रत्नागिरी जिल्ह्यात जन्मलेले, आपल्या जन्मगावीच मातीत काम करण्यात रमलेले वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. अमित मिरगळ. निसर्गाशी त्यांचं नातं हे फक्त अभ्यासापुरतं मर्यादित नाही. संशोधन, संवर्धन आणि सामाजिक सहभाग या त्रिसूत्रीच्या आधारावर त्यांनी उभारलेलं कार्य आज पर्यावरणप्रेमी आणि अभ्यासकांसाठी एक उत्तम उदाहरण ठरलं आहे.

डॉ. अमित मिरगळ यांचा जन्म रत्नागिरीतला असला तरी ते लहानाचे मोठे झाले ते सांगलीत. लहानपणापासूनच तिथली झाडंझुडपं आणि निसर्गाचं निरीक्षण करण्यात, भवतालातलं विज्ञान जाणून घेण्यात त्यांना रस होता. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेत असताना प्रा. डॉ. श्रीरंग यादव यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं आणि त्यातूनच संशोधनाची वाट त्यांना गवसली. हाच टप्पा त्यांच्या आयुष्याची दिशा निश्चित करणारा ठरला आणि त्यांनी वनस्पती संवर्धन हेच आपल्या आयुष्याचं ध्येय ठरवलं.

निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनाचं ध्येय त्यांना पुन्हा आपल्या जन्मगावी घेऊन आलं. कोकणातील संकटग्रस्त प्रजातींचा अभ्यास करताना त्यांनी ‘सीतेचा अशोक’, ‘सप्तरंगी’ आणि ‘चांदफळ’ यांसारख्या स्थानिक वनस्पतींचं जैवशास्त्रीय, पुनरुत्पादन आणि अधिवासविषयक संशोधन केलं. या पीएचडी संशोधनातून त्यांनी जैववैविध्य रक्षणासाठी धोरणात्मक उपायही सुचवले. डॉ. मिरगळ यांनी २००७ मध्ये कोकण कृषी विद्यापीठात अध्यापनास सुरुवात केली. पुढील दशकभर विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम जागवणारे शिक्षक म्हणून ते ओळखले गेले. त्यानंतर त्यांनी औद्याोगिक क्षेत्रातही पर्यावरण सल्लागार म्हणून उल्लेखनीय काम केलं. आज ते ‘बिल्डिंग एन्व्हायर्नमेंट (इंडिया) प्रा. लि.’ मध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.

बांधकाम, महामार्ग, औद्याोगिक प्रकल्पांमध्ये जैवविविधता, हरित पट्टा आणि त्यासाठीचे नैसर्गिक उपाय यावर त्यांनी अनेक धोरणं विकसित केली आहेत. डॉ. मिरगळ यांच्या नावावर ३० हून अधिक शोधनिबंधांची नोंद आहे. औषधी वनस्पती ‘विथानिया सोम्निफेरा’वरील अभ्यासासाठी त्यांना २०२२ सालचा डॉ. पी. डी. सेठी राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला आहे. त्याशिवाय त्यांनी उंडी (कॅलोफिलम इनोफिलम) व बांबूच्या (डेंड्रोकॅलॅमस स्टॉकसी) सुधारित वाणांची शिफारस करून कोकणातील कृषी क्षेत्रालाही दिशा देण्याचं काम केलं. डॉ. मिरगळ यांच्या कार्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘दिपकाडी’ या दुर्मीळ फुलझाडावर त्यांनी केलेलं संशोधन. या झाडाच्या संवर्धनासाठी त्यांनी अखंड १३ वर्षे सातत्याने काम केलं. ही वनस्पती केवळ कोकणातील काही पठारांवर आढळते. या वनस्पतींचा अधिवास नष्ट होत असल्याने ही फुलझाडं लुप्त होण्याच्या मार्गावर होती.

डॉ. मिरगळ यांनी तिचा अधिवास, प्रजनन चक्र, जमिनीचे गुणधर्म, हवामान, परागसिंचन याचा दीर्घकालीन अभ्यास केला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील परिसरात त्यांनी प्रयोगशाळेबाहेर, प्रत्यक्ष जमिनीवर या फुलझाडांच्या संवर्धनासाठी प्रयोग केला. योग्य परिस्थितीत ही वनस्पती नव्या अधिवासातही तग धरू शकते, हे त्यांच्या प्रयोगांमधून सिद्ध झालं. त्यानंतर या प्रजातीला ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ (आययूसीएन) या संस्थेने संवेदनाक्षम म्हणून मान्यता दिली. या मान्यतेमुळे त्यांच्या कामगिरीची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली.

डॉ. अमित मिरगळ यांनी संवर्धन हे केवळ प्रयोगशाळेपुरतं मर्यादित ठेवलं नाही. त्यांनी स्थानिक शेतकरी, विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांनाही या संवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभागी करून घेतलं. या वनस्पतींच्या औषधी शक्यता, जैववैविध्याचं महत्त्व याबद्दलही त्यांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. आजही डॉ. मिरगळ ‘दिपकाडी’च्या संवर्धनासाठी कार्यरत आहेत. मिरगळ यांच्या मते दिपकाडी ही वनस्पती कोकणच्या निसर्गाची ओळख आहे. तिचं रक्षण म्हणजे आपल्या भविष्यासाठी जैविक शाश्वततेचा पाया मजबूत करणं आहे. डॉ. अमित मिरगळ यांचा प्रवास हा पर्यावरण संवर्धनाच्या ध्येयासाठी झोकून देऊन काम करणाऱ्या समर्पित संशोधक – अभ्यासकांचे आदर्श उदाहरण आहे. त्यांच्या कार्यातून तरुण संशोधक, अभ्यासक आणि पर्यावरणप्रेमींना प्रेरणा घेण्यासारखं खूप काही आहे. त्यांच्या निष्ठापूर्वक संशोधन कार्यातून तरुण निसर्ग संशोधक – अभ्यासकांनाही पर्यावरण संवर्धन क्षेत्रात ठोस काहीतरी करण्याची ऊर्जा निश्चितच मिळू शकते.
viva@expressindia.com