भारतात ‘धर्माधिष्ठित हिंदुराष्ट्र’ स्थापन करणे आणि भारतातील ‘दुष्टां’चा नाश करणे हे सनातन संस्थेचे ध्येय. मानसोपचारतज्ज्ञ जयंत बाळाजी आठवले यांनी १९९९ मध्ये या संस्थेची स्थापना केली. गोव्यातील रामनाथी आणि पनवेल येथे या कट्टरतावादी संस्थेचे आश्रम आहेत. ठाणे, पनवेलमधील बॉम्बस्फोटांत संस्थेच्या दोन साधकांना कारावासाची शिक्षा झाली होती. गोव्यातील नरकासुर दहन प्रथेला विरोध म्हणून संस्थेशी संबंधित असलेल्या काही जणांनी बॉम्बस्फोटाचा कट आखल्याचा आरोप होता. तो बॉम्ब स्कूटरवरून नेताना फुटला. त्यात मलगोंडा पाटील आणि योगेश नाईक हे साधक ठार झाले. या प्रकरणी सनातनच्या सहा साधकांना अटक करण्यात आली होती. पुढे न्यायालयात ते पुराव्याअभावी सुटले. मात्र या प्रकरणाशी संबंधित काही लोक अद्याप फरार आहेत. कॉ. गोिवद पानसरे यांच्या हत्याप्रकरणीही सनातनच्या समीर गायकवाडला अटक झाली आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात नुकतीच संस्थेशी संबंधित असलेल्या एकाला अटक करण्यात आली. या संस्थेचे अनेक साधक महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात आहेत. संस्थेचे स्वत:चे वृत्तपत्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाबा रामपाल
रामपाल यांना त्यांचे अनुयायी कबिराचे अवतार मानतात. हरियाणातील हिसार येथे १२ एकरांवर त्यांचा आलिशान आश्रम आहे. त्यांची मालमत्ता १०० कोटींची असल्याचे सांगण्यात येते. ते भक्तांना मोक्ष देतात.
२००६ मध्ये त्यांनी आर्य समाजावर टीका केली. त्यावरून जोरदार दंगल झाली. त्यात एक आर्य समाजी मेला. त्याच्या खुनाच्या आरोपाखाली रामपालला अटक करण्यात आली. २००८ मध्ये तो जामिनावर सुटला. त्यानंतर तो न्यायालयाला जुमानेसा झाला. २०१४ मध्ये न्यायालयाने त्याच्या अटकेचे आदेश दिले. अशा सगळ्याच बाबांच्या भक्तांना आपला बाबा निर्दोष असून त्याच्यावर अन्याय झाल्याचे वाटते. रामपालच्या भक्तांचेही हेच म्हणणे होते. त्यांनी पोलिसांना रोखण्यासाठी हातात बंदुका, तलवारी, लाठय़ा घेऊन आश्रमाला वेढा घातला. रामपालला अटक करायची असेल तर पोलिसांना आमच्या एक लाख प्रेतांवरून जावे लागेल, अशी धमकीच त्यांनी दिली. दोन आठवडे हा खेळ चालला होता. अखेर १८ नोव्हेंबर २०१४ रोजी २० हजार पोलीस आश्रमात घुसले. भक्तांनी पोलिसांवर हल्ला केला. पेट्रोल बॉम्ब फेकले. त्या दंगलीत २८ पोलीस जखमी झाले. पोलिसांना आश्रमात पाच महिला आणि एका १८ महिन्यांच्या बाळाचा मृतदेह आढळला. जन्मत:च त्या मुलाला कावीळ झाली होती. ती बरी करण्यासाठी त्याला रामपालांच्या चरणी आणण्यात आले होते. या काळात त्याने आश्रमात अनेकांना डांबून ठेवल्याचे नंतर उघडकीस आले.
समाजमाध्यमांतून या बाबाचा जोरदार प्रचार केला जातो. त्याचे स्वत:चे यूटय़ूब चॅनेलही आहे. भक्तांमध्ये प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातील लोकांचा समावेश आहे.

आनंदमार्ग
रेल्वेत लेखापाल असलेल्या प्रभातरंजन सरकार यांनी १९५५ मध्ये हा पंथ स्थापन केला. नंतर ते श्री श्री आनंदमूर्ती या नावाने ओळखले जाऊ लागले. प. बंगालमधील पुरुलियात या पंथाचे मुख्यालय होते. आयबीचे माजी संचालक टी. व्ही. राजेश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार या संप्रदायात काळ्या जादूचे प्रयोग केले जात. सहा साधकांच्या हत्याप्रकरणी आनंदमूर्ती यांना अटक झाली होती. राजेश्वर सांगतात की, या हत्या प्रकरणांच्या चौकशीत अडचणी येत होत्या. कारण बिहारमधील अनेक पोलीस अधिकारी आनंदमूर्तीचे भक्त होते. अर्थातच आनंदमूर्ती पुराव्याअभावी सुटले. १९७५ मध्ये रेल्वेमंत्री एल एन मिश्र यांची समस्तीपूर रेल्वे स्थानकात बॉम्ब फेकून हत्या करण्यात आली. २०१४ मध्ये त्या खटल्याचा निकाल लागला. त्यात चार आनंदमार्गीना शिक्षा झाली. सिडनेमध्ये १९७८ साली राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांची बैठक होणार असलेल्या हॉटेलात दोन परदेशी आनंदमार्गीनी बॉम्बस्फोट केला होता. आणीबाणीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए. एन. रॉय यांच्यावरील बॉम्बहल्लय़ातही आनंदमार्गीचा समावेश होता. आजही ही संघटना जगभरात कार्यरत आहे, पण तिचे जुने रूप संपलेले आहे.

अ‍ॅसॅसिन्स
राजकीय हेतूने प्रेरित खुनाला इंग्रजीत जो ‘अ‍ॅसॅसिनेशन’ हा शब्दप्रयोग आहे त्याची व्युत्पत्ती हशिशिन्स नावाच्या मध्ययुगातील इस्लामी गटाच्या नावावरून झाली असे मानण्यात येते. हशीश या अमली पदार्थाचे सेवन करून खून करणारे भाडोत्री हल्लेखोर असा त्याचा अर्थ होता. त्यामुळे हशीश वरून हशिशिन आणि त्याचा अपभ्रंश होऊन अ‍ॅसॅसिन्स (पुढे अ‍ॅसॅसिनेट किंवा अ‍ॅसॅसिनेशन) असे शब्द रूढ झाले. इस्लामच्या अनुयायांत ११व्या शतकात फूट पडून निझारी नावाचा एक पंथ तयार झाला. ते प्रामुख्याने शियापंथीय होते. हसन-ए-सब्बाह हा अ‍ॅसॅसिन्सचा नेता समजला जातो. त्यांनी तात्कालीन इराण आणि सीरियातील डोंगरी किल्ल्यांवरून हल्ले करून सुन्नी सेल्युक सत्तेला धोका निर्माण केला. त्यांच्या अनुयायांना फिदाई म्हणत असत. त्यावरून आजचा फिदायीन हल्ला हा शब्दप्रयोग आला असावा. ते प्रामुख्याने शत्रूच्या गोटात हेरगिरी करून राजकीय नेत्यांचा काटा काढत असत. त्यांनी आपल्या ३०० वर्षांच्या अमलात २ खलिफा, अनेक वझीर, सुलतान आणि क्रुसेडर योद्धय़ांना कंठस्नान घातले. इमाम रुक्नुद्दीन खुर्शाह याच्या नेतृत्वाखाली त्यांचा ऱ्हास झाला आणि अखेर निझारी राज्य रसातळाला गेले. हल्ला करणाऱ्या मंगोलांपुढे इमाम शरण गेला. अ‍ॅसॅसिन्स खरेच हशीशचे सेवन करत का त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या नावाने तसा अपप्रचार केला होता, याबाबत वाद आहेत. ‘डोंगरातील वृद्ध माणसा’च्या आज्ञेनुसार ते हल्ले करायचे असे सांगितले जाते.

माहिती संकलन : सचिन दिवाण

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History of sanatan organization