केदारनाथ व हरिद्वार यात्रेला गेलेल्या तीन कुटुंबीयांतील १२ जणांचा संपर्क होऊ शकला नसल्याची माहिती बुधवारी समोर आली.
येथील ध्रुवनारायण मुरलीधर काबरा कुटुंबातील चौघांचा १६ जूनपासून काहीही संपर्क होत नसल्याने काबरा परिवार चिंतेत आहे.
कैलाश सत्यनारायण काबरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे काका ध्रुवनारायण मुरलीधर काबरा (वय ५१), काकी मीनाक्षी (वय ४७), बहीण निकिता (वय २१) व भाऊ मोहित (वय १६) हे चौघे केदारनाथ यात्रेसाठी हिंगोलीहून सचखंड एक्स्प्रेसने ९ जूनला नवी दिल्लीपर्यंत गेले. तेथून रॉयल ट्रॅव्हल्सने केदारनाथला रवाना झाले. केदारनाथला दर्शन झाल्यानंतर १६ जूनला त्यांचा संपर्क झाला होता. मात्र, तेव्हापासून पुन्हा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ध्रुवनारायण काबरांसोबत त्यांचे रिसोड येथील तोष्णीवाल कुटुंबीयातील काही सदस्य, तसेच परतूरचे आमदार जेथलिया यांचे बंधूही असल्याचे कैलास काबरा यांनी सांगितले. संपर्कासाठीचे देण्यात आलेल्या दूरध्वनी क्रमांकावरही संपर्क होऊ शकत नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणल्याचे त्यांनी नमूद केले.
देवडानगर भागातील प्रशांत प्रभाकर कान्हेड, त्यांची पत्नी कविता, मुलगी श्रुती, मुलगा कौशल, सासू व मेव्हणा असे सहाजण १६ जूनला खासगी वाहनाने हरिद्वारला गेले. त्यांच्याशी गेल्या दोन दिवसांत संपर्क होऊ शकला नाही. कळमनुरी येथील रत्नाकर गंगाधर अर्धापूरकर व त्यांची पत्नी स्वरूप हरिद्वारला दर्शनासाठी ट्रॅव्हल्समधून गेले आहेत. ते गुडगावला सुखरूप असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले, तरी त्यांच्याशीही संपर्क होऊ शकत नसल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले.