..आयटीमध्ये काम करत असलेल्या ४५ वर्षीय सुहासने नैराश्याने ग्रासले म्हणून मदतीसाठी फोन केला. नैराश्य कशाचे हे जाणून घेण्यासाठी त्याच्याशी बोलले तेव्हा लक्षात आलं, मागील काही आठवडे अथकपणे तो कंपनीचे काम करण्यासाठी ऑनलाइन आहे. तहान-भूक-झोप यांपैकी कशाकडेही त्याचे लक्ष नाही. सध्या सर्वत्र दाटलेल्या अनिश्चिततेच्या काळात आपली नोकरी टिकवणे महत्त्वाचे आहे, या एकाच विचाराने त्याला ग्रासले आहे. त्यातून आधीच असलेला रक्तदाबाचा त्रास आणखी उफाळून आला आहे.
३५ वर्षांची आयटीमध्येच काम करत असलेली अर्चना नवरा आणि लहान बाळाबरोबर घरात बंद आहे. घरी येणारी मदतनीस सध्या नाही. बाळाला सांभाळणे, स्वयंपाक, घरातील इतर सगळी कामे शिवाय करीअरची गरज म्हणून सतत कंपनीच्या कामासाठी उपलब्ध राहण्याचे दडपण. ही तारेवरची कसरत सहन न होऊन अर्चनाची चिडचिड वाढली. दिवसभराचं वेळापत्रक कोलमडलं. त्यामुळे त्याचा परिणाम घरात लहान बाळावर हात उचलण्यापर्यंत झाला. तिने मला फोन केला तेव्हा सगळ्यात आधी मी तिला शांत हो असा सल्ला दिला. सुपरवुमन होण्याची धडपड नको, आधी स्वतचे आरोग्य सांभाळ. खाणे-पिणे, व्यायाम सुरू कर. घरगुती गोष्टींत नवऱ्याची मदत घ्यायचा संकोच करू नको, असा सल्ला तिला दिला.
असे अनेक चिंताग्रस्त नागरिक सध्या मदतीसाठी फोन करत आहेत. याचं कारण अचानक लाभलेला संपूर्ण निवांतपणा! सध्या आपण सगळेच उपभोगत असलेल्या सक्तीच्या, जबरदस्तीच्या घरी बसून राहायच्या सुट्टीत आपल्या जीवनशैलीत खूप बदल झाले आहेत. अनेक बंधनं मानवी मनांवर अचानकच आली. मुक्तपणे बाहेर, मोकळ्या वातावरणात श्वास घेणारी मनं घरातील चार भिंतीत, आपल्याच माणसांत घुसमटायला लागली. घरातून ऑफिसचे काम करताना कुठेतरी चिडचिड, अस्वस्थता, कामाचे वाढलेले तास या सगळ्या गोष्टींशी जुळवून घेणे कठीण होऊ लागले. रात्रीच्या झोपेवर, खाण्यापिण्यावर याचा विपरित परिणाम होऊ लागला. सतत करोनाच्या बातम्यांमुळे पुढील भविष्याची चिंता काही जणांना सतावू लागली आहे. तर काहींना अगदी एकटेपणाची नकारात्मक भावना, अनिश्चितता यांसारख्या मानसिक ताणातून जावे लागत आहे. त्यामुळे घरातील शांतता हरवते आहे. मानसिक स्वास्थ्याविषयी बोलायचे तर मनाचा विचार केला पाहिजे. मन म्हणजेच विचार, भावना आणि वर्तनाचा त्रिकोण! आता या काळात ही मनाची त्रिसूत्री संतुलित राहण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर काही उपाययोजना करणे फायदेशीर ठरू शकेल, ज्यामुळे स्वत:वरील, घरातील माणसांवरील होणारी चिडचिड, त्रागा कमी होईल.
ताणाचा सामना आपण सजगतेने करू शकू. या लॉकडाऊनमध्ये झालेल्या सामाजिक बदलांना मानसिक सुदृढतेने सामोरे जाण्यासाठी काही बदल आपण आपल्या वर्तनात करणे आवश्यक आहे.
१. आपला दिनक्रम नियमित असावा. झोप, खाण्यापिण्याच्या वेळा निश्चित असाव्यात.
२. व्यायाम करणे हे मनाचे संतुलन राखण्याचे उत्तम टॉनिक आहे. शारीरिक व्यायामाबरोबरच ध्यानधारणा, श्वसनाचे काही व्यायाम करावेत. त्यामुळे मन शांत होते.
३. मनातील विचार कुटुंबीयांसमवेत मोकळेपणाने बोलल्यास बरे वाटू शकते. मन मोकळे होते.
४. मन आणि शरीर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, दोन्हीचा मेळ संतुलित गतीत असेल तरच आपण प्रभावीपणे आपले काम करू शकू.
५. दुसऱ्यांचे म्हणणे, भावना समजून घेणे आणि लगेच टोकाच्या प्रतिक्रिया न देणे श्रेयस्कर!
६. प्रतिक्रियेपेक्षा विचार, धारणा तपासून, विवेकी प्रतिक्रिया देण्याची सवय चांगली.
७. मनाची लवचिकता वाढण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
८. मनाची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपल्यातील अहंकाराला तिलांजली देण्याचा सराव करणे हे मानसिक ताण वाढू न देण्यावरील प्रभावी औषध आहे. जे प्रयत्न करून सहज साध्य होऊ शकते.
९. आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींचा विचार करणे आणि त्यावर उपाययोजना करणे उत्तम.
१०. मानसिक दुरावा न पाळता सामाजिक दुरावा पाळता येतो. एखादा छंद जोपासणे, फेसबुक, व्हॉट्सअॅपवर नातेवाइक, मित्र यांच्याशी बोलणे यातून एकटेपणाची भावना कमी होण्यास मदत होऊ शकते हे नक्की!
* डॉ. मानसी देशमुख
मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक
mailmemsd@gmail.com