भारतात वाघांची संख्या वाढली. त्यातही वाघांच्या आकडेवारीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याची शुभवार्ता जागतिक व्याघ्रदिनी ऐकायला मिळाली. मात्र वर्षअखेरीस वाघांच्या मृत्यूची समोर आलेली आकडेवारी विचार करायला लावणारी आहे. वाघासह इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या माणसांच्या मृत्यूच्या आकडेवारीने मानव-वन्यजीव संघर्ष यंदा चरमसीमेवर पोहोचला आहे. त्याच वेळी वाघाच्या स्थलांतरणाने जंगलाची संलग्नता ही एक चांगली बाब समोर आली आहे. मात्र लांब पल्ल्याचे स्थलांतरण वाघासाठी धोक्याची घंटा ठरू शकते आणि त्यामुळेच वन खात्याची संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी वाढली आहे. जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत विदर्भातील एक-दोन नाही, तर तब्बल १७ वाघ मृत्युमुखी पडले आहेत. यातील सहा वाघांची शिकार, चार वाघांना विषबाधा, एकाचा वीज प्रवाहामुळे मृत्यू, तर एकाला सापळ्यात अडकून जीव गमवावा लागला. एका वाघिणीची १५ बछडय़ांना जन्म देण्याची क्षमता असते आणि या वर्षी मृत्यू पावलेल्या १७ वाघांपैकी दहा वाघिणी आहेत. याचाच अर्थ आपण दीडशे वाघ गमावले आहेत. मानव-वन्यजीव संघर्षांत या वर्षभरात ३६ माणसांचा बळी गेला. यातील माणसांच्या मृत्यूच्या २१ घटना या एकटय़ा चंद्रपूर जिल्ह्य़ातील आहेत. मानव-वन्यजीव संघर्षांचा आलेख गेल्या दशकभरापासून कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. माणूस मेल्यानंतर वनखात्याकडून त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली जाते हे खरे आहे, पण संघर्षांच्या वाढत्या आलेखाचे काय, हा प्रश्न कायम आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Dec 2019 रोजी प्रकाशित
मानव-वन्यजीव संघर्ष
वाघासह इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या माणसांच्या मृत्यूच्या आकडेवारीने मानव-वन्यजीव संघर्ष यंदा चरमसीमेवर पोहोचला आहे
Written by लोकसत्ता टीम

First published on: 29-12-2019 at 00:55 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Human wildlife conflict abn