अथर्व आठवले, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
माझा मुंबई-पुणे-मेलबर्न प्रवास काहीसा विचित्र आणि बराचसा माझ्यासाठी शिक्षण क्षेत्राची विविध दालनं उघण्यासाठीच असावा, असं मागं वळून बघताना निश्चितच मनात येतं. आई-बाबांनी कायम स्थायिक होण्यासाठी ऑस्ट्रेलियन व्हिसा मिळवल्यानंतर माझं ऑस्ट्रेलिया ते भारत येणं-जाणं घडू लागलं. सातवी, आठवी मेलबर्नमधल्या चांगल्या शाळेत शिकूनही अभ्यासातील लक्ष उडालं. फारसे कोणी मित्र मिळाले नाहीत. बुलिंग झालं. अर्थात बुलिंग होतं आहे, हे कळण्याचं माझं वयही नव्हतं; परंतु त्यामुळे आईने मला परत पुण्याला घेऊन जायचा निर्णय घेतला. पण इंडिया स्टाइल अभ्यास करण्याची, परीक्षा देण्याची म्हणजेच ‘घोका आणि ओका’ ही पद्धत मला मुळीच आवडली नाही. त्यामुळे इंजिनीअरिंगला प्रवेश घेईपर्यंत मी आईला प्रचंड त्रास दिला. शेवटी माझ्या मनाची तयारी झाल्यावर (कारण शाळेचा वाईट अनुभव) बाबांनी मला मेलबर्नला नेलं. ‘रॉयल मेलबर्न इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’सारख्या अत्यंत नावाजलेल्या युनिव्हर्सिटीमध्ये मला इंजिनीअरिंगला प्रवेश मिळाला. त्यानंतर माझ्या अभ्यासाची गाडी सुस्साट वेगाने धावू लागली. कारण इथे पुस्तकांचं कोणतंही बंधन माझ्यावर नव्हतं आणि हा प्रवास मी खूप एन्जॉय केला. स्वत:च्या विचारांना चालना देत ‘आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग’ करण्याची पूर्ण मुभा इथे सर्वाना आहे. या पद्धतीमुळे माझ्या विचारांचा परीघ विस्तारला आणि मोठं क्षितिज मला खुणावू लागलं.
भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या शैक्षणिक अभ्यासक्रमातला ठळक फरक चटकन जाणवण्याजोगा आहे. इथे बहुतांशी मुलं स्वबळावर पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतात. बहुतांशी वेळा स्वत:ची फी, बाहेर खाणं-पिणं, वीकएण्डला एखाद्या टुरिस्ट स्पॉटला फिरायला जाणं इत्यादी सर्व खर्च स्वत:च करतात. त्यासाठी कुठेही जॉब करायची त्यांची तयारी असते. मग भले एखाद्या मोठय़ा बिझनेसमनचा मुलगा असला तरी फुडचेनमध्ये किंवा ग्रोसरीच्या चेकआऊ ट काऊंटरवर काम करायला त्यांना कोणताही कमीपणा वाटत नाही. कारण इथे ‘लेबर डिग्निटी’ आहे. आपण पालकांवर अवलंबून नाही, याचा त्यांना कायम अभिमान वाटतो. माझा सर्वात मोठा आनंद माझे विचार किंवा विचार करण्याची प्रक्रिया. माझा अभ्यास हा स्वविचारांनी करता आला. स्वत:चे विचार व त्यावरून मिळालेल्या दिशेने अभ्यास करून स्वतंत्रपणे (कोणतीही कॉपी-पेस्ट न करता) प्रोजेक्ट करायची संधी मला मिळाली आणि त्यात मला गोल्ड मेडलही मिळालं. पुस्तकी ज्ञानापेक्षा स्वत:च्या विचारांनी मोठमोठी प्रोजेक्ट्स व असाइनमेंट्स करायला मिळाल्या. त्यामुळे विचारांना चालना मिळाली. हा खूपच मोठा फरक आहे दोन्हीकडच्या शिक्षणांतला!
प्रत्येकाचा अभ्यासविषय, प्रोजेक्ट, असाइनमेंट्स हे स्वत:च्या विचारांना चालना देऊ न करा. तरच ते तुमचं स्वत:चं ज्ञान असेल. त्याच्या बळावर तुम्ही खूप मोठी झेप घेऊ शकाल, असं मला वाटतं. मेलबर्नला आलेला तरुण हा इथल्या लाइफस्टाइलचा लगेचच एक भाग बनून जातो. मेलबर्न म्हणजे पुण्यासारखं, तर सिडनी म्हणजे मुंबईसारखं, असा जणू एक अलिखित ठराव असल्यासारखाच आहे. त्याला इथल्या कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये लगेच आपलंसं केलं जातं. प्रत्येक अॅक्टिव्हिटी, असाइनमेंटमध्ये सहभागी करून घेतल्याने एकटेपणा किंवा गोऱ्या लोकांबरोबर मिसळण्याची भीती त्यांना वाटू नये याची काळजी घेतली जाते.
आपले सणवार खूप उत्साहात साजरे होतात. मेलबर्नमधील महाराष्ट्र मंडळ खूप सक्रिय आहे. आता ‘युवा’ ग्रुप सुरू झाला असून त्यातील अत्यंत दर्जेदार कार्यक्रम तरुण पिढीतर्फे बसवले जातात. त्यातील बहुतांशी मुलं इथंच राहिलेली-वाढलेली असतात. मराठी कच्चं असूनही केवळ कार्यक्रमासाठी ते छान मराठी शिकतात. त्यात छान नाटकं, करमणुकीचे कार्यक्रम, नृत्य, आपल्या संस्कृतीच्या माहितीवर आधारित छोटेसे कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची लोकधारा’ किंवा सणवारांशी संबंधित कार्यक्रम किंवा जुन्या-नव्या कलाकारांचा सहभाग असणारे कार्यक्रम असे एकापेक्षा एक चांगले कार्यक्रम आमची युवा पिढी सादर करते. गणपती-गौरी, दिवाळी, गुढीपाडवा आदी सणावारांना तर अगदी पर्वणीच असते. मी स्वत: खूप सोशल नसल्याने या सगळ्या अॅक्टिव्हिटीत थोडा मागेच असतो.
इथली तरुण मुलं-मुली त्यांच्या प्रत्येक अभ्यासक्रमांच्या निवडीबाबत खूप चोखंदळ असतात. या अभ्यासक्रमांत आर्ट, परफॉर्मिग आर्ट, नाटय़कला, बॅले, ऑपेरा, संगीत, पियानो, चित्रकला, ग्राफिटी, योग, पिलाटो, भाषिक कौशल्य अशा विविध कलांचा समावेश असतो. स्वत: निवडलेल्या कला अभ्यासक्रमात स्वत:चे प्रयत्न करून ते अगदी पूर्णपणे त्यात झोकून देतात. त्यांच्यावर कोणीही कसलीही जबरदस्ती केलेली नसते. त्यांचीच आवड आणि मेहनत शंभर टक्के असते. अशा कलाकारांचं कौतुकही मेलबर्नमध्ये खूप विविध पद्धतीनं होतं. ‘मेलबर्न आर्ट अॅण्ड कल्चरल सेंटर’ला या सर्व हौशी कलाकारांचं विविध प्रकारे कौतुक केलं जातं. त्यांचं त्यांच्या कलेवर नितांत प्रेम असतं. ती जोपासण्यासाठी ते अथक प्रयत्न करत असतात. त्यामुळे सगळ्या परफॉर्मिग आर्ट्स आणि थिएटर ग्रुप्समध्ये एकंदर भारलेलंच वातावरण असतं. अवघी तरुणाई आपल्या अभ्यासाबरोबर नित्यनेमानं जिम आणि वॉक करतेच. त्यांच्या फिटनेसबद्दल मला अत्यंत आदर वाटतो. स्पोर्ट्ससोबत जिम, योग, पिलाटो आदींचा व्यवस्थित उपयोग प्रत्येकाच्या लाइफस्टाइलमध्ये करण्यात येतो. अनेकांच्या गप्पांचा मुख्य विषय फिटनेस असतो. आवडीचं शिक्षण, फिटसनेस आणि इतर खर्च करताना महत्त्वाचं म्हणजे आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र राहाणं. ते स्वत: जॉब करून हा सर्व खर्चाचा भार स्वत:च उचलतात. शिवाय अठरा-एकोणीस वर्षांनंतर कुटुंबासोबत राहणारी किंवा शेअरिंगमध्ये राहणारे असो, जवळपास सगळी तरुणाई स्वत:चा स्वयंपाक स्वत:च ऑर्डर करते किंवा बनवते. आशियाई देशांतील इथं स्थायिक झालेल्यांच्या कुटुंबसंस्थेचा प्रभाव हळूहळू इथे पडताना दिसत असून कुटुंबांतलं बॉण्डिंग वाढतं आहे.
मेलबर्नची इतर शहरांप्रमाणेच शहर आणि उपनगर अशी विभागणी आहेच. सिटिलाइफ एन्जॉय करायला तरुणाई नेहमीच उत्सुक असते. विविध पब्स, किंगस्ट्रीटवरचे नाइट क्लब्ज यात विरघळू पाहणारी ही संस्कृती! सिटी म्हणजे साऊथ बँक (‘यारा’ नदी सिटीतून वाहात असल्याने तिचा एक काठ) क्राऊन कॅसिनो, स्वॅनस्टन स्ट्रीट, फेडरेशन स्क्वेअर इथे मस्त स्वत:ला झोकून देऊन जिवाचं मेलबर्न करणं म्हणजे म्हणजे तरुणाई! बरं, आता ‘सबर्ब’मधले सगळे प्रत्येक वेळी ‘सिटी’तच जाणार का? तर नाही. त्यांची खास हँगआऊ टची जागा म्हणजे चॅडस्टन अर्थात तरुणाईच्या भाषेत चॅडी. साऊ थ ईस्ट आशियामधील सर्वात मोठा शॉपिंग मॉल, तरुणाईचे सर्व ब्रॅण्ड्स मिळण्याचं आणि हँगआऊ टसाठीचं मस्त स्थान. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे केस कापण्यापासून ते टेल्सलाची राइड घेण्यापर्यंत, ब्रॅण्डेड कपडे ते जिमसाठी शूज, मॅकडोनाल्डपासून ते इंडियन-मेक्सिकन फूडपर्यंत, मुव्हीपासून ते कॉफी-हॉट चॉकलेटपर्यंत तरुणाईसाठी आवश्यक चीजवस्तू पुरवणारा मॉल म्हणजे चॅडी.
इथे कायदा व सुव्यवस्था असल्याने स्वत:लाही एक कायदा पाळायची शिस्त लागते. उदाहरणार्थ.. कचरा न करणं, वाहतुकीचे नियम पाळणं. गोऱ्या मुलांकडून शिकण्यासारखं खूप असतं. शिस्त, मॅनर्स, अॅटिटय़ूड्स मला छान शिकायला मिळाले. प्रत्येकाला स्वत:ची स्पेस असणं, हे खूप गरजेचं आहे, इथे हा शिष्टाचार कायमच पाळला जातो. इथे विविध गेम्स, गोल्फ, क्रिकेट, फुटबॉल आम्ही मराठी मुलं एकत्र खेळून मज्जा करतो. आमच्या मेलबर्न शहराची खासियत म्हणजे इथला एकही रस्ता सरळ नाही. प्रत्येक रस्त्याला चढउतार असायलाच हवा. दुसरी खासियत म्हणजे इथलं हवामान. असं म्हणतात की, इफ यू डोण्ट लाइक द वेदर वेट फॉर फाइव्ह मिनिट्स. उन्हाळा (अत्यंत कडक), पाऊस व लगेच कडाक्याची थंडी तुम्हाला इथे एकाच दिवसात अनुभवायला मिळतात. इथल्या पोषक हवामानामुळे मेलबर्नच्या जवळ अतिशय सुंदर वाइनरीज आहेत. उत्कृष्ट प्रतीची वाइन इथे तयार होऊ न जगभरात निर्यात केली जाते. अत्यंत कौतुकास्पद अशा या प्रवासात काही तुरळक ठिकाणी बहुतांशी अभारतीय विद्यार्थ्यांमध्ये ड्रग्जचं वाढतं प्रमाण, हा एक काळजीचा आणि गंभीर विषय बनला आहे. सरकार त्यावर गांभीर्यपूर्वक उपाययोजना करत आहे. ही एक गंभीर गोष्ट सोडल्यास वातावरणात प्रदूषण कमी आहे. सर्व नियम काटेकोरपणे पाळले जातात. सार्वजनिक ठिकाणचे मॅनर्स पाळले जातात. त्यामुळे कुठेही उठाव किंवा संघटन करून रॅलीज काढणं याची गरज पडत नाही. एकुणात ‘मेलबर्न’कर तरुणाई आदर्श तरुणाई मानायला हरकत नाही.
