कबड्डी हा मराठी मातीतला खेळ. क्रिकेटच्या झगमगाटात झाकोळला गेलेला. पाटण्यात गेल्या वर्षी झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं विश्वचषकाला गवसणी घालून देशाचा तिरंगा अभिमानानं फडकावला. या विजयात मोलाचा वाटा उचलला तो दीपिका जोसेफ, अभिलाषा म्हात्रे आणि सुवर्णा बारटक्के या महाराष्ट्राच्या सुवर्णकन्यांनी. क्रिकेटपटूंप्रमाणेच कबड्डीपटूही कोटय़धीश झाल्या, हा ‘न भूतो, (कदाचित) न भविष्यती’ क्षण महाराष्ट्राने अनुभवला. कबड्डीतील आपली आजवरची कारकीर्द, कबड्डीतले ते खडतर दिवस हा सर्व प्रवास दीपिका, अभिलाषा आणि सुवर्णा यांनी ‘लोकसत्ता’ भेटीदरम्यान उलगडला.
कबड्डीवरील प्रेमामुळे घरच्यांचा विरोध मावळला – अभिलाषा
दुखापतीनंतर कबड्डी खेळू शकणार नाही, याची भीती वाटायची
कबड्डी हे माझे आयुष्य आहे. या खेळावर मी जीवापाड प्रेम करते. कबड्डीच्या प्रवासात मी अनेक चढ-उतार पाहिले. कोणत्याही बक्षिसासाठी किंवा अपेक्षेसाठी कबड्डी खेळले नाही. या खेळामुळे मला आनंद मिळायचा म्हणून मी कबड्डी खेळायचे. माझी कबड्डीची सुरुवात छान झाली. कमी वयातच नोकरी मिळाली, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळायला मिळाले. त्यानंतर दुखापती आल्या, पण कबड्डीमुळे हे वाईट दिवस आले, असे मी म्हणणार नाही. दुखापती हा खेळाचाच भाग आहे. माझ्या दोन्ही पायांना दुखापत झाल्याने कबड्डी खेळू शकेन, असे वाटले नव्हते. पण मी जिद्दीने उभी राहिले आणि विश्वचषकापर्यंत मजल मारू शकले.
प्रत्येक खेळात संरक्षणासाठी साधने असतात. पण कबड्डी हा शारीरिक ताकदीचा खेळ असल्यामुळे दुखापती खिशात घालूनच आम्हाला खेळावे लागते. डॉ. अनंत जोशी आणि माझ्या सरांनी माझ्यावर भरपूर मेहनत घेतली आणि माझा आत्मविश्वास वाढवला. चांगला खेळ करायचा, याच उद्दिष्टाने मी पुन्हा मैदानावर परतले. दुसऱ्या दुखापतीच्या वेळी मला दिल्लीतून उचलून आणले होते. पण वडील माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.
महाराष्ट्रात क्रीडासंस्कृतीचा अभाव
आम्ही सुरुवात केली होती, तेव्हा आमच्यावर क्लासेस किंवा अभ्यासाचे दडपण नव्हते. पण आताच्या मुली डान्स क्लासेस, चित्रकला क्लासेस किंवा टय़ुशन हे सर्व आटोपून मैदानावर येतात. मुलाने कबड्डीचा श्रीगणेशा करण्याआधीच ‘माझा मुलगा कबड्डीपटू होईल का,’ अशीच विचारणा पालक करतात. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. महाराष्ट्रात क्रीडासंस्कृतीचा अभाव जाणवतो. पण आता शाळांनीही आपले संघ बनवायला सुरुवात केली आहे. आगामी काळात कबड्डीला सुगीचे दिवस येतील, अशी अपेक्षा आहे.
अभ्यास, खेळ हा समतोल साधणे कठीण
गेल्या वर्षी परीक्षेदरम्यान आम्ही पाटण्यात विश्वचषक खेळायला गेलो. त्यानंतर ऑक्टोबरच्या परीक्षेच्या वेळी मी गुजरातला होते. आदल्या दिवशी पुस्तक उघडले आणि परीक्षेला बसून पास झाले, असे होत नाही. त्यासाठी पूर्वतयारी महत्त्वाची असते. त्यामुळे खेळाडूला खेळ आणि अभ्यास यांचा समतोल साधणे कठीण जाते. खेळाडूंना परीक्षेची विशेष तरतूद असायला हवी. खेळाडूंचे शैक्षणिक वर्ष फुकट जायला नको, हीच आम्हा सर्वाची भावना आहे.
**
कबड्डीच्या वातावरणातच घडले – सुवर्णा
इतके मोठे बक्षीस मिळेल, असे वाटले नव्हते
कबड्डीत संघांनाही कधी इतके मोठे बक्षीस मिळाले नव्हते. पण आम्हा तिघींना एक कोटी रुपये मिळाले, हे कबड्डीतील सर्वात मोठे बक्षीस असावे. इतक्या मोठय़ा बक्षिसाचा कधी विचारही केला नव्हता. पण आता आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा तेव्हाही सुरू असायची आणि आताही राहील. पण या पुरस्काराने आता आमच्यावरील जबाबदारी वाढली आहे.
कबड्डीत क्रिकेटपेक्षाही जास्त संघ
कबड्डी हा खेळ बऱ्याच देशांमध्ये खेळला जातो. जगभरातील कोणत्याही देशात कबड्डी हा खेळ आपल्यासारखाच खेळला जातो. पाटण्यातील पहिल्यावहिल्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेत १६ देश सहभागी झाले होते. क्रिकेटपेक्षाही ही संख्या जास्त होती. अमेरिका, इराण, थायलंड, जपान, तैवान, श्रीलंका, तुर्कमेनिस्तान, कॅनडा, कोरिया यांसारखे अनेक देशांमध्ये कबड्डी खेळली जाते. ऑलिम्पिकमध्ये कबड्डी खेळाला स्थान मिळवून देण्यासाठी किमान ५० देशांमध्ये कबड्डी खेळ पोहोचवणे गरजेचे आहे.
कबड्डीवरही नाटक, मालिका निघतात ही चांगली बाब
‘चक दे इंडिया’ चित्रपटानंतर हॉकीला चांगले दिवस आले. तसा एखादा सिनेमा कबड्डी या खेळावर यावा, ही इच्छा आहे. पण ‘कबड्डी कबड्डी’सारखे नाटक आणि ‘लक्ष्मणरेषा’सारखी टीव्ही मालिका कबड्डीवर निघाली, ही चांगली बाब म्हणावी लागेल. ‘लक्ष्मणरेषा’मध्ये माझी छोटेखानी भूमिका होती. या मालिकेत मेकअप करून सराव करावा लागत असल्यामुळे अवघडल्यासारखे वाटत होते. पण यापुढे कबड्डीला पुढे नेण्यासाठी चित्रपट किंवा मॉडेलिंगच्या ऑफर आल्या तरी त्याचा नक्कीच विचार करेन.
पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली
आम्हाला इनाम मिळणार नाही, असेही काही जण म्हणायचे. पण सरकारवर आमचा विश्वास होता. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला एक कोटी मिळाले, पण हे बक्षीस मिळेल की नाही, याची भीती आमच्या मनात होती, हे मात्र नक्की. या वर्षभरानंतर आमच्या डोक्यात हवा गेली आहे, असे आम्हा तिघींच्या बाबतीत कधीच झाले नाही. गेल्या वर्षभरात आम्हा तिघींचीही कामगिरी चांगली झाली असून अनेक स्पर्धामध्ये आम्ही वैयक्तिक बक्षिसे पटकावली आहेत. पुरस्कारामुळे आमचे खेळाकडे दुर्लक्ष झालेले नाही, उलट आमच्यावरील जबाबदारी वाढली आहे.
**
**
आईपेक्षा जास्त प्रेम कबड्डीवर -दीपिका
खेळाडूच्या भूमिकेतच योग्य
आम्ही सर्व खेळाडू एकत्रच सराव करत असतो. पण एखादी आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली की काही सत्कार समारंभासाठी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जाते. पण आपल्याच सहकाऱ्यांना बक्षीस देणे हे अवघडल्यासारखे वाटते. आज आपल्यातीलच सहकारी इतकी पुढे निघून गेली आहे की तीच आपल्याला बक्षीस देत आहे, अशी भावना ते स्वीकारणाऱ्याची होते. त्यामुळे खेळाडूच्या भूमिकेतच मी योग्य आहे, असे मला वाटते.
देशात सोयीसुविधांचा अभाव
बाहेरच्या देशांतील खेळाडूंसाठी अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध आहेत. बालेवाडीत ऑक्सिजनविरहित मैदान एकच आहे. अशा मैदानांवर खेळल्याने स्टॅमिना टिकवण्यासाठी मदत होते. बाहेरच्या प्रत्येक देशांमध्ये अशाप्रकारची मैदाने आहेत. पण भारतात अशा सोयीसुविधांचा अभाव जाणवतो. गेल्या काही वर्षांत कबड्डीपटूंना मिळणाऱ्या सुविधांमध्ये वाढ झाली आहे. पूर्वी कबड्डीपटूंच्या राहण्याची सोय एखाद्या शाळेत किंवा मंगल कार्यालयात केली जायची. तिकडे झुरळ, पाली, ढेकूण असे आमच्या दिमतीला असायचे. पण आता एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये, लॉजिंग-बोर्डिगमध्ये किंवा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धा असली की पंचतारांकित हॉटेलमध्ये आमच्या राहण्याची सोय केली जाते.
मातीत कबड्डी खेळायला आवडेल
आधुनिकतेच्या युगात कबड्डीने मॅटवर झेप घेतली असली तरी मला मातीतच कबड्डी खेळायला आवडेल. टी-शर्ट मातीने माखत नाही, तोपर्यंत कबड्डी खेळल्याचे समाधान होत नाही. मॅटवर खेळताना खरचटत नाही, टी-शर्ट खराब होत नाही, त्यामुळे अवघडल्यासारखे होते. त्यामुळे कबड्डी खेळण्याचा खरा आनंद मला मातीतच मिळतो.
शब्दांकन- तुषार वैती
या कार्यक्रमाचे व्हिडीओ पाहण्यासाठी http://www.youtube.com/LoksattaLive येथे भेट द्या.