गेली काही वर्षे मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांची दहीहंडी वेगवेगळ्या कारणांनी गाजत आहे.. आता निवडणुकीच्या वर्षांत हंडीच्या उंचीबरोबर बक्षीसाची रक्कमही उंचावतानाच मतदारांना ‘रेल्वे इंजिन’मध्ये सामावण्यासाठी नांदगावकर यांनी अभिनव शक्कल लढवली आहे. अभ्युदयनगर काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानात होणाऱ्या या दहीहंडी सोहळ्यात दर अघ्र्या तासाने लकी ड्रॉ काढून स्थानिक नागरिकांना घडय़ाळ व पैठणी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत. शिवडी मतदारसंघातील घराघरात यासाठी आमंत्रण पत्रिका पाठविण्यात आल्या असून त्यासोबत असलेले फॉर्म जमा करून त्यातून हे लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत. दहा थरांसाठी तब्बल सत्तावीस लाख रुपयांचे बक्षीस लावण्यात आले असून दहा थर लावणाऱ्या मंडळाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येणार आहे. प्रामुख्याने दहीहंडीमध्ये होणारे अपघात लक्षात घेऊन वैद्यकीय पथकांबरोबरच उंच थर लागतील त्यावेळी क्रेन व दोरीची मदत घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत महिला छायाचित्रकारावर झालेला बलात्कार तसेच महिलांमधील असुरक्षितता लक्षात घेऊन या हंडीच्या माध्यमातून जमा होणाऱ्या दहा लाखांमधून एकलव्य संस्थेच्या वतीने महिलांसाठी कराटे प्रशिक्षण वर्गही सुरु करण्यात येणार असल्याचे आमदार बाळा नांदगावकर यांनी सांगितले. प्रामुख्याने उंच हंडी लावताना कोणताही अपघात होऊ नये यासाठी आम्ही पूर्ण खबरदारी घेतली असून दुर्दैवाने काही अपगात झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांनीही तैनात ठेवण्यात आल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.