मागील तीन वर्षांपासून सदैव दुष्काळ सोसत असलेल्या मराठवाडय़ातील जालना जिल्ह्य़ातील परतूर या तालुक्याच्या ठिकाणापासून १७ किमी अंतरावर वसलेले ४०० लोकसंख्येचे गणेशपूर हे छोटसे गाव. गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंतची शाळा. शिक्षणाची परंपरा असलेली कुटुंबे गावात अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकी. त्यामुळे मुलांना शाळा व शिक्षक यांच्याशिवाय ज्ञान मिळविण्याचा कुठलाच स्रोत नाही. मुले शाळा सुटल्यानंतर गावभर उनाडक्या करीत फिरत असत. ही परिस्थिती बदलली जेव्हा इथल्या शाळेत प्रफुल्ल सोनावणे या शिक्षकाचे आगमन झाले.
शाळेतच नव्हे तर संपूर्ण गावातील भिंतीिभतींवर सोनावणे सरांनी ज्ञानरचनावाद उतरविला. संपूर्ण गावाच्या िभती गुलाबी रंगात रंगवून त्यावर इयत्तानिहाय अभ्यासक्रम उतरवून मुलांसह गावातील नागरिकांनाही साक्षर करण्याचा हा प्रयोग शाळेबरोबरच गावाचाही चेहरामोहरा बदलण्यास कारणीभूत ठरतो आहे. शाळेत दाखल होताच सोनावणे सरांनी शाळेच्या विकासात गावकऱ्यांचा सहभाग मागितला. गावकऱ्यांनीही त्याला भरभरून प्रतिसाद देत ३०० लिटर रंग घेता येईल एवढा निधी उभा केला. सरांचा उत्साह वाढला आणि लगेचच ते कामाला लागले. गावातील तरुणांना हाताशी धरून दिवसरात्र एक करून शाळेसह गावातील सर्व भिंतींना गुलाबी रंग दिला. शाळेतील प्रत्येक वर्गखोलीत वर्गानुरूप आवश्यक असणारी माहिती लिहिली. यात सुविचार, म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द, मराठी इंग्रजी बाराखडी, दिशाज्ञान, व्याकरण, गणिती सापशिडी, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सम-विषम संख्या, चढता-उतरता क्रम यासोबतच संतपरंपरेचा वारसा जोपासणारा मजकूर लिहून अचेतन िभतींमध्ये ज्ञानाचे प्राण फुंकले. गावातील प्रत्येक घरातील िभतीवर उजळणी, बाराखडी, पाठ जसेच्या तसे उतरविण्यात आले. याचा परिणाम असा झाला की, गावातील निरक्षर महिला, पुरुष हे िभतीवरील पाठ, बाराखडी आपापल्या मुलांकडून शिकू लागले. त्यामुळे आता गावातील मुलांबरोबरच त्यांचे आई-वडीलही साक्षर झाले आहेत. गावातील या बोलक्या िभतींमुळे गाव १०० टक्के साक्षरतेच्या मार्गावर आहे.
शाळेत राबविले जाणारे उपक्रम
- दिनांक तो पाढा
मुलांना पाढे सहज व हसत-खेळत पाठ व्हावे यासाठी जो दिनांक तो पाढा हा उपक्रम सकाळी परिपाठात घेतला जातो. त्यामुळे मुले आत्मविश्वासाने पाढे म्हणतात. मुलांमधील पाढय़ासंबंधीची भीती नाहीशी होऊन न्यूनगंड दूर होण्यास मदत झाली आहे. मुले आनंदाने पाढे म्हणण्यास पुढे येतात. त्यातून त्यांच्यात सभाधीटपणा निर्माण होण्यास मदत होते.
- चिठ्ठीखेळ
विद्यार्थ्यांसाठी चिठ्ठीखेळ नावाचा एक शैक्षणिक खेळ तयार करण्यात आला आहे. त्यात पहिली ते पाचवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा सर्व विषयांवर आधारित विविध प्रश्नांचा समावेश केला जातो. त्यात कृतीलाही तितकेच महत्त्व दिले गेले आहे. या उपक्रमामुळे वर्गात शिक्षक नसतानाही मुले स्वत: खेळाच्या माध्यमातून आनंदाने अभ्यास करतात.
- अंक सापशिडी
सापशिडीसारख्या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अंकवाचन, ओळख, लहान-मोठी संख्या, पुढची, मधली, मागील संख्या, चढता-उतरता क्रम, बेरीज-वजाबाकी यांसारख्या विविध संकल्पना समजण्यास मदत होते.
- अंताक्षरी
मुलांचे मराठी व इंग्रजी भाषेतील शब्दभांडार वाढावे यासाठी हा उपक्रम राबविला जाते. यातून मुलांना विविध नवीन शब्दांची ओळख होते. नव्या शब्दांची भर पडत गेल्याने मराठीबरोबरच इंग्रजीचे वाचन सुधारण्यासही मुलांना मदत झाली आहे.
या शिवाय प्रफुल्ल सोनावणे यांनी आतापर्यंत शाळेतील २०० मुलांना दत्तक घेऊन त्यांना वही, पेन आणि इतर शालोपयोगी साहित्य स्वखर्चातून पुरविले आहे. इतर समाजोपयोगी उपक्रमांतून त्यांनी गावकऱ्यांनाही जोडले आहे. गावातील बचत गट, माता-पालक संघ, विद्यार्थी या सर्वाच्या मदतीने संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबवले. शाळेत विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे करणे, महिलांचे हळदी-कुंकू कार्यक्रम घेणे, आशाताई व अंगणवाडी ताई यांच्या मदतीने महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी माहिती देणे, त्यासाठी महिला मेळावे साजरे करणे, नवोदय परीक्षेसाठी सकाळी व संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर रोज दोन-दोन तास सराव घेणे अशा विविध गोष्टींना त्यांनी प्रोत्साहन दिले.
- शेती-निसर्ग सहल
निसर्गाशी एकरूप व्हावे व पर्यावरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे तसेच शेतीची माहिती व शेतकऱ्यांच्या कामाचे महत्त्व समजावे यासाठी शेती सहल व निसर्ग सहल शाळा आयोजित करते. या वेळी दुष्काळग्रस्त भागातील पाण्याचे महत्त्व समजावून देऊन पाणी अडवा, पाणी जिरवा याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविले जाते. त्यासाठी प्रत्यक्ष नदीवर मुलांच्या साहाय्याने बंधारे तयार केले जातात. शालेय अभ्यासक्रमाबरोबर अशा विविध प्रकारच्या उपक्रमांतून शाळा आणि गावाला यशस्वीपणे जोडण्याचे काम शाळेत अखंड सुरू असते. गावाच्या भिंतींना बोलके करत ज्ञानाचा झरा केवळ शाळेतच नव्हे तर संपूर्ण गावात खळाळता ठेवणाऱ्या या शाळा शिक्षकाचे कौतुक करावे तितके कमीच आहे.
शिक्षणहक्क कायद्यामुळे खेडय़ापाडय़ातील शाळांमध्येही ‘ज्ञानरचनावाद’ उतरतो आहे. एका ध्येयवेडय़ा शिक्षकाच्या प्रयत्नातून, त्याने राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून जालना जिल्ह्य़ातील परतूर या दुष्काळग्रस्त गावातील जिल्हा परिषद शाळेतही ज्ञानरचनावादाची एकएक वीट रचली जाते आहे..
reshma.murkar@expressindia.com