अभिमन्यू लोंढे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतीत संकरित बियाणं वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्यामुळे स्थानिक पारंपरिक बियाणे लुप्त होत चालली आहेत. या लुप्त होत चाललेल्या पीक प्रजातींच्या संवर्धनासाठी सिंधूदूर्ग जिल्ह्यातील डिगस ग्रामपंचायतीतील काही तरुण पुढे सरसावले आहेत. शेतीतील जैवविविधता टिकून रहावी यासाठी त्यांनी बियाणे बँक सुरू केली आहे. स्थानिक शेतकऱ्यांकडून या बियाणे बँक मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळतांना दिसतो आहे.

पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खते, औषधांची मात्रा द्यावी लागते. परंतु बियाणे चांगले असेल तर पीकही चांगले निपजते. यासाठी चांगले दमदार बियाणे असावे लागते. त्यामुळे संकरित बियाणांच्या वापराकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मात्र पारंपरिक बियाणे मात्र आता नामशेष होण्याच्या मार्गावर आले. अनेक पारंपरिक भाताच्या प्रजाती काळाच्या ओघात नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशा बियांण्यांच्या संवर्धनासाठी मुंबईतून गावाकडे परतलेले तरुण एकवटले. त्यांनी ‘अ‍ॅग्रोकार्ट शेतकरी उत्पादक कंपनी’ स्थापन केली. आणि डिगस गावात ‘बियाणे बँक’ सुरू केली. पारंपरिक बियाण्यांचे शोध घेऊन त्यांचे शुध्दीकरण करून त्याचे जतन व संवर्धन या बियाणे बँकेच्या माध्यमातून केले जात आहे. या मोहिमेला हळूहळू आता स्थानिक शेतकऱ्यांचाही प्रतिसाद मिळू लागला आहे. या बँकेत ५२ प्रकारच्या स्थानिक जातीच्या भाताची बियाणे आज उपलब्ध आहेत. तर ३८ प्रकारच्या पालेभाज्या, शेंगभाज्या, फळ भाजी, कंदमुळे प्रकारातील बियाणे या ठिकाणी संवर्धन करून ठेवण्यात आले आहे.

सिंधूदूर्ग जिल्ह्यात पूर्वी बेळा उर्फ वालयी जातीच्या भाताचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जात असे. या भाताची पेज चवदार होते. त्यामुळे भाताला बाजारात चांगली मागणी असते. पण अलीकडे या भाताचे उत्पादन फार कमी झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन या तरुणांनी शेतकऱ्यांना वालयी भात लागवडीसाठी प्रोत्साहन दिले. यासाठी बियाणे ही उपलब्ध करून दिले. तंत्रज्ञानाची मदत दिली. पिकवलेला भात खरेदी करण्याचीही हमी दिली. त्यामुळे अनेक शेतकरी पुन्हा एकदा पारंपरिक वालयी भात लागवडीकडे वळले आहेत. याच धर्तीवर इतर पारंपरिक भात पिकांच्या लागवडीसाठी आता शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे.

शेतीतली जैवविविधता टिकावी यासाठी या ध्येयवेडय़ा तरुणांची धडपड सुरू आहे. कोकणातील इतर जिल्ह्यातही असे प्रयोग होणे गरजेचे आहे. बियाणे हा शेतीचा आत्मा आणि सर्वात महत्त्वाची निविष्ठा असून गेल्या हजारो पिढय़ांपासून शेतकऱ्यांनी विविध पिकांच्या अनेक जाती निवडल्या, सुधारणा केल्या आणि त्याचा अन्न आणि पोषण सुरक्षा, आर्थिक उन्नतीसाठी वापर केला. परंतु सध्या सुरू असलेल्या एकांगी पध्दतीच्या पीक वाण सुधारणा कार्यक्रमामुळे अनेक पीक जातीमधील विविधता अत्यंत दुर्मीळ झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन या तरुणांनी शेतीतील जैवविविधता राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

संकरित बियाण वापरण्यापेक्षा त्या भागातील वातावरणात टिकू शकतील, वाढू शकतील अशा वाणांची शेती केली पाहिजे. परंतु या स्थानिक जाती होऊ लागल्या आहेत. त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. हे ध्येय बाळगून मुंबईतून काही तरुण गावाकडे परतले आणि त्यांनी पारंपरिक बियाण्यांचे संवर्धन व जतन करण्यासाठी धडपड सुरू केली आहे. मुंबईत राहून कुणाची नोकरी करायची नाही. आपल्याच गावात प्रयोगशील शेती करायची. या उद्देशाने हे तरुण मुंबईतून आपल्या गावी परतले. आज हे तरुण शेतीतूनच चांगले उत्पन्न मिळवत आहेत. त्यांच्यामुळे इतर तरुणही शेतीकडे वळू लागले आहेत . – सचिन चोरगे, सचिव अ‍ॅग्रिकार्ट शेतकरी उत्पादक कंपनी

abhimanyu.londhe@gmail.com

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth in digus gram panchayat started seed banks to help build biodiversity zws
First published on: 26-07-2022 at 04:22 IST