एकदम नि:शब्द शांतता. असं झालं की पटवर्धन अस्वस्थ होत. म्हणून त्याचं वर्णन त्यांनी ‘कानठळ्या बसवणारा शुकशुकाट’ असं केलं. त्यांच्या पंच्याहत्तरी निमित्ताने ग्रंथालीने २००३ साली त्यांचा जो सत्कार समारंभ केला. तेव्हाही पटवर्धनांनी मराठी साहित्यातील या ‘कानठळ्या बसवणाऱ्या शुकशुकाटाचा’ उल्लेख केला. त्याचं बरंच कौतुकही झालं. पण त्याविषयी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी ते ‘डेफनिंग सायलेन्स’चं ते भाषांतर आहे असं  सांगून टाकलं.
पटवर्धन यांनी फारसं स्वतंत्र लेखन केलेलं नाही. लेखनाची त्यांना हौस नव्हती. पण प्रसंगपरत्वे त्यांनी काही मोजके लेख लिहिले आहेत. ‘सत्यकथे’त ते मराठी नाटकांच्या परीक्षणाचे सदर श्रीरंग या नावाने लिहित. सत्यकथेतच त्यांनी चेकॉव्हच्या काही कथांचे अनुवाद केले. विष्णुपंत भागवत आणि जयवंत दळवी यांच्या आग्रहावरून त्यांनी माजरेरी किनन रॉलिंग्ज यांच्या ‘द यर्लिग’ या पुस्तकाचा ‘पाडस’ या नावानं मराठी अनुवाद केला आहे. सवरेत्कृष्ट अनुवाद म्हणून गेली अनेक र्वष या पुस्तकाचा उल्लेख केला जातो आहे. पटवर्धन यांना दोन मुलं – श्रीरंग आणि अनिरुद्ध. पहिला वकील आहे तर दुसरा ऑडिटर. या दोघांनाही जवळपास ‘पाडस’ तोंडपाठ आहे. याशिवाय ‘नाइन फिफ्टीन टू फ्रिडम’चा ‘अखेरचा रामराम’ आणि बी. के. अय्यंगार यांच्या पुस्तकाचा ‘योगदीपिका’ असे दोन मराठी अनुवाद पटवर्धन यांच्या नावावर आहेत.
पटवर्धन यांचा डावा डोळा बहुधा जन्मापासूनच दुबळा होता. त्यामुळे त्यांना कधी चष्माही लावता आला नाही. त्यावर पटवर्धन यांची टिप्पणी मोठी मासलेवाईक होती, ते म्हणाले, ‘ते एका अर्थानं बरंच झालं. त्यामुळे जगाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन ओपन राहिला.’ पटवर्धन यांच्या या ओपन दृष्टिकोनाचं एक उदाहरण सांगायला हरकत नाही. लघुअनियतकालिकांच्या चळवळीतल्या राजा ढाले, सतीश काळसेकर वगैरे मंडळींनी ५ मार्च १९७९ रोजी मौजच्या कार्यालयासमोर ‘सत्यकथा’ची जाहीर होळी केली. राम पटवर्धन यांनी याविषयीची सत्यकथा सांगितली, ती अशी की- त्या दिवशी राजा ढाले वगैरे मंडळी मौजच्या कार्यालयासमारे पोचली खरी, पण घाईगडबडीत त्यांच्याकडे असलेला एकुलता एक अंक ते घरीच विसरून आले होते. दरम्यान बाहेरची गडबड ऐकून पटवर्धन आणि त्यांचे सहकारी गुरुनाथ सामंत खिडकीत आले. सामंत पटवर्धन यांना म्हणाले की, ‘हे लोक सत्यकथेची होळी करायला आले आहेत.’ सामंत मौजेत काम करत असले तरी लघुअनियतकालिकांशी संबंधित होते. त्यामुळे पटवर्धन त्यांना म्हणाले की, ‘तुम्ही मौजेच्या स्टाफपैकी असलात तरी तुम्ही त्यांच्यातले आहात. तेव्हा तुम्ही त्यांच्यात जा. आणि जाताना सत्यकथाचे अंकही घेऊन जा.’ त्यानुसार सामंत अंक घेऊन खाली उतरले आणि जथ्यात सामील झाले. त्यांना जथ्यावाल्यांकडे अंक नाही याची कल्पना नव्हती. मग त्यांनी स्वत:कडचे अंक त्यांना दिले आणि त्याचीच होळी करण्यात आली. म्हणजे सत्यकथाची होळी करण्यात आली ती मौजेच्या जिवावर. आणि त्याविषयी पटवर्धन यांनी स्वत:हून कधीही ब्र उच्चारला नव्हता. त्यांना विचारल्यावरच त्यांनी ही गोष्ट सांगितली. पटवर्धन यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ओपन होता तो हा असा!