सध्याची आघाडीची नायिका सोनम कपूर हिला महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर चित्रपटसृष्टीतलं महिलांचं स्थान याबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्याबद्दल सांगताना ती म्हणाली, ‘इतर क्षेत्रांप्रमाणे बॉलीवूडमध्येसुद्धा पुरुषांची मक्तेदारी पाहायला मिळते. पण असं असताना इतर क्षेत्रं वेगळी आहेत, असं मुळीच नाही. फक्त फरक इतकाच की बॉलीवूडमधल्या घटना सर्वासमोर घडत असतात. त्यांच्याबद्दल चर्चा घडत असतात. पण सध्या बॉलीवूडमधील नायिकेचे स्थान बदललेले आहे. गेल्या कित्येक वर्षांत खूपसे आशयघन सिनेमे मुलींना डोळ्यांसमोर ठेवून बनवण्यात आले आहेत. आता माझ्याबद्दलच बोलायचं झालं तर या वर्षी मी दोन खूप वेगळ्या धाटणीतले चित्रपट करते आहे. त्यातील एक आहे ‘खूबसूरत’. डिस्ने कंपनी पहिल्यांदा बॉलीवूड चित्रपटनिर्मितीत उतरणार आहे. अशा वेळी त्यांनी माझ्या बहिणीच्या निर्मिती संस्थेशी हातमिळवणी केली आहे. त्यांनीही एका महिलेवरच विश्वास टाकलाय. माझ्या दुसऱ्या चित्रपटाची निर्मिती अरबाज खानच्या निर्मिती संस्थेने केली आहे. यांचा आधीचा चित्रपट ‘दबंग’ पूर्णपणे पुरुषप्रधान होता. पण या वेळेस एका नायिकेवर पसे लावायची तयारी त्यांनी दाखवली आहे. माझा आगामी चित्रपट ‘बेवकुफिया’ मध्ये माझी दिग्दíशका महिलाच आहे. इतकेच नाही तर माझ्या पूर्ण टीममध्ये मुलीच होत्या. आज दीपिका, अनुष्कासारख्या माझ्या समकालीन नायिका चित्रपटनिर्मितीत उतरल्या आहेत. थोडक्यात काय तर बॉलीवूडमध्येसुद्धा बदलांचे वारे वाहू लागले आहेत.’