माणसांना अनेक गोष्टींची बंधनं अनेक बाबतीत जाणवतात. मात्र खाद्यपदार्थाचं हे एक बरं आहे. एखादा खाद्यपदार्थ चवीला छान लागतोय म्हटल्यावर देश, प्रांत यांच्या सीमा मोडून तो लगेच पॉप्युलर होतो. अशाच साऱ्या सीमा मोडून सर्वदूर पसरलेला, आबालवृद्धांना प्रिय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे झटपट पटपट आपल्यासमोर येणारा पदार्थ सँडविच.
सँडविच असं म्हटल्यावर समोर जे काही येतं, म्हणजे ब्रेडस्लाइस, कांदा, उकडलेला बटाटा, काकडी, टोमॅटो इत्यादी जिन्नस. त्यांचा आणि या पदार्थाच्या नावाचा अर्थाअर्थी काय संबंध असावा? खूप विचार करूनही उत्तर मिळत नाही. बरं हे भारतीय सँडविच बाजूला ठेवून विविध देशांत आढळणाऱ्या सँडविचेसना आठवून बघू या. मांसाच्या स्लाइस वा अंडी वा चीज तत्सम काहीही आत भरा. सँड म्हणजे वाळू, वीच म्हणजे चेटकीण असं काहीही त्या पदार्थाशी जुळत नाही. सरळरेषेतून चालून जेव्हा अर्थ उमगत नाही तेव्हा मग वाट वाकडी करून तो शोधावाच लागतो आणि हाती येणारी माहिती गंमत वाढवते. ही गंमत म्हणजे सँडविच या पदार्थाशी एक व्यक्ती जोडली गेली आहे.
जॉन माँटेग्यू फोर्थ अर्ल ऑफ सँडविच. ही व्यक्ती म्हणजे इंग्लंडमधल्या केंट परगण्यातील सँडविच या प्रांताचे सर्वेसर्वा. सँडविच हे चक्क एका प्रांताचे नाव आहे. हे एक ऐतिहासिक शहर आहे. तिथले हे जॉन माँटेग्यू म्हणजे टोटल फूडी माणूस. असं म्हणतात की, त्यांना चविष्ट पदार्थ खाण्याचा छंद होता. त्यातही पत्ते खेळत असताना जोडीला खाणं त्यांना प्रिय होतं. आता पत्ते खेळत खायचं म्हणजे हात खराब नको. काटा-चमचा वापरायची कटकट नको. तर या जॉन माँटेग्यूंनी खरपूस भाजलेले मांस पावात गुंडाळून खाण्यासाठी देताना कुठे तरी पाहिलं होतं आणि त्यावरून त्यांनी अशा प्रकारच्या पदार्थाची ऑर्डर त्यांच्या खानसाम्याला दिली. त्यामुळे त्या पदार्थाला सँडविच हे नाव पडलं असावं अशी शक्यता सांगितली जाते. शक्यता असं म्हणण्याचं कारण हेच की, अगदी अश्शीच एक कथा म्हणजे दंतकथा वाचनात आली होती. एक व्यक्ती अगदी हॉटेल बंद होता होता पोहोचली. ती अतिशय भुकेली होती. सर्व जेवण संपलं आहे, असं त्या व्यक्तीला सांगण्यात आलं. पण भुकेने कळवळणाऱ्या त्या व्यक्तीने पुन:पुन्हा विनंती केल्याने शेफने जे काही उपलब्ध आणि झटपट बनण्यासारखं होतं ते बनवून त्या व्यक्तीला दिलं. हा पदार्थ नवा होता. हॉटेल समुद्रकिनारी होतं. हॉटेलचं नाव सँडविच होतं. त्यामुळे पदार्थालाही सँडविच म्हटलं जाऊ  लागलं. आता यातली खरी कथा कोणती याचा शोध घेणं अवघड आहे. कारण वाळूतल्या चेटकिणीचा या पदार्थाशी संबंध काय हे शोधताना समुद्रकिनाऱ्यावरच्या हॉटेलला सँडविच नाव असू शकतं हे जितकं पटतं तितकीच, सँडविच परगणा आणि जॉन माँटेग्यूंची कथाही पटते.
औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात हा पदार्थ खूपच लोकप्रिय झाला. कारण तो बनवायला झटपट होता, न्यायला सोपा होता आणि सगळ्यात महत्त्वाचं तो स्वस्त होता. तेव्हापासून सँडविचने कमावलेली ही लोकप्रियता आजही अबाधित आहे. आपल्या खाण्यात तर सँडविच येतंच पण बोलण्यातही, ‘मधल्या मध्ये माझं सँडविच झालं’. यातून त्या पदार्थाची नेमकी गंमतही व्यक्त होते.
एक व्यक्ती, एक हॉटेल यांच्याशी जन्माचा संबंध जोडलेला हा पदार्थ देश, प्रांत यांच्या सीमा तोडून देशोदेशीच्या घरांत अतिशय हक्काने स्थायिक झालाय, हे सँडविचचा घास घेत त्यातला एकही जिन्नस खाली न सांडवता नेटकेपणाने खाणारी थोर व्यक्तीच काय पण कुणीही सांगेल!
  संग्रहित लेख, दिनांक 8th Jan 2016 रोजी प्रकाशित  
 सँडविच
अगदी आपल्या वाटणाऱ्या पदार्थाचं मूळ परदेशी असतं तर परक्या देशातून आलेल्या एखाद्या पदार्थाचं कूळ
Written by रश्मि वारंगविश्वनाथ गरुड
 
  First published on:  08-01-2016 at 01:03 IST  
मराठीतील सर्व खाऊच्या शोधकथा बातम्या वाचा.  मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)  वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sandwich