नाटक आणि चित्रपटांतून प्रगल्भ अभिनय करणारे डॉ. श्रीराम लागू हे त्यांच्या बुद्धिवादी विचारांसाठीही प्रसिद्ध होते. सुमारे सात वर्षांपूर्वी त्यांनी एका विशेष संवादमैफलीत ‘अतिथी संपादक’ म्हणून ‘लोकसत्ता’च्या संपादकीय विभागाशी केलेल्या मनमोकळ्या गप्पांची ही पुनर्भेट.. या चिंतनशील अभिनेत्याच्या वाटचाल आणि विचारांमागील ऊर्मी व प्रेरणांचा मागोवा त्यातून घेता येईल!

माणूस आणखी पुढे जाणार आहे, म्हणजे काय?

एखाद्या माणसानं एखाद्या तत्त्वप्रणालीला घट्ट चिकटून राहणं चूक आहे. ती प्रणाली कालबाह्य़ झाली असेल, तर ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी..’ ही प्रवृत्ती स्वीकारली पाहिजे. नाही तर तो माणूस हट्टी म्हणून ओळखला जाईल. परंतु म्हणून मी हा जो काही विचार मांडला आहे, तोच बरोबर आहे, असाही माझा दावा नाही. त्या विचाराला छेद जाऊ शकतात.

‘सिंहासन’च्या वेळेस जी काही राजकीय परिस्थिती होती, ती आजही थोडय़ाफार फरकानं तशीच आहे. कारण हे विचार वर्षांनुवर्ष समाजात मुरलेले असतात. त्यात आमूलाग्र बदल करायचा असेल, हे विचार समूळ उखडून टाकायचे असतील, तर त्यासाठी थोडय़ाफार लोकांनी का होईना, सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे.

माझ्या मते, माणूस हा इतर प्राण्यांसारखा एक प्राणी आहे, पण त्याच्याकडे एकच शक्ती जास्त आहे; ती म्हणजे-विचार करणं! या एका शक्तीमुळेच तो उत्क्रांतीच्या शिडीवर एक पायरी वर आहे. परंतु उत्क्रांतीची ही प्रक्रिया इथेच थांबणार नाही, तर ती अशीच पुढे चालू राहणार आहे. माणूस आणखी पुढे जाणार आहे म्हणजे काय, याची कल्पना शॉसारख्या माणसांनी ‘सुपरमॅन’च्या माध्यमातून मांडली होती. मानवाच्या उत्क्रांतीचा एकूण इतिहास पाहिला, तर ते सहजशक्य आहे. त्यावेळी तुम्ही-आम्ही काय, पण आपली दहावी पिढीही कदाचित अस्तित्वात नसेल. पण ही प्रक्रिया अशीच निरंतर चालू राहील.. त्यानंतरही..