रावसाहेब पुजारी
शेतकऱ्यांना वाटते की शेतात चांगले पीक यावे. ही अपेक्षा तशी रास्तच. पण भरपूर पीक, उत्पादन यायचे म्हणजे काळजी नेमकी कोणती घ्यावी याची समज असणेही तितकेच गरजेचे. त्याकरिता काय केले पाहिजे, कोणती पार्श्वभूमी असली पाहिजे याचा धांडोळा घेणे म्हणूनच आवश्यक. त्यासाठी संवर्धित शेती पद्धती आणि खत व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याने त्या अंगाने विचार झाला पाहिजे.
पाटबंधारेच्या सुविधा ज्या ज्या ठिकाणी झाल्या, तेथे प्रामुख्याने ऊस व फळबागांना सुरुवात झाली. ज्या क्षेत्रावर एक धान्य पीक पूर्वी घेतले जात होते, तेथे आता दोन तीन पिके पाण्याच्या उपलब्धतेनुसार घेतली जाऊ लागली आहेत. सुरुवातीच्या काळात उत्पादन चांगले मिळाले. परंतु, पुढे १५-२० वर्षांनंतर उत्पादन पातळी घटत गेली. हा संक्रमण काळ जवळपास दोन पिढय़ाच्या कालावधीत घडला. उत्पादनात एकदम मोठय़ा प्रमाणात घट न येता हळूहळू घटत गेले आहे. यामुळे घट एकदम शेतकऱ्यांच्या नजरेत आलेली नाही. पूर्वी उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पादन भरपूर मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली. पुढे उत्पादन पातळी घटणारी मूळ पदावर नेण्यासाठी शेतकऱ्यांनी संसाधनांचा वापर वाढवत नेला. यातून उत्पादनात फार मोठी वाढ झाली नाही. परंतु उत्पादन खर्चात मात्र मोठय़ा प्रमाणात वाढ झाली.
येणारे उत्पन्न आणि होणारा खर्च यांचा ताळमेळ घालताना शेतकऱ्यांची तारेवरची कसरत होऊ लागली. नेमकी उत्पादन पातळी का घटत चालली आहे, याचे शास्त्रीय विश्लेषण फारसे कोणी केले नाही. शेतकरी म्हणू लागले, की जमिनीत पूर्वीसारखी ताकद आता राहिलेली नाही. काही विचारवंतांनी रासायनिक खताच्या अतिवापराला दोष दिला. त्यातून रसायनांचा वापर बंद करून सेंद्रिय शेती केली पाहिजे, असा आग्रह धरला जाऊ लागला. असे उत्पादन घटीचे वरवरचे निदान करून मोकळे होता येणार नाही. एक हत्ती आणि सात आंधळे या गोष्टीसारखी आपली मते मांडणे रास्त नव्हे. नेमके शास्त्रीय कारण शेतकऱ्यांपुढे येणे गरजेचे होते. त्यावर काय उपाय करता येतील? उत्पादन पातळी मूळ पदावर नेण्यासाठी प्रचलित शेती करण्याच्या पद्धतीत शेतकऱ्यांनी नेमके शेती कसण्याच्या पद्धतीत काय बदल केले पाहिजेत, याचे उत्तर कोणीही देत नव्हते. शासनही खूप आधीपासून याबाबत फारसे करताना दिसत नाही. कृषी विद्यापीठ हाच कित्ता गिरवत आहे. स्वयंभू कृषितज्ज्ञ हत्ती आणि आंधळय़ाच्या गोष्टीतील नायक झालेले आहेत. शेतकरी आपल्या परीने हात-पाय मारण्याचा प्रयत्न करतोय, पण उत्पादन पातळीत फारशी वाढ होताना दिसत नाही हे ढोबळमानाने वास्तव आहे.
सुमारे ५० वर्षांपूर्वी शेती करण्याच्या पद्धती आणि आजची शेती यामध्ये खूप बदल झालेले आहेत. सन १९९० च्या दशकापासून नोंद घेण्याइतपत उत्पादन पातळी घटू लागली. उत्पादन पातळी घटीवर शेतकऱ्यांनी फारसे गांभीर्याने घेतले नाही. हीच जमीन पूर्वी चांगले उत्पादन देत होती, आता देत नाही म्हणजे उत्तम उत्पादन मिळत होते. त्यावेळी नेमके जमिनीत काय होते? आता नेमकी काय कमतरता निर्माण झाली आहे. संसाधनांचा वापर वाढवित नेणे हा परवडणारा मार्ग नव्हता. पण यावर मात करण्याची गरज होती. ती अभ्यासकांना सतावत होती.
आपण पिकाला सेंद्रिय व रासायनिक स्वरूपात अन्नद्रव्य पुरवठा करतो. किती, केव्हा, कोठे ती टाकायची याची माहिती सांगितली जाते. खते जमिनीत टाकल्यानंतर त्यातील अन्नांश पिकापर्यंत कसे पोहोचतात या विषयी शेतकऱ्यांना माहिती करून देण्याची गरज आहे. आपली अशी समजूत असते, की खत टाकले व पाणी दिले की खतातील अन्नांश पाण्यात विरघळतात. ते पाणी पीक शोषून घेते व त्यातून पिकांचे पोषण होते. वास्तवात हे सगळे इतके सोपे नाही. कोणतेच अन्नद्रव्य आपण ज्या स्वरूपात देतो, त्या स्वरूपात वनस्पतींकडून शोषले जात नाही. जमिनीत त्यावर अनेक प्रक्रिया सूक्ष्मजीवांमार्फत केल्या जातात. हा सर्व अभ्यास अजूनही अंधारात राहिल्याने अन्नद्रव्यांचा खूप मोठा प्रमाणावर नाश होतो आहे.
टाकलेल्या अन्नद्रव्यांचे प्रथम स्थिरीकरण होते. स्थिरीकरण म्हणजे पाण्यात न विरघळणाऱ्या अवस्थेत रूपांतर. आपण सर्वसाधारणपणे ३० ते ४५ दिवसांसाठी खताचा हप्ता देतो. तो तितके दिवस पिकाने पुढे गरजेप्रमाणे शोषण करावयाचा असतो. पाण्यात विरघळणारम साठा म्हणजे पिकाला खाण्याच्या अवस्थेतील साठा होय. हा सर्वात नाशवंत असतो. तो हवेत उडूनही जाऊ शकतो अगर पाण्यातून निचऱ्यावाटे जमिनी बाहेरही जाऊ शकतो. असा त्याचा नाश होऊ नये, म्हणून निसर्गाने काय सोय करून ठेवली आहे ते पाहिल्यावर मन थक्क होते. तसेच पिकाची बाल्यावस्था, तरुणपण अथवा वाढीची अवस्था, काही पिकात फुटीची अवस्था व शेवटी पक्वता. या प्रत्येक अवस्थेत पिकाची गरज बदलत असते. उदा. झ्र् बाल्यावस्थेत स्फुरदाची गरज जास्त असते. तर वाढीच्या अवस्थेत नत्राची गरज जास्त असते. पक्वता अवस्थेत पालाशची गरज जास्त असते. प्रत्येक पिकाच्या गरजा वेगवेगळय़ा असतात, तर एकाच पिकाच्या दोन जातीच्या गरजा वेगवेगळय़ा असतात. मग या गरजा नेमक्या कशा भागविल्या जातात, याची माहिती शेतकरी बंधूना असणे फार महत्त्वाचे आहे.
इथे पांढऱ्या अगर केशमुळय़ाभोवताली असणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या गटाचे कार्य महत्त्वाचे ठरते. मुळाभोवती अनेक जाती-प्रजातींचे सूक्ष्मजीव कार्यरत असतात. प्रत्येक अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी अनेक जाती-प्रजातींची निर्मिती केलेली असते. परिस्थितीतील घटक जसे जसे बदलत जातात, तसतसे पुरवठा करणाऱ्या जाती-प्रजातींही बदलत जातात. इतक्या जाती-प्रजातींची निर्मिती करण्यामागे निसर्गाचा हेतू असा असावा की कोणत्याही परिस्थितीत अन्नद्रव्यांचा पुरवठा बंद पडू नये, याची निसर्गाने घेतलेली दक्षता आहे.
स्थिरीकरण व उपलब्धीकरण या अन्नद्रव्य पुरवठय़ामागील दोन प्रमुख पायऱ्या आहेत. इंग्रजीत याला ‘इम्मोबिलायझेशन’ व ‘मिरलायझेशन’ असे शब्द आहेत. प्रचलित शेती शास्त्रात ही संकल्पना मान्य केली गेलेली नाही. यामुळे या पायऱ्याबद्दल शेतकऱ्यांचे कोणतेही प्रबोधन होताना दिसत नाही. यातील स्थिरीकरण ही पहिली पायरी सर्वात महत्त्वाची आहे. स्थिरीकरण म्हणजे अन्नद्रव्ये जमिनीत सुरक्षित साठय़ात साठविणे होय. प्रथम असे योग्य स्थिरीकरण झाले तरच पुढे त्यातील गरजेइतक्या भागाचे उपलब्धीकरण होऊ शकते. खतांच्या कार्यक्षम वापरासाठी स्थिरीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. निसर्गात स्थिरीकरण तीन प्रकारात कसे असते ते पाहू.
आता या स्थिरीकरणाचा तुलनात्मक अभ्यास पाहू या. कायिक स्थिरीकरण सैल असते. एखाद्या मोठय़ा पाण्याच्या प्रवाहाबरोबर यातील अन्नघटक वाहून जाऊ शकतात. मुळात जमिनीत अशा स्थिरीकरणासाठी भरपूर सेंद्रिय कर्ब असणे गरजेचे आहे, ज्याची आज जमिनीत वानवा आहे. जमिनीत प्रामुख्याने दगड झिजून तयार झालेल्या खनिज कणांचाचा साठा असतो. ज्यावर कायिक स्थिरीकरण होण्यास मर्यादा असते. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची कमतरता हा शेतीपुढील सार्वत्रिक प्रश्न आपल्याकडेच नव्हे तर जगभरातील शेती पुढील आहे. यामुळे या प्रकारच्या स्थिरीकरणाला मर्यादा पडतात. रासायनिक स्थिरीकरणातील अन्नद्वर्य़े पिकाला सहज गरजेप्रमाणे उपलब्ध होऊ शकत नाहीत. हे स्थिरीकरण काहीसे घट्ट असते. या स्थिरीकरणातील अन्नद्रव्ये पिकाच्या गरजेनुसार जलद स्थिर साठय़ातून उपलब्ध साठय़ात येऊ शकत नाहीत. प्रामुख्याने स्फुरदाचे स्थिरीकरण या प्रकारात येईल. जैविक स्थिरीकरणातील अन्नद्रव्ये ना उडून हवेत जाऊ शकतात, ना पाण्याच्या प्रबावाबरोबर धुपून जाऊ शकतात, याचबरोबर पिकाच्या गरजेप्रमाणे जलद स्थिर साठय़ातून उपलब्ध साठय़ात सहजपणे येऊ शकतात. यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे स्थिरीकरण सर्वात महत्त्वाचे ठरते. मात्र आपण सेंद्रिय पदार्थ जमिनीत कुजवतच नसल्याने जैविक स्थिरीकरणाला वावच शिल्लक राहत नाही.
भू-सूक्ष्मजीवशास्त्र सांगते, की सेंद्रिय पदार्थ थेट जमिनीतच कुजविला पाहिजे. एका बाजूला पीक वाढत असता तेथेच सेंद्रिय पदार्थ कुजणे चालू असले पाहिजे. ही कुजण्याची क्रिया जितका प्रदीर्घ काळ चालू रहील, तितके चांगले ठरते. शास्त्र सांगते, अर्धवट कुजलेले खत वापरू नका. शेतीत नवीन तंत्रे विकसित करीत असता या त्रुटीची नोंद घेणे गरजेचे आहे. आपण रासायनिक खते प्रामुख्याने आयात करतो. देशाचे खूप मोठे परकीय चलन या कामावर खर्च पडते. यासाठी खतांचा जास्तीत जास्त कार्यक्षमतेने वापर करणे गरजेचे ठरते. परंतु स्थिरीकरण ही संकल्पनाच गृहीत धरली न गेल्याने यावर प्राथमिक चर्चाही कोठे होताना दिसत नाही. प्रत्येक जमिनीची एक स्थिरीकरण मर्यादा असते. प्रयत्नपूर्वक ती वाढवित नेता येते. तर सतत वापरून कमी कमी होत असते. प्रथम स्थिरीकरण व्यवस्थित झाले तरच पुढे उपलब्धीकरण या पुढील पायरीला वाव राहतो, ही बाब लक्षात घेतली पाहिजे.
१) कायिक स्थिरीकरण – जमिनीतील मातीच्या कणांवर विद्युत भार असतात. जमिनीत १) खनिज २) सेंद्रिय असे दोन प्रकारचे मातीचे कण असतात. यातील खनिज कण म्हणजे खडक झिजून तयार झालेले कण तर सेंद्रिय कणांची निर्मिती वनस्पतीजन्य व प्राणिजन्य पदार्थ कुजून होते. खनिज कणांवर विरळ विद्युत भार तर सेंद्रिय कणावर दाट विद्युत भार असतात. वि-जातीय विद्युतभाराचे कण एकमेकांकडे आकर्षित होऊन एकमेकांना चिकटतात. अशा प्रकारे चिकटून राहिल्याने होणाऱ्या स्थिरीकरणाला कायिक स्थिरीकरण असे म्हटले जाते. हरित क्रांतीनंतर सुरुवातीच्या १५-२० वर्षांत पिकांचे जे चांगले उत्पादन मिळाले, ते या कायिक स्थिरीकरणामुळेच मिळाले. जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण योग्य पातळीवर असल्याने जोपर्यंत असे स्थिरीकरण चांगले होत होते तोपर्यंत उत्पादन चांगले मिळाले. पुढे सेंद्रिय कणांची टक्केवारी जसजशी कमी कमी होत गेली, तसे कायिक स्थिरीकरण योग्य प्रकारे होणे बंद झाले. कायिक स्थिरीकरण योग्य प्रकारे होणे बंद झाले व उत्पादन पातळी घटत गेली. यातून कायिक स्थिरीकरणाचे महत्त्व लक्षात येते.
या शास्त्र शाखेचा अभ्यासच नसल्याने शेतकरी म्हणू लागले, की जमिनीच्या अंगात आता पूर्वीसारखी ताकद राहिलेली नाही. कोण म्हणाले, रासायनिक खतांच्या वापराने जमिनी जळून गेल्या आहेत. या खतांचा वापर बंद करून सेंद्रिय शेती केली पाहिजे. तज्ज्ञ सांगतात की, आम्ही सांगतो तसे हेक्टरी ५० ते ७५ गाडय़ा चांगले कुजलेले खत टाका म्हणजे सुपीकता टिकून राहील. शेतकऱ्याला हे शक्य नसते. त्यापेक्षा दोन-चार पोती रासायनिक खत जास्त वापरू, अशी मानसिकता त्याची असते. वरील कोणत्याच मार्गाने सुपीकता पूर्वपदावर येऊ शकत नाही. कायिक स्थिरीकरण पातळी पूर्वपदावर नेण्यासाठी शेतकऱ्यांनी नेमके काय करावे अगर काय करणे शक्य आहे, यावर फारशी चर्चा होत नाही.
२)रासायनिक स्थिरीकरण – जमिनीमध्ये अनेक रासायनिक क्रिया सतत चालू असतात. यातून अनेक रसायने निर्माण होत असतात. या रसायनांच्या बरोबर अन्नांशाची प्रक्रिया होऊन काही नवीनच पदार्थ तयार होतात, ज्याला रासायनिक स्थिरीकरण असे म्हणतात.
३)जैविक स्थिरीकरण – जैविक स्थिरीकरण वनस्पतींचे अन्नांश खातात. पुढे त्यांची मृत शरीरे म्हणजे त्या अन्नांशाचा जैविक स्थिरीकरण झालेला साठा. जमिनीमध्ये प्रामुख्याने सूक्ष्मजीवांचे दोन गट कार्यरत असतात. पहिला गट सेंद्रिय पदार्थ कुजवून त्याचे खतात रूपांतर करतो, तर दुसरम गट पिकाला त्याचे गरजेप्रमाणे, मागणीप्रमाणे अन्नघटक उपलब्ध करून देण्याचे काम करतो. यापैकी सेंद्रिय पदार्थ कुजवून खतात रूपांतर करणाऱ्या जिवाणूंचा संबंध जैविक स्थिरीकरणाशी असतो. अन्नद्रव्ये उपलब्ध करुन देणाऱ्या जीवाणूंचा स्थिरीकरणाशी संबंध नसतो. प्रचलित शेती शास्त्रात चांगले कुजलेले खत वापरण्याचीच शिफारस केली जात असल्याने कुजविणारी जीवाणूसृष्टी जमिनीत वाढायला वावच नसल्याने जैविक स्थिरीकरणाच्या विषयाला मर्यादा येतात. या विषयाचा अभ्यास न झाल्याचा हा परिणाम आहे.