‘तो’ अभिनय आणि संगीत या आवडीच्या प्रांतात यशस्वी होतो आहे. आपल्याला जे आवडते त्याची वाट निडरपणे चोखाळणारा, या वाटेत साथसंगत करणाऱ्या सुहृदांबद्दल आत्मीयता बाळगणारा, नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची आस असणारा हा ‘कल्ला’कार आहे आशीष गाडे. सध्या ‘स्टार प्रवाह’वर ‘नकळत सारे घडले’ ही नवीन मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत कोल्हापुरी बाजाची भूमिका असणाऱ्या कलाकाराने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. मालिकेतील या ‘प्रिन्स’चा मोठाच रुबाब दिसतो आहे. ही भूमिका साकारणारा कलाकार आहे आशीष चंद्रकांत गाडे. आशीषच्या आई ‘पार्ले टिळक शाळे’च्या मुख्याध्यापिका आहेत. त्यांच्याकडून त्याला अभिनयाचं बाळकडू मिळालं असावं. त्याने गौरी आणि वामन केंद्रे यांच्या बालनाटय़ शिबिरात अभिनयाचा श्रीगणेशा केला. बालनाटय़ांत काम करताना व्यावसायिक बालनाटय़ासाठी विचारणा झाली आणि त्याने कुमार शाहूंच्या दिग्दर्शनाखाली ‘चिनी चेटकीण’मध्ये आरशाची व्यक्तिरेखा केली. त्यातूनच ‘चंद्रलेखा’च्या ‘रिमोट कंट्रोल’ नाटकातली लहान मुलाची मध्यवर्ती भूमिका त्याला मिळाली. डॉ. हेमू अधिकारी, स्वाती चिटणीस आणि राजन भिसेंसह केलेल्या या नाटकाचे बेळगाव, बंगलोर, गोवा वगैरे ठिकाणी १३० प्रयोग त्याने केले. पुढे ‘चंद्रलेखा’च्याच ‘सोनपंखी’त अविनाश-ऐश्वर्या नारकरांच्या मुलाची भूमिका केली. यूटय़ूबवर ‘सूर राहू दे रे’, ‘देखणी बायको दुसऱ्याची’ ही त्याने भूमिका केलेली नाटकं आहेत. ‘बालश्री’साठी ‘‘परफॉर्मिग आर्ट्स’मध्ये त्याने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं. कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ कवितेवरील त्याच्या परफॉर्मन्सचंही परीक्षकांनी कौतुक केलं होतं.

आशीषने अनेक मालिकांमधून भूमिका केल्या आहेत. ‘स्टार प्रवाह’च्या ‘ओळख’, ‘अनोळखी दिशा’मध्ये काम केलं. ‘मी मराठी’वरच्या ‘रंग माझा वेगळा’त अविनाश नारकरांच्या लहानपणीची भूमिका केली. शाळा-क्लास सांभाळत काम करणं सुरूच होतं. ‘मॅटर’ चित्रपटात सुशांत शेलारच्या लहानपणीची भूमिका केली. ‘दोन घडीचा डाव’मध्ये त्याने मतिमंद मुलगा साकारला. तो पडद्यावर निरागस दिसत असल्याने त्याला त्याच्या वयाचं काम मिळत नव्हतं. गेल्या वर्षी त्याचा ‘यारी-दोस्ती’ चित्रपट आला होता, तो मुंबईबाहेर अधिक गाजला. अभिनयाच्या या सहज प्रवासाबद्दल तो म्हणतो, ‘यारी-दोस्ती’ चित्रपट केला तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. यात माझी दहावीतील मुलाची व्यक्तिरेखा होती. हा मुद्दा चांगला की वाईट या दृष्टीने बघण्यापेक्षा मला काम करायचं होतं आणि ते मिळत होतं, हे त्या वेळी महत्त्वाचं वाटलं. आता कधीतरी वाटतं की माझ्या वयाची भूमिका करायला नाही मिळाली, पण अभिनय करायला मिळाल्याचा आनंद जास्त होतो.

साठय़े महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर त्याची संगीताची गोडी वाढीस लागली. त्याची बहीण आकांक्षा अभिनेत्री आहे. तिच्यामुळे तो शाळेत असल्यापासूनच साठय़ेच्या एकांकिका बघत होता. ‘साठय़ेच्या संघा’तर्फे प्रमोद शेलार डफ वाजवायचे. त्या डफची क्रेझ डोक्यात होतीच. मग डफ शिकायची खूणगाठ बांधली गेली. अकरावीत ‘आयएनटी एकांकिका’ स्पर्धेत ‘बंदे मे था दम’ या एकांकिकेतील भूमिकेसाठी त्याला ‘बेस्ट कॉमेडियन’चा पुरस्कार मिळाला. ‘मल्हार’मध्ये त्याने बॉलीवूड डान्स केला होता. त्याच काळात ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या  मालिकेतील ‘पार्लेकर ग्रूप’मध्ये लाइव्ह डफ वाजवला. त्या वेळचा अनुभव त्याने सांगितला. ‘परीक्षक मकरंद देशपांडे यांना माझं डफ वाजवणं भावल्यानं त्यांनी तिथल्या तिथे ‘व्हॉट अ लॉस्ट लोटा’ या नाटकासाठी शैलेंद्र बर्वे यांच्या साथीला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्याचदरम्यान बाबांनी मला छोटा पियानो घेऊ न दिला. ‘मराठी पाऊ ल पडते पुढे’मध्ये या पियानोचे काही पीस मी वाजवले होते. पुढे मोठा पियानोही घेतला. सतत काही ना काही प्रयोग करत राहायचो.. संगीताची आवड वाढतच गेली. मग ‘युथ फेस्टिव्हल’मध्येही सहभागी झालो. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी एकांकिकेच्या निमित्ताने हृषीकेश कोळीकडून संगीतातलं तांत्रिक ज्ञान मिळवलं. ‘लई भारी’, ‘दुनियादारी’ आदी अनेक चित्रपटांसाठी क्राउड डबिंगचंही काम केलं’.

मकरंद देशपांडे यांच्या ‘कृष्णा किडिंग’, ‘इमली पपिता टरबूज’ या बालनाटय़ांसाठी त्याने संगीत दिलं. तो त्यांच्या संस्थेत कामही करतो आहे. ही नाटकं बघायला आलेल्या काही कलावंतांकडून त्याला पुढची प्रोजेक्टस् मिळत गेली. अभिनेत्री आणि नाटय़दिग्दर्शक दिव्या जगदाळे यांच्या संस्थेच्या कॉर्पोरेट इव्हेंटसाठी संगीत दिलं. यंदाच्या ‘पृथ्वी फे स्टिव्हल दरम्यान ‘फ्रिंज थिएटर’मध्ये ‘कॉफी इन कॅण्टीन’ नाटकात त्याने लाइव्ह कीबोर्ड पियानो वाजवला असून रसिकांनी हा प्रयोग चांगलाच उचलून धरला. ‘हमारा एंजल्स’ संस्थेसाठी त्याने कम्पोझिशन केलं. आशीष सांगतो की, ‘लहानपणी तबला शिकलो होतो. आजोबा काही वाद्य वाजवायचे हे ऐकून माहीत होतं. पण संगीताचे धडे गिरवले ते यूटय़ूबवरून. प्रसंगी संगीतप्रेमी मित्रांचीही मदत घेतली. एक क्षण असा आला की अभिनय किंवा संगीत यापैकी काय निवडावं हा पेच पडला.. दिग्दर्शक सुश्रुत भागवत यांनी दोन्ही आवडी जोपासायचा सल्ला दिला. त्यांनी ‘संगीत मराठी चॅनेल’साठी दोन मराठी गाण्यांचं प्रोजेक्ट दिलं. ती कम्पोज आणि अरेंज केली. इतर अनेकांनीही कायम पाठिंबा दिला. ‘व्यास संगीत अकादमी’त शास्त्रीय संगीतही शिकलो. ‘अरे वेडय़ा मना’ मालिकेत काम करताना फावल्या वेळात यूटय़ूबवरून गिटार शिकायला लागलो. स्टिल फोटोग्राफर सनी बोरकरनं हे गिटारवादन यूटय़ूबवर अपलोड करायचा आग्रह धरला. या व्हिडीओजमध्ये मालिकेच्या टीममधले अविनाश नारकर, अभिजित आमकरही सामील झाले. हे व्हिडीओज लोकांना बरेच आवडले. गाण्यांची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने घरातील तांत्रिक साधनांत भर पडल्यानंतर ‘अरे वेडय़ा मना’च्या टायटल ट्रॅकसह काही व्हिडीओजना आठ हजारांवर व्ह्य़ूज मिळाले’. याच मालिकेचे दिग्दर्शक नीलेश डिचोलकर यांच्या आगामी ‘अतक्र्य’ चित्रपटासाठी आशीषने गाण्यांची अरेंजमेंट केली असून त्यातल्या ‘का रं नेली दूर आई’ गाण्याचं रेकॉर्डिग आजीवासन स्टुडिओत झालं आहे. त्याने काही लघुपटांना ओरिजिनल बॅक्ग्राउंड म्यूझिक दिलं आहे.

आशीषची ‘मी मराठी’वरील ‘वरचा क्लास’ मालिके च्या सेटवर संगीतकार पंकज पडघनशी ओळख झाली. यूटय़ूबवर अपलोड केलेल्या व्हिडीओची लिंक त्याने पंकजलाही पाठवली. त्यानंतर पंकजने ‘जय मल्हार’मधील ‘होळी स्पेशल’ भागातील श्लोक आशीषच्या आवाजात रेकॉर्ड केला. तो मालिकेतील पुढल्या भागातही अनेकदा वाजवला गेला. आशीषने कांचन आणि कमलाकर सोनटक्के यांच्या ‘नाटय़शाला’ संस्थेतील कर्णबधिर मुलांच्या क्षमता लक्षात घेऊ न माईमसाठी संगीत दिलं. नाटय़शालाच्याच ‘शहाणपण देगा देवा’ नाटकात संगीत देण्यासह त्याने कामही केलं. तो सांगतो की, ‘बेळगावच्या दौऱ्यातील प्रयोगात तेथील शाळेतील मूकबधिर विद्यार्थ्यांसह शिक्षकही होते. तेव्हा ‘दूर्वा’ मालिका सुरू होती. तिथल्या अंध शिक्षकांनी फक्त माझा आवाज ओळखला. त्यांनी मुलाला विचारून खात्री करून घेतली. प्रयोगानंतर ते भेटले. मालिका आवडत असल्याचं सांगून त्यांनी स्वत: छापलेलं गणपतीच्या आरतीचं पुस्तक भेट म्हणून दिलं. मी ते प्रेम पाहून भारावून गेलो होतो..’

हृषीकेश कोळीची ‘दस्तुरखुद्द’ एकांकिका करताना पत्रकार वडिलांची व्यक्तिरेखा साकारायची होती. आशीष म्हणतो की, ‘साठीच्या आसपास असलेली ही भूमिका करताना त्या वयाच्या व्यक्तींचं निरीक्षण आणि अभ्यास केला होता. व्यक्तिरेखेच्या आलेखाचा आणि नाटककाराला नेमकं काय म्हणायचंय हा विचार करावा लागतो. अशा व्यक्तिरेखा साकारताना अनेक बारीकसारीक बदल विचारपूर्वक दाखवता येतात. एकांकिकेत प्रयोगशीलतेला वाव असतो. सध्या कोल्हापुरी भाषेचा अभ्यास प्रिन्सच्या व्यक्तिरेखेसाठी सुरू आहे. ठरावीक कोल्हापुरी शब्दांच्या पलीकडे जाऊन आणखी शब्दांचा धांडोळा घेतो आहे. ‘प्रिन्स’चं ठरावीक वाक्य, त्याची शैली, उच्चारांचा विचार करतो आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेचं बेअरिंग लक्षात घेणं आवश्यक ठरतं. उदाहरणार्थ, ‘गणपती बाप्पा मोरया’ या गाजलेल्या मालिकेत ‘मूषक’ झालो होतो. मूषकाचा मोदकाच्या आकारासारखा हात जोडण्याचा आविर्भाव प्रेक्षकांना आवडला होता’. या ऑक्टोबरमध्ये त्याचा ‘कॉल फॉर फन’ हा पहिलाच हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला असून तो दिल्ली, नॉएडा, अहमदाबाद आदी ठिकाणी बराच चालला होता.

‘कॉल फॉर फन’ स्वीकारल्यावर लगेचच त्याला ‘गोलमाल वन्स अगेन’मधली अर्शद वारसीच्या लहानपणीच्या भूमिके साठी विचारणा झाली होती. त्याची उंची जास्त असल्याने ते तेवढंच राहिलं. पण काही क्षण द्विधा मन:स्थिती झाली होती. आवाज चांगला असल्याने ‘संगीत सौभद्र’साठी विचारणा झाली होती. पण तेव्हा ‘कॉल फॉर फन’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र होतो त्यामुळे ते करता आलं नव्हतं. आतापर्यंत ज्यांच्यासोबत काम केलं त्यापैकी अनेकांच्या चांगल्या गोष्टी टिपायचा प्रयत्न केला असं सांगणाऱ्या आशीषला त्याच्यावर मकरंद देशपांडेंचा प्रभाव थोडा अधिक आहे, असं त्याला वाटतं. त्याने  ‘गमभन’ नाटकात जोश्याची भूमिका केली होती. नाटक, मालिका, चित्रपट माध्यमांत काम करताना त्या त्या माध्यमाचं भान ठेवून विचार करावा लागतो, असं त्याला वाटतं.

स्वत:चं कम्पोझिशन असणारी काही गाणी तयार असून ती शूट करून अपलोड करायचा त्याचा विचार सुरू आहे. त्याने ‘बिग बझार’साठी जिंगल केली आहे. आशीष म्हणतो की, ‘बऱ्याचदा नवीननवीन गोष्टी आपल्याला आवडायला लागतात. त्या करताना छान वाटतं. ती आवड बदलूही शकते. कदाचित ती मागे पडते आणि पुन्हा कधीतरी आपलं अस्तित्व सिद्ध करते. रंजना राजा या प्रसिद्ध गायिकेला परिस्थितीमुळे नोकरी करावी लागल्याने गाणं मागे ठेवावं लागलं होतं. तिने माझे काही व्हिडीओ पाहून संपर्क साधला. तिच्यासोबत मला काही व्हिडीओ करायला मिळाले. आता ती पुन्हा गाण्याकडेच वळली आहे. हंगामा अ‍ॅपच्या ‘आर्टिस्ट अलाउड डॉट कॉम’ या अ‍ॅपवरील व्हिडीओ पाहून त्यांनी प्रोजेक्टसाठी विचारलं. ‘इन्स्टाग्राम’साठी आम्ही खास व्हिडीओज केले असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे’. आशीषने यंदाच्याच ऑगस्टमध्ये ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई कथा’ या डॉक्युमेंट्रीला आशुतोष पत्कींसोबत पाश्र्वसंगीत दिलं होतं. कलेचं एकच एक क्षेत्र सीमित न ठेवता जे जे आवडेल ते आत्मसात करून त्या त्या कलाक्षेत्रात मुक्त विहार करणाऱ्या या अवलियावर कलेचा ‘आशीष’ आहे हेच म्हणावंसं वाटतं.

जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते, आनंदी करते आणि ज्यावर आपला मेंदू तार्किकदृष्टय़ा सुसंगत विचारही करू शकतो ती आपली कला

आशीष गाडे

viva@expressindia.com