अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिन्टन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यातच होणार हे आता स्पष्ट झाले आहे. डेमोक्रॅटिक पक्षातर्फे प्रथमच एका महिलेला उमेदवारी मिळाली आहे.  ट्रम्प हे राजकारणी नाहीत आणि हिलरी अनेक वर्षांच्या अनुभवामुळे राजकारणात मुरलेल्या आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र धोरण अनेक वष्रे चुकीचे चालू आहे, हे सांगण्याचे धाडस दाखवणाऱ्या  ट्रम्प यांच्या भाषणांचे कौतुक होत असले तरी निवडणूक मोहिमेत दोन्ही उमेदवारांना एकमेकांविरुद्ध आपापली बाजू मांडावी लागेल. तेव्हा ट्रम्प यांची वाद घालण्याची पद्धती नव्हे, तर हिलरी यांची विषयाचा अभ्यासपूर्ण रीतीने ऊहापोह करण्याची शैली प्रभावी ठरण्याचा संभव आहे.. हिलरींच्या ऐतिहासिक विजयाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मर्मज्ञ जाणकार आणि साक्षेपी संपादक गोविंद तळवलकर यांनी या विषयाचा घेतलेला आढावा..

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षातर्फे हिलरी क्लिन्टन यांची उमेदवार म्हणून निवड झाली आहे. हा त्यांचा ऐतिहासिक विजय म्हटला पाहिजे. यामुळे अर्धी लढाई त्यांनी जिंकली. आता अध्यक्ष ओबामा यांनी हिलरी यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्प या अब्जाधीश व्यावसायिकाची निवड झाली. प्रथम त्यांच्यासह त्या पक्षाचे सतरा उमेदवार होते, ते गळत गेले. हिलरी यांना प्रथम तीन प्रतिस्पध्र्याना तोंड द्यावे लागले, पण थोडय़ाच दिवसांत बर्नी सॅण्डर्स या एकाच उमेदवाराशी संघर्ष करावा लागला.

आठ वर्षांपूर्वी हिलरी अशाच स्पध्रेत होत्या. तेव्हा नव्यानेच सिनेटर झालेले बराक ओबामा हे उमेदवार प्रतिस्पर्धक होते. त्यांनी उमेदवारी जिंकली आणि नंतर अध्यक्षपद. ओबामांच्या त्या दोन्ही विजयांचे अमेरिकन जनतेने अतिशय उत्साहाने स्वागत केले. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक आफ्रिकन-अमेरिकन व्यक्ती अध्यक्षपदी निवडून आल्याचा आनंद आणि यामुळे अमेरिकेने काही विशेष साध्य केले, अशी सार्वत्रिक भावना होती. सर्व तरुण मुले व मुली ओबामांचे पाठीराखे होते आणि ओबामांचा विजय हा त्यांचाच विजय होता, अशी त्यांची भावना होती.

हिलरी तेव्हा अध्यक्षपदी निवडल्या गेल्या असत्या, तर अमेरिकेच्या इतिहासात सर्वोच्च पदावर निवडून आलेली पहिलीच स्त्री म्हणून त्यांचा असाच गौरव झाला असता. पण नंतर आठ वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले असून, राजकीय नेत्यांसंबंधात तेव्हाच्या भावना आता राहिलेल्या नाहीत.

या वेळेला याचा प्रत्यय (उमेदवार म्हणून निवडून आल्यावर हिलरी यांचे विशेष स्वागत न झाल्याने) आला. देशभरातील अनेक गावांतील काही घरांमध्ये हिलरी जिंकल्याबद्दल समारंभ आयोजित केले होते. पण ते त्यांनी उत्स्फूर्तपणे केले नव्हते; तर ज्या भागांत हिलरी यांचे स्थान डळमळीत आहे अशा भागांत पुढे मते मिळवायला भूमी तयार करण्यासाठी हिलरी यांच्या लोकांनी ते आयोजित केले होते. तरुणांचा त्यांना पाठिंबा नाही.

गेल्या आठ वर्षांत हिलरी व त्यांचे पती बिल यांच्यासंबंधी आणि त्यांच्या संपत्तीसंबंधात बरीच टीका झाली आहे. हिलरी यांनी परराष्ट्रमंत्री असताना खासगी ई-मेलचा वापर केला. त्याबद्दल त्यांच्याच खात्याने टीका केली आहे. त्या स्वत:विषयी विनाकारण अतिगुप्तता बाळगतात. वॉल स्ट्रीटवरील अनेक कंपन्यांपुढे त्यांनी भाषणे दिली व लाखो डॉलर्स मिळविले. पण लोकांनी त्या भाषणांच्या ध्वनिफिती अनेक वेळा मागूनही त्यांनी त्या देण्यास नकार दिला. क्लिंटन फाऊंडेशनने गेल्या अनेक वर्षांत हजारो कोटी डॉलर्स जमा केले. हेही कारण हिलरींचे अभूतपूर्व स्वागत न होण्यामागे आहे.

हिलरी बुद्धिमान व कष्टाळू आहेत. आपल्यापुढे असलेल्या विषयाचा त्या पूर्णपणे अभ्यास करतात. ट्रम्प यांनी अजून तरी विषयांचा अभ्यास केलेला दिसत नाही. हिलरी यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प हे राजकारणी नाहीत आणि हिलरी अनेक वर्षांच्या अनुभवामुळे मुरलेल्या. रिपब्लिकन पक्षास ट्रम्प आपले वाटत नव्हते. वर्षभर चाललेल्या प्रचार-मोहिमेनंतर पक्षाच्या नेतृत्वास ट्रम्प हे अवघड प्रकरण आहे, असे वाटत आले आहे. आता ट्रम्प निवळत असल्याच्या बातम्या आहेत. पण ट्रम्प केव्हा काय बोलतील याचा नेम नसतो. एक दिवस ते बदलले आहेत असे वाटावे, तोच ते स्फोटक वक्तव्य करतात. टीव्हीवरील करमणुकीच्या कार्यक्रमात बोलल्यासारखी नुसती शेरेबाजी करत राहिल्यास हिलरींविरुद्ध वाद करताना त्यांचा टिकाव लागणार नाही.

ट्रम्प यांच्या भाषणांचे कौतुक होत गेले असले तरी निवडणूक मोहिमेत दोन्ही उमेदवारांना एकमेकांविरुद्ध आपापली बाजू मांडावी लागेल, तेव्हा ट्रम्प यांची वाद घालण्याची पद्धती नव्हे, तर हिलरी यांची विषयाचा अभ्यासपूर्ण रीतीने ऊहापोह करण्याची शैली प्रभावी ठरण्याचा संभव आहे. त्या सहसा वादात हरत नाहीत. अर्थात जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनाही कसलीही माहिती नव्हती व अल् गोर यांना पूर्ण माहिती होती, तरी बुश अध्यक्ष झाले.

उमेदवारी जाहीर झाल्यावर ट्रम्प यांनी जोमदार भाषण केले खरे, पण ते जाहीर सभेतील भाषण झाले. आतापर्यंत त्यांनी आपल्या राजकीय, परराष्ट्रीय- इतकेच काय आíथक धोरणाचे स्थूल स्वरूपसुद्धा सांगितलेले नाही; फक्त अमेरिकेची आथक अवनती ओबामा यांच्या राजवटीत झाली, एवढीच री ओढली. एक मात्र खरे की, डेमोक्रॅटिक पक्षाच्या कोणालाही ‘बुश यांनी इराकचे युद्ध कारण नसता खोटे बोलून अंगावर ओढून घेतले,’ असे म्हणायचे धाडस झाले नसले तरी ट्रम्प यांनी मात्र हे स्पष्टपणे सांगितले. इजिप्त, लिबिया व सीरिया इत्यादी संबंधांत ओबामा यांचे धोरण चुकल्याची टीकाही ट्रम्प यांनी केली. अमेरिकेचे परराष्ट्र धोरण अनेक वष्रे चुकीचे चालू आहे, हे सांगण्याचे धाडस त्यांनीच दाखवले.

असे असले तरी ट्रम्प यांच्या आथक व परराष्ट्रीय धोरणाची कल्पना मात्र येऊ शकत नाही. ट्रम्प वेळोवेळी आíथक व परराष्ट्रीय धोरण, नेटो, उत्तर व दक्षिण कोरिया, जपान व अण्वस्त्रसज्जता याबद्दल जी शेरेबाजी करत आले होते; त्याचा काही दिवसांपूर्वी समर्पक भाषेत समाचार घेऊन हिलरी यांनी त्यांचे वाक्पटुत्व दाखवून दिले. राजकीय स्पध्रेत उतरल्यावरही ‘आपण टीव्हीच्या विनोदी कार्यक्रमात भाग घेत आहोत’ असे समजूनच ट्रम्प वागत आले आहेत. तसेच आपल्याला आता पक्षाचा नेता व नंतर निवडून आल्यास सर्व देशाचा नेता म्हणून सर्व लोकांना बरोबर घेऊन वागायचे आहे, जगाच्या पटलावर काम करायचे आहे; कूपमंडूक वृत्तीने केवळ खासगी व्यवसायाचे प्रमुख म्हणून निर्णय घेऊन, हुकूम सोडून, बेलगाम वक्तव्ये करून चालणार नाही याचे भान ट्रम्प ठेवत नाहीत. रिपब्लिकन पक्षाची प्राथमिक निवडणूक चालू होती तेव्हा हे सर्व चालत होते, कारण रिपब्लिकन पक्षाच्या मतदारांना त्यांच्याच पक्षाच्या राजकारण्यांचा वीट आला आहे. सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाना बरोबर न्यावे लागते.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या मतदारांनाही राजकारण्यांचा वीट आला आहे, पण त्यांच्या पक्षातर्फे कोणी बिगरराजकारणी व्यक्ती उभी नव्हती. डेमोक्रॅटिक पक्षाची अवस्था मोठी चांगली आहे, असे नाही. हिलरी यांना विरोध करणारे पक्षीय उमेदवार बर्नी सॅण्डर्स हे अनेक वष्रे सिनेटर आहेत. पण ते अपक्ष म्हणूनच दीर्घ काळ वागत होते व समाजवादी असल्याचे ते सांगतात. अध्यक्षीय निवडणुकीसाठी त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे सभासदत्व पत्करले असले, तरी आपल्या समाजवादी निष्ठेचीच ग्वाही ते देतात.

ट्रम्प व सॅण्डर्स या दोघांत काही समान घटक आहेत. दोघांना पक्षाचे बंधन नव्हते आणि आता पक्षाचा स्वीकार करूनही आपण पक्षाचे काही लागत नसून पक्षच आपला ऋणी असायला पाहिजे, असे दोघांचे बोलणे व वागणे आहे. सॅण्डर्स हे पक्षाचे नेतृत्व, कार्यकारिणी हे सर्व प्रस्थापितांची यंत्रणा आहे असे मानतात. या यंत्रणेला परवा त्या पक्षात आलेले सॅण्डर्स आदेश देऊ पाहतात. ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाला असेच वागवत होते. पण प्राथमिक निवडणूक जिंकल्यानंतर पुढील अनेक गोष्टी करण्याकरिता कार्यकारिणी इत्यादींशी विचारविनिमय अनिवार्य आहे, हे ट्रम्प यांच्या ध्यानी आले आहे.

सॅण्डर्स व ट्रम्प यांच्यामधील आणखी एक समान घटक म्हणजे, त्यांना मिळालेला लोकांचा प्रतिसाद. ट्रम्प यांना जवळजवळ प्रारंभापासून तो मिळत होता, सॅण्डर्स यांना काही महिन्यांनी. ट्रम्प यांची बोलण्याची पद्धत लोकांचे लक्ष वेधून घेणारी आहे, तशी ती सॅण्डर्स यांची नाही. या दोघांना इतका प्रतिसाद मिळत आला याचे मुख्य कारण हे आहे की, दोन्ही पक्षांच्या एकजात सर्व लहान-मोठय़ा नेत्यांबद्दल झालेला लोकांचा भ्रमनिरास.

गेल्या अनेक वर्षांत लोकांना हे दिसत आहे की, अमेरिकेतील राज्य पातळीवरचे तसेच संघराज्य पातळीवरचे राजकीय नेते स्वत:चे आणि स्वत:च्या आप्तस्वकीयांचे सतत भले करत आले आहेत. देशात आथक अरिष्ट आल्यामुळे असंख्य लोक होरपळून निघाले, तरी या नेत्यांची मालमत्ता अखंड वाढतच गेली. हे बोलतात एक आणि घडते दुसरेच. यामुळे ट्रम्प आणि सॅण्डर्स यांना वाढती गर्दी मिळत गेली. उलट, हिलरी यांच्या सभा नेहमीपेक्षा एकतृतीयांशावर. ओबामा किंवा बिल क्लिंटन यांच्यासारखी सभा गाजवण्याची कला त्यांच्यात नाही. परंतु हिलरी यांना मते फारच कमी पडतील अशी जी हवा पसरली होती, तसे काही झाले नाही. अनेक ठिकाणी त्यांनी उगाच शक्ती दवडली नाही. एकंदर मतांचा जाहीर झालेला हिशेब पाहिला तर सॅण्डर्स यांच्यापेक्षा हिलरी यांना ३५ लाख मते जास्त पडली आहेत. भाषणांना गर्दी न करता मते देण्याचे व्यवहारी धोरण मतदारांनी स्वीकारले असावे.

तथापि, या वेळी हिलरी यांना जो बराचसा थंड प्रतिसाद मिळत होता, त्याला त्यांचा स्वभाव कारणीभूत आहे. त्यांच्यावर लोकांचा फारसा विश्वास नाही. त्यांचा हा स्वभाव मला रिचर्ड निक्सन यांची आठवण करून देतो. शिवाय त्या कमालीच्या आत्मकेंद्रित आहेत, हे वारंवार प्रगट होत असते. उमेदवारी मिळवण्यात यश आल्यानंतर झालेल्या अभिनंदनाच्या मेळाव्यात मोठय़ा अभिमानाने दाखविण्यात आले की, त्यांच्या विजयाने आता सर्वत्र लहान मुली विश्वासाने म्हणू लागतील की- त्या आता काहीही साध्य करू शकतील. प्रत्यक्षात अमेरिकेतील तरुण मुलींचा हिलरींना पाठिंबा नाही. देशात प्रथमच एका महिलेला अध्यक्षपदाची उमेदवारी मिळाल्याबद्दल या तरुण मुलींना काहीही विशेष वाटत नाही.

तथापि, देशातील सर्वोच्च राजकीय अधिकारपद मिळवण्याच्या जवळ आलेल्या अमेरिकेतील त्या पहिल्या महिला असल्या तरी गोल्डा मायर, भंडारनायके, इंदिरा गांधी, मार्गारेट थॅचर आपापल्या देशात पंतप्रधान होऊन अनेक वष्रे झाली. इतकेच काय, बांगलादेशातही शेख हसीना आणि बेगम खालेदा या दोघी आलटून-पालटून पंतप्रधान होत आल्या आहेत. अ‍ॅन्गेला मर्केल जर्मनीच्या चॅन्सेलर होऊन काही वष्रे झाली. दक्षिण अमेरिकेतील काही देशांतही महिला सर्वोच्च स्थानावर होत्या. आता अमेरिकेपुढे बाकीचे देश व त्या देशांतील सर्वोच्च पदांवरील महिला महत्त्वाच्या नाहीत, असे हिलरी यांना वाटत असेल; पण हाही वृथा अभिमानाचा भाग झाला. दुसरे असे की, वरील उल्लेखिलेल्या व्यक्ती या महिला म्हणून उभ्या नव्हत्या, त्या स्वत:च्या कर्तृत्वावर निवडणूक लढवत होत्या. कोणी त्यांना महिला म्हणून जास्त किंवा कमी मते दिली नाहीत. महिलेला अध्यक्ष म्हणून उमेदवारी मिळण्यासाठी अमेरिकेला दोनशेपेक्षा जास्त वष्रे का लागावी?

ट्रम्प यांची आवडती घोषणा आहे- ‘अमेरिका सर्वप्रथम’. यामुळे त्यांना सहकार्याचे आंतरराष्ट्रीय करार नकोत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की, समाजवादाची ग्वाही देणाऱ्या सॅण्डर्स यांनाही आंतरराष्ट्रीय करार नको आहेत. अमेरिकेच्या फौजा जिथे असतील तिथून त्या या दोघांना परत घ्यायला हव्या आहेत. अमेरिकेने इराक व नंतर सीरिया, इजिप्त, लिबिया यांचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळला आणि अफगाणिस्तानात वाटेल तेवढा गोंधळ अफगाण नेत्यांच्या बरोबरीने घातला. अमेरिकेला अनेक ठिकाणी हस्तक्षेप करणे भाग पडत आले आहे व यापुढेही येईल. पण ‘अमेरिका सर्वप्रथम, इतरांशी संबंध अगदीच जुजबी’ या धोरणाची ताíकक परिणती, अतिरेकी राष्ट्रवादात होण्याचा धोका आहे.

आंतरराष्ट्रीय आíथक सहकार्याचे दोन करार ट्रम्प व सॅण्डर्स यांना अमान्य आहेत. यामुळे अमेरिकन कामगारांच्या नोकऱ्यांवर गदा येते, असे त्यांचे म्हणणे. पण जर्मनी व इतर अनेक देशांनी असे करार केले असून, त्यांच्या तक्रारी नाहीत. अर्थात जर्मनीने नव्याने येत असलेल्या तंत्रज्ञान कामगारांना शिकवण्याची खास व्यवस्था केली, म्हणून बेकारी टळली. मग अमेरिकेला कोणी अडवले?

सॅण्डर्स यांची विचार करण्याची एकच दिशा आहे आणि व्यवहार मात्र विविधांगी असतो. त्यांनी दर ताशी पंधरा डॉलर हे किमान वेतन असले पाहिजे अशी मागणी केली आहे. ते मोठय़ा व्यवसायांना परवडणारे आहे, पण अमेरिकेत लहान व मध्यम उद्योग बरेच आहेत. त्यांना हे न परवडून अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याचा धोका आहे.

सॅण्डर्स यांचा प्राथमिक उमेदवारीच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. ट्रम्प यांना आपला विरोध त्यांनी जाहीर केला असला, तरी हिलरींना अजून तरी पाठिंबा जाहीर केलेला नाही. डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिवेशनात ते आपला आíथक व राजकीय कार्यक्रम मांडणार आहेत. पक्ष हा त्यांच्या कार्यक्रमाच्या पूर्तीचे साधन राहील, पक्षाने त्यांच्याकडून अपेक्षा करू नये असे त्यांना वाटते. त्यांनी मिळविलेल्या लोकांच्या पाठिंब्याचा पक्षाला उपयोग होणार नाही. कदाचित आपण हिलरींविरुद्ध प्रचार करून ट्रम्प यांची बाजू बळकट करणार नाही हाच मोठा उपयोग, असे त्यांना वाटत असेल.

तेव्हा दोन्ही पक्षांचे काय होणार, हे प्रश्नचिन्ह राहणार. सर्व उमेदवारांतील चांगले गुण एकत्र करून एक नवी व्यक्ती तयार केली तरी बऱ्यापकी उमेदवार तयार होईल की नाही, अशी काहींना शंका आहे. त्यामुळे काही लोक कोणालाच मत न देता निवडणूक पत्रिकेवर स्वत:चेच नाव लिहून निषेध नोंदवण्याच्या विचारात आहेत.

देशातील सर्वोच्च राजकीय अधिकारपद मिळवण्याच्या जवळ आलेल्या हिलरी या अमेरिकेतील  पहिल्या महिला असल्या तरी गोल्डा मायर, भंडारनायके, इंदिरा गांधी, मार्गारेट थॅचर आपापल्या देशात पंतप्रधान होऊन अनेक वष्रे झाली. इतकेच काय, बांगलादेशातही शेख हसीना आणि बेगम खालेदा या दोघी आलटून-पालटून पंतप्रधान होत आल्या आहेत. अ‍ॅन्गेला मर्केल जर्मनीच्या चॅन्सेलर होऊन काही वष्रे झाली. महिलेला अध्यक्ष म्हणून उमेदवारी मिळण्यासाठी अमेरिकेला दोनशेपेक्षा जास्त वष्रे का लागावीत?

 

– गोविंद तळवलकर
govindtalwalkar@hotmail.com