‘कठीण आहे ! मराठी भाषेचं काही खरं नाही. आजकालची ही मुलं चांगलं मराठी काही वाचतच नाहीत.  आमच्या वेळी मर्ढेकरांच्या कविता अंतर्मुख करून सोडायच्या, कुसुमाग्रजांना वाचून स्फुरण चढायचं! पु. लं.च्या प्रवास वर्णनांनी कितीतरी संस्कृतींशी ओळख करून दिली. पण हल्ली वाचनसंस्कृतीच लोप पावतेय, मराठी साहित्य तर मुलांना ओळखीचंही वाटत नाही..’ असा हा न संपणारा जुन्या पिढीचा आक्रोश! खरोखर काय परिस्थिती आहे? हे जाणून घेऊन आजच्या मराठी दिनी ते ‘व्हिवा’मधून मांडायचं ठरवलं. हल्लीचे विद्यार्थी वाचत नाहीत या आरोपात तथ्य आहे का, त्यात मराठी साहित्य किती प्रेमानं वाचलं जातं आणि नेमकं काय, कसं आणि कधी वाचतात हे जाणून घेण्यासाठी पुणे आणि मुंबईतल्या प्रातिनिधिक १०० मुलांना याविषयी बोलतं केलं. त्यांना या आरोपांविषयी काय वाटतं ते विचारलं. त्यातून उलगडलेल्या काही उत्तरांचा हा संपादित अंश..
मराठी भाषा दिनाच्या औचित्याने महाविद्यालयीन तरुणाईशी वाचन  या विषयावर गप्पा मारल्या. मुंबई आणि पुण्याच्या वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या १०० जणांशी साहित्यविषयक संवाद साधला, त्यातील ५० टक्के विद्यार्थी मानव्य शाखांचा अभ्यास करणारे होते, त्यातले ३५ टक्के मराठी साहित्याचा अभ्यास करणारे होते. तरुणाईचा आवडता साहित्यप्रकार कादंबरी असल्याचे त्यांच्याशी बोलताना समोर आले. ३४ टक्के विद्यार्थी कादंबरीला प्राधान्य देतात. १६ टक्के कथा, १६ टक्के चरित्र, १० टक्के विज्ञान साहित्य प्राधान्याने वाचतात तर केवळ ९ टक्के काव्य प्राधान्यक्रमाने वाचतात. ४७ टक्के विद्यार्थी लेखकाऐवजी विषयाला प्राधान्य देतात.
इ साहित्य कट्टा
‘आमच्या वेळी दिवसाला एक पुस्तक संपायचं. परवडायचंही नाही, म्हणून मिळेल ती संधी, मिळेल ते पुस्तक घेऊन वाचायचो. वाचलेल्यावर चर्चा करायचो पण इथे..वाचनाचीच बोंब! चर्चा कसल्या चालतायेत! मोबाइलमधून यांना सवड मिळेल तर ना!..’ हे असं अनेक वेळा नव्या पिढीला ऐकावं लागतंच. मुलं मोबाइलवर एवढा वेळ नेमकं काय करतात असा प्रश्न पालकांना पडत नाही का? ‘जी साहित्यिक चर्चा आधीच्या पिढीतील मंडळी भेटून करायची, ती आम्ही इथे करतो..मोबाइलवर. आमचे साहित्य कट्टे इथे भरतात’, वाचन हा कॉमन इंटरेस्ट असलेले विद्यार्थी आवर्जून नमूद करतात. असाच एक पुण्यातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप! इंजिनीिरग कॉलेजचे विद्यार्थी.. त्यामुळे साहित्याची आवड आणि जाण असलेली मंडळी इथे कमी असल्याने नियमित साहित्य वाचनास उत्सुक असलेल्यांचा एक ग्रुप तयार करावा असं एम.आय.टी.मध्ये शिकणाऱ्या दिशाला वाटलं. ओळखीच्या चार लोकांना सोबत घेऊन तिने हा ग्रुप तयार केला. हळूहळू त्याचा आवाका वाढला, मत्री वाढली, ओळख झाली. आज ग्रुपमधील सदस्यांकडून नियमितपणे पुस्तकांची देवाणघेवाण चालू असते. सर्वानाच एका वेळी प्रत्यक्ष भेटणं शक्य नसल्यामुळे वाचलेल्या पुस्तकांविषयी व्हॉट्सअ‍ॅपवर तासान्-तास चर्चा चालते. पुस्तकं जमवायची असतील तर ती राद्दीवल्याकडूनही मिळवता येतात. पण ‘झपूर्झा’ रद्दीत सापडण्याइतकी दुसरी खंत नाही, असंही दिशाच्या ग्रुपमधले मेंबर्स कबूल करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवीन साहित्य आणि वाचकवर्ग
सर्वेक्षणानुसार सुमारे ४३ टक्के तरुणाई जुनं संचित सोबत घेऊन नव्याचा ध्यास घेऊ पाहते. जुन्या नामांकित लेखकांच्या आणि पुस्तकांच्या जोडीने नवे लेखक आणि लेखनही चाळते. सतत कॉम्प्युटर आणि मोबाइलवर रेंगाळणारी मंडळ फेसबुकवरचे पेजेस आणि विविध प्रकारचे ब्लॉग्स न्याहाळून आपली वाचानकक्षा विस्तारत असते.
‘कधी कौटुंबिक सोहळ्यांत साहित्याचा विषय निघालाच तर खांडेकर, माडगूळकर, शिरवाडकर आणि देशपांडे यांच्याच आठवणींत समस्त प्रौढजन रमतात आणि नव्या पिढीला विचारतात, ‘वाचन करता का तुम्ही? हे लेखक तुम्हाला माहीत नसतीलच.’ नवीन पिढी वाचत नाही असं सरसकट विधान चूक आहे. आम्ही वाचतो. या दिग्गज लेखकांचंही थोडं-फार वाचलंय आम्ही, पण त्या प्रौढांना विचारावंसं वाटतं.. विज्ञानकथा वाचल्या आहेत का तुम्ही? तेवढंच काय! इरावती कर्णिक, संजय पवार, अमृता सुभाष, गणेश मतकरी, संदीप खरे यांना वाचलंत का कधी? हे लेखक माहीत नसतीलच.’.. जुन्या पिढीच्या आरोपाचं जोरदार खंडन करताना मुंबईतील एक विद्यार्थी असा प्रश्न विचारतो. अर्थात मराठी साहित्यातील जुन्या-जाणत्यांबरोबरच एवढी नवी नावं पुढे करणारी तरुण जमात तशी कमी आहे हे अमान्य करून चालणार नाही. कारण तरुण पिढीवर संस्कार करणाऱ्यांनी फडके-खांडेकर आणि पु. ल.- व. पु. म्हणजेच मराठी साहित्य असं सुटसुटीत अपूर्ण समीकरण तरुणांच्या मनावर कोरलंय.
शिरीष लाटकर, चंद्रशेखर गोखले, स्पृहा जोशी यांचं लेखन कित्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जवळचं वाटतं. ब्लॉग्स तर अगणितच. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून पन्नाशी उलटलेल्यापर्यंत अनेकजण नियमितपणे ब्लॉग्स लिहीत असतात. आता ‘ब्लॉगवर लिहिलं जातं त्याला साहित्य म्हणायचं का?’ असा प्रश्न लगोलग येतोच.
गार्गी गीध, भक्ती तांबे

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The young generation reads marathi