मैत्रेयी कुलकर्णी, नेपल्स, इटली
‘नेपल्सला गेलात तर तुम्ही दोनदा रडता. पहिल्यांदा तिथे गेल्यागेल्या आणि दुसऱ्यांदा तिथून निघताना’, अशा आशयाची म्हण इटालियन भाषेत आहे. आता मी पडले ‘शब्दाला जागणारी’ मुलगी! अस्मादिकांना कंपनीने प्रोजेक्टसाठी वर्षभर नेपल्स, इटली इथे पाठवलं होतं, तेव्हा अक्षरश: हे वाक्य जगले! नेपल्स बाकी मुख्य युरोपियन शहरांसारखं शहर नाही. एकदा नेपल्स – इटली असा ‘गुगल सर्च’ करून बघावा. तिसराच रिझल्ट ‘व्हाय नो वन वाँट्स टू ट्रॅव्हल नेपल्स’ असा येईल. त्यात ते माझं पहिलंच सीमोल्लंघन. तिथे जाणारी मी प्रोजेक्टमधली पहिलीच भारतीय, एकटीच मुलगी (हे उगाचच!). तिथे ना धड कुणी ओळखीचं.. असं भरपूर ओझं पाठीवर घेऊन गेलेले. पहिले काही दिवस गेले रडापडीत (उगाच खोटं कशाला बोला ना!) पण हळूहळू ते ओझं हलकं होत गेलं आणि त्या वर्षभरात आलेले भन्नाट अनुभव, केलेली फिरस्ती, भेटलेली माणसं आणि गोळा केलेल्या आठवणींनी मला पार वाकवून टाकलं. हे गाठोडं आता चिक्कार काळासाठी पुरेसं आहे, कारण नेपल्स माझं वर्षभराचं घर होतं!
प्रचंड वैभवशाली भूतकाळाच्या खुणा मिरवणारं हे शहर तसं आपल्याला माहिती ते नापोलिटन पिझ्झामुळे (नेपल्सचं इटालियन नाव नापोली). पिझ्झाचा शोध लागलेल्या या शहरात अगदी कोपऱ्यावरच्या बारक्या हॉटेलात पण जगातला भारी पिझ्झा मिळतो. इथे पिझ्झा म्हणजे जिभेचे चोचले, रंगीबेरंगी भाज्या, चीजचा भडिमार आणि खिशाला भार नाही. इथे पिझ्झा या सगळ्याच्या अलीकडे सुरू होतो. तो कधी गडबडीच्या वेळी पटकन तोंडात टाकायची गोष्ट असतो, कधी दमल्याभागल्या जीवाच्या पोटाचा आधार, कधी रविवारच्या सगळ्या कुटुंबासोबतच्या जेवणाचा महत्त्वाचा भाग तर कधी संध्याकाळी मित्रांबरोबर गप्पांचा फड जमवायच्या वेळी हमखास हजर असणारा भिडू. अगदी साध्यातला साधा पिझ्झा इथे कायम सुरात गाणारा कलाकार असतो. तो कायम रंगत जातो, चढत जातो आणि आपण त्याच्या आसपास रेंगाळत राहतो. ही गोष्ट एकुणातच खाण्याच्या सगळ्याच पदार्थाची. तो एका वेगळ्या लेखाचाच विषय होईल! इथली टिपिकल घरगुती वातावरणातली खाद्यपरंपरा ‘खाण्यासाठी जन्म आपुला’ या उक्तीला सार्थ ठरवते. अरे हो, सस्पेंडेड कॉफी इथलीच! फार सुंदर कल्पना आहे ही. म्हणजे आपण एक कॉफी घेताना पैसे २ कॉफीचे भरायचे, म्हणजे नंतर ज्याला गरज असेल त्याने सस्पेंडेड कॉफीसंदर्भात विचारणा केल्यास त्याला फुकटात कॉफी मिळते. असे कॅ फे अजूनही नेपल्समध्ये सापडतात.
पोटोबानंतर विठोबा शोधायचा म्हटलं तरी फार काही धावाधाव करावी लागत नाही. शंभराहून अधिक चर्चेस, कमीतकमी २८०० वर्षांच्या गोष्टी सांगणाऱ्या मिडीव्हल, रेनेसाँ आणि बारूक पद्धतीच्या इमारती, तीन वैशिष्टय़पूर्ण किल्ले, संग्रहालये, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून मिरवणारं आणि युरोपमधलं सगळ्यात मोठं सिटी सेंटर, जमिनीच्या फक्त वरच नाही तर खालीही आढळलेले आणि जतन करून ठेवलेले ग्रीक-रोमन अवशेष.. ही यादी मारुतीच्या शेपटासारखी वाढणारीच! नेपल्सपासून अध्र्या तासावर आहे जगप्रसिद्ध ‘पॉम्पेई’. पार इ.स. ७९ मध्ये ज्वालामुखी उफाळल्याने गाडली गेलेली, आता जतन करून ठेवलेली आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट असणारी ही जागा आणि युरोपमधला एकुलता एक माऊंट व्हेसुव्हियस पाहायला जगभरातले पर्यटक इथे गर्दी करतात.
असो. काही म्हटलं तरी ही झाली दगडधोंडय़ांची कला. म्हणजे अंगात नाना कळा असल्या, तरी ही नाही बाबा आपल्या अंगात. म्हणजे हे आहेच, पण माझं लाडकं ते गाणं, संगीत, चित्र आणि त्याचं रसग्रहण. ते इकडे ओसंडून वाहतं. सर्वसामान्यांच्या तोंडी असेल ते शहराचं गाणं अशी फुटपट्टी लावायची झाली तर इथल्या कलासक्त मनांना मी १० पैकी १० गुण देईन. सुट्टय़ांच्या दिवशी, पर्यटनाच्या हंगामात, सिटी सेंटरला अनेक गुणी कलाकार आपली कला सादर करताना दिसतात. गाणी, नृत्य, चित्रकला.. नाव घ्याल ती कला आहे आणि फारच सर्वसमावेशक बाबा! एकदा गावात फेरफटका मारताना मला मदर मेरीचं हातात पिस्तूल घेतलेलं भित्तीचित्र दिसलं. खोटं नाही सांगत, जरा उडालेच! लगेच तिथल्या मैत्रिणीला फोन केला तर तिने प्रसिद्ध ग्राफिटीवाल्या बॅन्क्सीबद्दल सांगितलं. या ब्रिटिश भित्तिचित्रकाराबद्दल सुरुवातीला तो बाबा आहे का बाई, हेही मला माहिती नव्हतं. पण माहिती घेतल्यावर त्याच्या प्रेमातच पडले. त्याचं ‘मॅडोना विथ पिस्तूल’ हे इटलीमधलं एकुलतं एक उरलेलं आणि जतन करून ठेवलेलं काम नेपल्समधल्या खोलवर रुजलेल्या कॅथलिझम आणि बरोबरीने शहरात वाढणाऱ्या गनक्राईमवर भाष्य करतं. एकुणातच कलेला मखरात बसवणं किंवा अगदीच खडय़ासारखं बाजूला काढून ठेवणं काही मला इथं दिसलं नाही.
कला आणि कलाकार यावरून एक गंमत आठवली. एकदा ऑफिसमध्ये काम करताना मला आपल्या ‘नशा ये प्यार का नशा हे’ची धून ऐकू आली. आईशप्पथ!! म्या पामराला सोडून अजून कुणी भारतीय आलाय का, हे मी पाहिलं तर माझाच सहकारी गुणगुणत होता. अगदी सेकंदभर का होईना, पण आपल्या बॉलीवूडच्या प्रसाराच्या विचारानं मन भरून आलं. पण चौकशी केल्यावर कळलं की त्याच लयीत एक खूप जुनं इटालियन गाणं आहे. मग काय सांगता! चोरीच्या आरोपाखाली गमतीगमतीत मीच बिचारी झाले. पण खरंच बॉलीवूडमधलं कुणी माहिती आहे का, हे विचारल्यावर बाकी सगळे सुपरस्टार्स सोडून मला पहिलं नाव कळलं ते कबीर बेदीचं! कुण्या इटालियन सीरियलमुळे तो तिकडे फार फेमस आहे म्हणे. ऐकावं ते नवल होतं माझ्यासाठी!
कलेच्या संदर्भात बोलताना रोमच्या उल्लेखाशिवाय पुढे जाता येणार नाही. खरं तर एका ओळीत रोमला उरकणं हा त्या शहराचा अपमान केल्यासारखं आहे! जलद ट्रेनने गेल्यास नेपल्सपासून अगदी दोन तासावर असणारं हे ठिकाण म्हणजे चालताबोलता इतिहास आहे. इथे प्रत्येक वळणाची गोष्ट आहे. एक वेगळीच दुनिया आहे. डॅन ब्राउनच्या दुनियेतील रोम, रोमन हॉलिडेवालं रोम, व्हॅटिकन सिटीच्या पॉवरहाऊसवालं रोम, ‘सुख’ या शब्दाला समानार्थी असणाऱ्या जिलाटोचं रोम, एका दिवसात बांधलं न गेलेलं रोम.. ही मला दिसलेली काही रूपं. इथे तीनदा जाणं झालं, तरी मी ठामपणं म्हणू शकत नाही की मी रोम पाहिलंय म्हणून, इतकं कायकाय तिथे आहे.
नेपल्समधले लोक जितके गोड तितकेच, अंमळ जास्तच लाऊड! जोरजोरात हातवारे करत, आपल्याच मस्तीत हसतखिदळत जथ्थ्यानं जाणारी तरुण मुलंमुली जिकडेतिकडे पाहायला मिळतात. जराशी जुजबी ओळख आणि तुम्ही दोस्त बनणार. जरा तारा जुळल्या तर अगदी कुटुंबाचा हिस्सा पण. इथली कुटुंब व्यवस्था तशी मजबूत. अगदी गरज पडत नाही तोपर्यंत तरुण मुलं आपल्या आईवडिलांबरोबर राहतात. म्हणूनच की काय, माझ्या इटालियन हाऊसमेटला कितीतरी वेळ पचनीच पडत नव्हतं की मी एक वर्ष माझ्या घरच्यांपासून दूर राहते आहे ते. मी नेपल्समध्ये दोन इटालियन कन्यकांबरोबर घर शेअर करून राहात होते. एकीशी माझं जास्त जमायचं. लहानशी होती ती. पहिल्यांदाच घरच्यांना सोडून राहत होती. तिला तिचं इंग्लिश सुधारायचं होतं. आम्ही जगभरच्या गप्पा मारायचो. तिला भारताबद्दल अगदीच काही माहिती नव्हती. मग मी तिला भारतदर्शन घडवायचे आणि त्याबदल्यात ती मला तिचं नवं कॉलेज, तिला नुकताच आवडलेला एक मुलगा, केमिस्ट्रीची वाटणारी भीती, तिचे भविष्याचे प्लॅन्स असं काय काय तिच्या तोडक्यामोडक्या इंग्लिशमध्ये सांगायची. ती माझं ‘घर’ होती आणि माझ्या सुदैवाने अशी अनेक सुंदर माणसं आणि घरं मला तिथं मिळालेली. भारतीय तसे तिकडे कमी. म्हणजे आशियायी भरपूर, पण मला भेटलेले भारतीय कमीच. जे होते ते पीएचडी करायला आलेले. काहीतरी चटपटीत खावंसं वाटल्यावर आमची डब्बापार्टी असायची.
तिथे वर्षभरच असल्याने शक्य होईल तेवढं फिरायचं उद्दिष्ट होतंच. मग कुणी मस्त सोबत असेल तर त्यांच्याबरोबर किंवा एकला चलो रे म्हणत १०-१२ देशात भ्रमंती करून झालेली. तेव्हा गोड गोडवाला युरोप, रंगीबेरंगी पाहता आला. बाकी गोष्टी आजकाल ऑनलाइनही सापडतात पण ट्रिपमध्ये लक्षात राहिली ती माणसं! वाटलंही नव्हतं की, बुडापेस्टला गेले असताना डॅन्यूबच्या तीरावर न्यूझीलंडमधल्या आजीशी मी नर्मदा परिक्रमेबद्दल गप्पा वगैरे मारेन. तो एक अविस्मरणीय किस्सा.. बुडापेस्टला हॉस्टेलमध्ये न्यूझीलंडवरून आलेल्या एका जोडप्याशी ओळख झालेली. साठीचे असतील कमीतकमी. नदीकाठची शहरं आणि त्यात जाणवणारा प्रवाहीपणा यावर गप्पा चाललेल्या असताना त्यांनी माझ्यावर बॉम्ब टाकला, तो त्यांना ‘नर्मदा परिक्रमा’ करायची आहे पुढच्या वर्षी, हे सांगून. परिक्रमेच्या तयारीसाठी त्यांनी नॉनव्हेज सोडलेलं आणि त्या तेव्हा शारीरिक आणि मानसिक सामथ्र्य वाढवण्याच्या प्रयत्नात होत्या. त्यांना सरदार प्रकल्पापासून ते मेधा पाटकरांपर्यंत सगळी माहिती होती. त्यांच्या लेखी भारतीय खूप सुदैवी, कारण आपल्याकडे खूप वैविध्यपूर्ण नद्या आहेत. बरीच माहिती होती त्या आजींना! शिकण्याचं, नवे अनुभव घेण्याचं, वय हे चिरतरुण असतं, असं मी ऐकलेलं. त्या दिवशी प्रत्यक्ष पाहिलंही.. दुनियाभरातले लाखो जीव वारं प्यायल्यासारखे इकडून तिकडं संचार करत असतात, आपली पोतडी भरत असतात. इतकं सहज असतं लोकांचं फिरणं. कासवाचं बिऱ्हाड जसं, जाऊ तिथं मिसळून जाणं, समोर आहे ते टिपून घेणं, हवं तसं व्यक्त होत राहणं, ‘जग’ते रहो म्हणणं.. एक लय असते या आयुष्याला. कधी संथ, कधी सरसरती, कधी मंद, कधी भिरभिरती. मजा असते या मस्तीत, शिकणं असतं, शिकवणंही असतं. युरोपभर भटकंती करत असताना संध्याकाळी परत यावंसं वाटावं, असं घर मला एक वर्ष नेपल्समध्ये मिळालं. सगळंच हसीन नव्हतं आणि म्हणूनच छान होतं. तिथून निघताना ज्या इटालियन म्हणीचा मी सुरुवातीला उल्लेख केला, त्याची खरी प्रचीती आली होती. रोमला गेले असताना तिथल्या फोन्टाना दी त्रेव्हीमध्ये नाणी टाकून आलेय. (असं म्हणतात की त्या कारंज्यात नाणी टाकली तर आपण परत तिथे येतो.) म्हणजे परत जायची मला संधी मिळणार आहे, या एका विचाराने मी तशी निष्टिद्धr(१५५)ांत आहे.
संकलन : राधिका कुंटे
viva@expressindia.com