अक्कलकोट तालुक्यातील शिवपुरी येथे चौथ्या सोनाई विश्व महोत्सवास शनिवारी सकाळी प्रारंभ झाला असून हा महोत्सव येत्या सोमवापर्यंत चालणार आहे. यात सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रम होत आहेत. सकाळी पर्यावरण आणि स्त्रीभ्रूण हत्येच्या मुद्यावर शालेय विद्यार्थी व स्वयंसेवकांची ग्रीन रॅलीने या महोत्सवाची सुरूवात झाली. या महोत्सवासाठी देश-विदेशातून सुमारे एक हजार प्रतिनिधी अक्कलकोटमध्ये दाखल झाले आहेत.
वैश्विक विचारांची देवाणघेवाण व्हावी व याद्वारे पर्यावरण, स्त्रीभ्रूण हत्या, सेंद्रिय शेतीविकास, भक्ती, सहिष्णुता, धर्म व अध्यात्म संस्कृतीचा प्रचार व प्रसार व्हावा, या हेतूने शिवपुरीच्या विश्व फाउंडेशनच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन केले जाते. पहिले तीन महोत्सव मुंबईत पार पडले. सायंकाळी ‘सारेगम’ फेम श्रुती विश्वकर्मा व गुरूदत्त शिराळी यांच्या भक्तिसंगीताचा कार्यक्रम झाला. त्याचा लाभ शेकडो भक्त तथा संगीत रसिकांनी घेतला.
उद्या रविवारी, २३ डिसेंबर रोजी शिवपुरी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून यात सुमारे आठशे स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. तर सायंकाळी ७.३० वाजता अर्चना संजय यांचा पर्यावरणाचा संदेश देणारा कथक नृत्याचा कार्यक्रम सादर होणार आहे. महोत्सवाच्या तिसऱ्या व अंतिम दिवशी, सोमवारी, २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता विश्व पारितोषिक वितरण सोहळा आयोजिला आहे. या वेळी मध्य प्रदेशाचे लोकायुक्त प्रकाश नवलेकर व कवी आनंद माडगूळकर आदींच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्यां तथा मुंबई अॅनिमल संस्थेच्या कविता मुखी, राहत (मुंबई-सोलापूर), पेटा सामाजिक संस्था (लंडन) व एम. एस. लतिता (तामिळनाडू) यांना विश्व पारितोषिकाने सन्मानित केले जाणार असल्याचे विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरूषोत्तम राजीमवाले यांनी सांगितले. या विश्व महोत्सवादरम्यान, दररोज पहाटे ५ ते ७ पर्यंत योगा व प्राणायाम प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.