मागच्या लेखात आपण भारतीय जेवणपद्धतीच्या शिष्टाचाराचा आढावा घेतला. त्यातील नियम हे सर्वसाधारणत: जेवणाच्या वेळी लागू पडतात. पंचाईत तेव्हा येते, जेव्हा आपण रेस्तराँमध्ये जेवायला जातो. थाळीचा अपवाद वगळता, सर्व रेस्तराँ भारतीय जेवण पाश्चात्त्य पद्धतीने सव्र्ह करतात. म्हणजे, भारतीय पद्धतीप्रमाणे पाण्याचं भांडं/पेला/फुलपात्र हे ताटाच्या डाव्या बाजूला असतं. पण नॉन-थाळी रेस्तराँमध्ये ते प्लेटच्या उजव्या बाजूला असतं. उजव्या हाताने जेवायचं तर उजव्याच हाताने पाणी कसं प्यायचं? दुसरी मजेशीर गोष्ट म्हणजे पोळी/नान/पराठा इत्यादीसाठी मोठय़ा प्लेटच्या डाव्या बाजूला एक छोटी प्लेट असते. आपल्याकडे सर्व पदार्थ एकाच ताटात असतात. त्यामुळे, डावीकडच्या प्लेटमधून ती पोळी मोठय़ा प्लेटमध्ये आणून मगच खावी लागते. भारतीय जेवण हे असं पाश्चात्त्य पद्धतीने खायचा द्राविडी प्राणायाम अनेकांना अनुभवायला मिळतो. वेगवेगळ्या जेवण पद्धतींची माहिती नसली की मजेशीर अनुभव येऊ शकतात.
ही गोष्ट सत्तरच्या दशकातली. कामानिमित्त मुंबईत आलेल्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या बायकोला पराठे कसे करतात हे शिकायचे होते. त्याने पत्नीची ही इच्छा आपल्या भारतीय सहकाऱ्याला सांगितली. त्या भारतीयाने ‘अतिथी देवो भव’ला जागून त्या ब्रिटिश दाम्पत्याला आपल्याच घरी जेवायला बोलावलं. यजमानीणबाई आपल्या पाहुण्याबाईंना पराठे शिकवायला स्वयंपाकघरात घेऊन गेल्या. पाहुण्या बाईंचा प्रयोग/प्रयत्न बऱ्यापकी सफल झाल्यानंतर यजमानीणबाईंनी त्या तिघांना जेवायला बसायची विनंती केली आणि प्रत्येकास गरम पराठे करून पानात वाढायला सुरुवात केली. ‘वेरी नाइस’ म्हणत पाहुणे जेवणाचा आस्वाद घेत होते. पाहुणीबाईंच्या दुसऱ्या पराठय़ानंतर ‘वेरी नाइस’ आल्यावर यजमानीणबाईंनी त्यांना तिसरा पराठा वाढला आणि तेच उद्गार परत ऐकल्यावर चौथाही पराठा त्यांना वाढला गेला. आता मात्र यजमानीणबाईंना काळजी वाटू लागली. नवीन प्रकारच्या जेवणाने पाहुण्यांचं पोट बिघडू नये हे त्या मागचं मुख्य कारण तर होतंच पण आपले पाहुणे किती पराठय़ांवर थांबतील हा अंदाज काही त्यांना येईना. बरं, ‘आता पुरे’ असं पाहुण्यांना सांगणार कसं? यजमानांनी हळूच सांगितलं, ‘देर इज राइस टू फॉलो’. हे ऐकल्याबरोबर पाहुणीबाईंच्या चेहऱ्यावर भीती पसरली. ‘व्हॉट? आय कॅन्त ईट एनिमोर’. हनुवटीखाली आडवा हात ठेवून म्हणाल्या, ‘आय एम अपटू हिअर विथ फूड.’ यजमान जेव्हा त्यांना म्हणाले की, नको होतं तर तसं सांगायचं, तर त्या म्हणाल्या की, नको म्हणून यजमानीणबाईंचा अपमान कसा करू शकेन? त्या देत गेल्या म्हणून मी खात राहिले. ‘तुम्ही खात राहिलात म्हणून त्या देत गेल्या.’ आपल्याला एकमेकांच्या जेवण पद्धतीची माहिती नव्हती म्हणून हा गोंधळ झाला. पुढच्या आठवडय़ात पाश्चात्त्य जेवणपद्धतीबद्दल, शिष्टाचारासंदर्भात जाणून घेऊ.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jan 2016 रोजी प्रकाशित
वाढण्याची गंमत
कुठल्या प्रकारचं जेवण कसं घ्यावं? कटलरी कुठली, कशी वापरावी?
Written by गौरी खेरविश्वनाथ गरुड

First published on: 08-01-2016 at 01:02 IST
मराठीतील सर्व फाइन डाइन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fun in food serving