निसर्गाच्या सान्निध्यात दिवसरात्र न घालवलेला, रूढार्थाने वनस्पतीशास्त्र किंवा प्राणीशास्त्राचा अभ्यास न केलेल्या एका तरुण अभियंत्याला देशी झाडांविषयी प्रेम वाटावं असं नेमकं काय घडलं? कधी कधी आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा विविध दृष्टिकोनातून वेध घेतला असता भवतालाविषयीची जाणीव हळूहळू का होईना अनेक गोष्टींचं भान आणून देते. पुण्यातील योगेश चौधरी या आयटी इंजिनीअरलाही अशाच पद्धतीने पर्यावरण आणि निसर्गाचं संवर्धन आवश्यक का आहे, याचं भान आलं आणि त्याने देशी झाडांच्या संवर्धनाची एक मोहीमच हाती घेतली.
पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील फर्म्समध्ये अनेक तरुणांप्रमाणेच एका कंपनीत योगेश नेताजी चौधरी हा इंजिनीअर म्हणून कार्यरत आहे. योगेश व्यवसायाने अभियंता असला, तरी मनापासून निसर्गप्रेमी आहे. आपल्या ‘खोपा फाऊंडेशन’ या संस्थेद्वारे त्याने देशी झाडांचं बीज आणि रोपं मोफत वाटण्याची मोहीम हाती घेतली आहे. पर्यावरणाचा श्वास टिकवण्यासाठी आपण हाती घेतलेलं काम महत्त्वाचं आहे, असं तो म्हणतो.
योगेशच्या या मोहिमेमागची सुरुवात कशी झाली? हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. त्याच्या वडिलांना ७ सप्टेंबर २०२० मध्ये करोना झाला आणि त्यांना उपचारांसाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. सलग १५ दिवस त्यांना मेडिकल ऑक्सिजन द्यावा लागला. नंतर बिलांची जुळवाजुळव करताना योगेशच्या लक्षात आलं, त्या वेळी फक्त ऑक्सिजनचा खर्च १५ हजार रुपये झाला होता. आपण रोज निसर्गाकडून मोफत ऑक्सिजन घेतो, पण त्याची निर्मिती करणाऱ्या झाडांसाठी काहीच करत नाही, या विचाराने योगेशच्या आयुष्याची दिशाच बदलली आणि त्याने ठरवलं की निसर्गाकडून घेतलेल्या ऑक्सिजनचं ऋण फेडण्यासाठी प्रत्येक वर्षी १५ ते २० हजार रुपये झाडं लावण्यात खर्च करायचे. पर्यावरणाचं भान आलं की माणूस अधिक सजगपणे काम करू लागतो. योगेशच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. एकीकडे झाडं लावण्याचा निर्धार त्याने केला, मात्र त्याचं काम तिथेच थांबलं नाही.
२०२१ मध्ये पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलाजवळून जात असताना झाडांच्या अभावामुळे पक्ष्यांनी विजेच्या खांबांवर घरटी बांधली आहेत हे योगेशच्या दृष्टीस पडलं. हे दृश्य पाहून त्याच्या मनात पुन्हा कालवाकालव झाली. त्याने ‘खोपा फाऊंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्याने देशी झाडांच्या प्रचार, प्रसार आणि संवर्धनाचं काम हाती घेतलं. सुरुवातीला योगेशने देशभरातील लोकांना देशी झाडांच्या बिया मोफत पाठवण्याचा उपक्रम सुरू केला. बिया पाठवण्यासाठी केवळ पोस्टाचे ४० ते ५० रुपये शुल्क तो घेत होता. हे शुल्क घेण्यामागे त्याचा हेतू एकच होता की लोकांना या बियांचं मूल्य जाणवलं पाहिजे. बिया त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी जबाबदारीने त्या बियांची रुजवात करावी, हाही विचार त्यामागे होता असं तो म्हणतो.
कोणतंही काम त्यामागचं उद्दिष्ट कितीही चांगलं असलं तरी एका दिवसात उभं राहत नाही. सुरुवातीच्या टप्प्यात योगेशलाही या कामात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नाही म्हटलं तरी तो थोडा निराश झालाच. पण तरीही हार न मानता योगेशने स्वतःची देशी झाडांची रोपवाटिका सुरू केली. लालासाहेब माने आणि सुहास कडू यांच्या मार्गदर्शनाखाली २०२३ मध्ये त्याने बीज संकलनाचा नवीन प्रवास सुरू केला. याही कामात सुरुवातीला काही चुका झाल्या, पण त्यातून शिकत त्याने जवळपास २ हजार रोपं तयार केली. महाराष्ट्रात खेडोपाडी सापडणाऱ्या सर्वसामान्य आणि दुर्मीळ देशी झाडांचा बीज संकलन कालावधी आणि बीज संस्कार यांची माहिती योगेशने संकलित केली. ही माहिती पीडीएफ स्वरूपात त्याने सर्वत्र मोफत उपलब्ध करून दिली. ही यादी नागझिरा अभयारण्यात कार्यरत असलेल्या किरण पुरंदरे यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्याचा प्रभाव पडला. लेखक सुमेधकुमार इंगळे यांच्या ‘महामाया निळावंती’ या पुस्तकाच्या प्रत्येक प्रतीसोबत देशी झाडांच्या बिया मोफत देण्याची कल्पना साकार करण्यात योगेशने सक्रिय सहभाग घेतला.
आत्तापर्यंत काळा पळस, नाणा आणि महाराष्ट्राचा राज्यवृक्ष ताम्हण यांच्या बिया वाचकांना भेट म्हणून दिल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर या झाडांविषयीची प्राथमिक माहिती आणि या बिया कशा रुजवायच्या याची सविस्तर प्रक्रिया समजावून सांगणारं पत्रही त्यासोबत जोडलं जातं. आज खोपा फाऊंडेशनच्या माध्यमातून योगेशने ‘इन्फोसिस फाऊंडेशन’, ‘भारती विद्यापीठ’, ‘वोल्टस मुंबई’सह वोल्टसची अन्य कंपनी, ‘श्रीराम प्रतिष्ठान’, ‘झाडे लावा, झाडे जगवा फाऊंडेशन’ यांसारख्या अनेक संस्था व कंपन्यांना देशी झाडांची रोपं दिली आहेत. त्यांच्या या रोपांनी आता महाराष्ट्रभरातील लोकांची नाळ निसर्गाशी जोडली आहे.
सुरुवातीला हळूहळू सुरू झालेलं योगेशचं कार्य आता मात्र मोठ्या प्रमाणावर विस्तारलं आहेच, पण त्यात निसर्ग संवर्धनासाठी आवश्यक अशा विविध उपक्रमांची भर पडत चालली आहे.
योगेशने सुहास कडू यांच्या सल्ल्याने हिंजवडी जवळील रोपवाटिकेत एक वेगळा प्रयोग करून पाहिला. त्याने तिथे बाजरी पेरणी करून पक्ष्यांसाठी अन्नाची नैसर्गिक सोय निर्माण केली. चार महिन्यांत बाजरीची भरघोस कणसं तयार झाली आणि रोज सकाळी पक्ष्यांसाठी अन्नाची सोय झाली. गगनचुंबी इमारतींच्या सावलीत केलेला हा छोटासा हरित प्रयोग पक्ष्यांसाठी नंदनवन ठरला आहे. आपल्या छोट्याशा कामाची पोचपावती देण्यासाठी हे पक्षी रोज इथे येतात, हेच आम्हा सगळ्यांचं यश आहे असं योगेश सांगतो. इंजिनीयर म्हणून केलेली सुरुवात ते आता हरित कार्यकर्त्यापर्यंत झालेला योगेश चौधरीचा प्रवास थक्क करायला लावणारा आहेच. पण, त्याला आयुष्यात मिळालेला धडा आपल्या सगळ्यांसाठीही किती महत्त्वाचा आहे हे लक्षात आणून देणारा आहे. ‘ऑक्सिजन खरेदी करता येतो, पण निसर्गाने दिलेला श्वास नाही’ ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्याच मनावर कोरली गेली पाहिजे. योगेश आता श्वासागणिक झाडं लावतो आहे आणि इतरांनाही त्याच दिशेने काम करण्यासाठी प्रेरित करतो आहे.
