हल्ली कुठलीही नवी फॅशन आली आणि ती झटकन क्लिक होणारी असेल तर त्याची ग्लोबल फॅशन व्हायला वेळ लागत नाही. परदेशात विशेषत युरोप, अमेरिकेत प्रसिद्ध झालेली फॅशन पूर्वी आपल्याकडे यायला जमाना लागायचा. तिथे काय फॅशन सुरू आहे, हे कळण्याचे फार मार्गसुद्धा उपलब्ध नव्हते. आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. एक तर टेक्नॉलॉजी आणि दुसरं मीडियामुळे फॅशन ट्रेंड जगभर पोचायला आता अजिबात वेळ लागत नाही. दुसरं म्हणजे फॅशनबाबतीत आपण सगळेच बऱ्यापैकी ओपन झालोय. नव्या गोष्टी ट्राय आऊट करायला आपल्या सगळ्यांनाच आता खूप आवडायला लागलंय.
त्यामुळे फॅशन ट्रेंड जगात कुठेही आला असला आणि तो क्लिक झाला तर तो आपल्याकडे प्रसिद्ध व्हायला अजिबात वेळ लागत नाही. उदाहरणार्थ गेल्या काही दिवसात जगभर फेमस झालेली जेगिंगची फॅशन असो किंवा कलर डेनिम्सची क्रेझ. सगळीकडे या दोनही गोष्टी फटकन पोचल्या. अगदी ब्रँडेड स्टोअर्सपासून आपल्या नाक्यावरच्या जुन्या दुकानदारांपर्यंत सगळ्यांकडे या लेटेस्ट ट्रेंडच्या गोष्टी मिळू शकतात.
गेल्या काही दिवसात अशीच एक हटके फॅशन एकदम लोकप्रिय झालीय. – असिमेट्रिक पॅटर्नची. अगदी सेलिब्रिटीजपासून, कॉलेजमधल्या आपल्या मैत्रिणीपर्यंत सगळेजण या पॅटर्नचा ड्रेस घातलेले आपल्याला दिसत असतील.
असिमेट्रिक पॅटर्न म्हणजे ड्रेसच्या सरळ नेहमीसारख्या कट ऐवजी एका बाजूने कमी आणि दुसरीकडून जास्त कट असतो. हा कमी – जास्त कटचा पॅटर्न फ्रंड- बॅक किंवा साईड कट अशा दोनही पर्यायानं करता येतो.

खरं तर कोणत्याही डिझाईनमध्ये, कलेमध्ये सिमेट्री महत्त्वाची मानली जाते. पण या पारंपरिक समजाला छेद देणारा हा पॅटर्न म्हणूनच हटके आहे. असिमेट्रिक पॅटर्न एक बोल्ड स्टाईल स्टेटमेंट ठरतं.
असिमेट्रिक पॅटर्न वापरताना टॉप आणि स्कर्ट असे पर्याय आहेत. पण एका वेळी टॉप किंवा स्कर्ट एकच काहीतरी या पॅटर्नमध्ये असलं पाहिजे. असिमेट्रिक पॅटर्नचे टॉप ब्राईट कलरचे असतील तर उठून दिसतात. लाँग टॉपमधून हा असिमेट्रिक पॅटर्न चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ शकतो. पण पॅटर्नची छाप पाडायची असेल तर त्यावर फार डिझाईन असता कामा नये. प्लेन आणि ब्राईट कापडावर हा पॅटर्न जास्त खुलून दिसतो.
असिमेट्रिक पॅटर्नचं वैशिष्टय़ म्हणजे कुठल्याही व्यक्तिमत्त्वाला तो सूट होऊ शकतो कारण कुठल्याही प्रकारच्या आऊटफिट्समध्ये ही असिमेट्री साधता येते. जाड, बारिक, उंच, बुटक्या अशा सगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या मुलींना हा पॅटर्न ट्राय करता येईल. ज्या मुली फ्रॉक किंवा स्कर्ट वापरत नसतील त्यांना कुर्तीमधून असिमेट्री साधता येईल. कॉन्ट्रास्ट लेिंगगवर असिमेट्रिक पॅटर्नचा कुडता एकदम मस्त दिसतो. एथनिक वेअर किंवा देशी आऊटफिट्समध्ये हा वेगळा आणि बोल्ड पॅटर्न वेगळी जादू करू शकतो.
वेस्टर्न आऊटफिट्सवर तर असिमेट्री साधण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. स्कर्ट, फ्रॉक, वेस्टर्न ड्रेसेस, ऑफ शोल्डर ड्रेस यामधून ही असिमेट्री साधता येते.

अ‍ॅक्सेसरीज कोणत्या वापराल?
– असिमेट्रिक हेमचा स्कर्ट असेल तर कोणताही छान नेकपीस सूट होईल. नेकपीसचा रंग टॉपच्या रंगाशी मिळणारा नसावा. लाँग चेन पेंडंट असा पॅटर्न यावर छान दिसेल.
– असिमेट्रिक टॉप असेल तर फार हेवी नेकपीस वापरू नये. असिमेट्रिक थीमशी सुसंगत असा साधा पण आकर्षक नेकपीस वापरावा. त्यावर लाँग इअररिंग्ज मात्र सूट होतील.
– स्कर्ट, ड्रेस किंवा फ्रॉक असिमेट्रिक हेमचा असेल तर त्यावर हाय हिल्स अगदी सूट होतात. पेन्सिल हिल्सची सवय असेल तर ड्रेसच्या रंगाशी मॅच होणाऱ्या बोल्ड कलर हिल्स छान स्टाईल स्टेटमेंट निर्माण करतील.
– असिमेट्रिक पॅटर्नचा थोडा शॉर्ट स्कर्ट असेल तर लाँग बूट हा वेगळा आणि छान पर्याय असू शकतो.
– एथनिक वेअरवर वापरणार असाल तर फ्लॅट चप्पल्ससुद्धा सूट होतील.