लांबलेल्या आणि अति प्रमाणात कोसळलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका यंदा वाहतुकीला बसला. रेल्वेच्या बेजबाबदारपणामुळे मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर ते वांगणी दरम्यान दहा तासांपेक्षा जास्त वेळ पुराच्या पाण्यात अडकली. याची दखल थेट रेल्वे मंत्रालयाने घेतली आणि लष्कर, नौदल व अन्य सरकारी यंत्रणांच्या मदतीने एक हजारपेक्षा जास्त प्रवाशांची सुटका करण्यात आली. यापाठोपाठ रूळ आणि खडी वाहून गेल्याने मुंबई ते पुणे मार्गावरील तिसरी मार्गिका आणि नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन सेवाही पूर्णपणे बंद करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यामुळे रेल्वेच्या पावसाळापूर्व कामांचा बोजवाराच उडाल्याचे दिसले. वर्ष संपता संपता लोकल अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला. डोंबिवलीत राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचा कोपर स्थानकाजवळ गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाला. या साऱ्यातून रेल्वेच्या रखडलेल्या योजना वेळीच मार्गी लावण्याची निकड अधोरेखित झाली. मुंबई ते पुणे मार्गावरील प्रवास कालावधी कमी करण्यासाठी इंटरसिटी गाडीला पुश-पूल पद्धतीने दोन्ही बाजूंनी इंजिन जोडण्याचाही प्रयोग केला गेला. परंतु हा प्रयोग पूर्णपणे फसला. बेस्ट प्रवाशांसाठी भाडेतत्त्वावरील एक हजार बसगाडय़ांचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. रखडलेल्या वेतन करारासाठी बेस्ट कामगारांनी वर्षांच्या सुरुवातीलाच संप पुकारला.