ऑनलाइन ज्ञानकोश म्हणून ओळख असेलल्या विकिपीडियावर आपल्यापैकी कुणीही माहितीत भर घालू शकतो. इतकेच नव्हे तर आहे ती माहिती संपादितही करू शकतो. विकिपीडियाची संबंधित विषयाचे तज्ज्ञ माहिती पडताळून ती संकेतस्थळावर ठेवतात किंवा काढून टाकतात. विकिपीडियाच्या मराठी विभागातर्फे महिला दिनानिमित्त महिलांसाठी संपादनोथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे २४ तासांच्या अवधीत मराठी विकिपीडियावी तब्बल ६१२७ संपादने झाली. तर दर वर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या फोटोथॉनमध्ये तब्बल ७२१०छायाचित्रांचे दान मिळाले आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरी महिला इंटरनेटच्या वापरामध्ये पुरुषांच्या बरोबरीने असल्याचे अनेकदा विविध सर्वेक्षणांतून समोर आले आहे. समाज माध्यमांतील वापर पाहिल्यास महिला पुरुषांना मागे टाकतात. म्हणजेच फेसबुक, ट्विटरसारख्या संकेतस्थळांवर महिलांचा वावर जास्त आहे. पण गुगल प्लस किंवा लिंकडेनसारख्या संकेतस्थळांवर महिला पिछाडीवर जातात. याहीपेक्षा धक्कादायक वास्तव म्हणजे विकिपीडियासारख्या ज्ञानकोशांच्या संकेतस्थळांवर महिलांचा वावर केवळ १० टक्केच दिसतो. यामुळेच महिलांना अशा संकेतस्थळाकडे वळविण्यासाठी जागतिक पातळीवर विकिपीडियातर्फे प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून मराठी विकिपीडियातर्फे महिला दिनानिमित्त महिलांसाठी संपादनोथॉनचे आयोजन करण्यात आल्याचे मराठी विकिपीडियाचे प्रचालक प्रा. राहुल देशमुख यांनी स्पष्ट केले.
दर वर्षीप्रमाणे याही वर्षी मराठी राजभाषा दिनापासून एक आठवडा फोटोथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या सात दिवसांच्या कालावधीत यंदा सर्वाधिक ७२१० छायाचित्रांचे दान विकिपीडियाला मिळाले आहे. एक फोटो हजार शब्दांची माहिती देऊ शकतो. यामुळे ज्ञानकोश छायाचित्रांनी समृद्ध व्हावा व चांगल्या छायाचित्रकारांना लाखो लोकांपर्यंत पोहचता यावे या उद्देशाने या फोटोथॉनची सुरुवात झाली. पहिल्या वर्षी म्हणजे २०१२ मध्ये मराठी विकिपीडियाला केवळ १३८६ छायाचित्रांचे दान आले. यानंतर २०१३ मध्ये ३३४०, २०१४ मध्ये ५४२४ छायाचित्रांचे दान आले होते अशी माहितीही प्रा. देशमुख यांनी दिली.
या वर्षी प्रिया हिरागंगे या तरुणीने सर्वाधिक छायाचित्रांचे दान केले आहे. दर वर्षी जमणाऱ्या या हजारो छायाचित्रांचे वर्गीकराण करण्याचे मोठे आव्हान विकिपीडिया प्रचालकांपुढे होते. यंदा हे काम महिलांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या संपादनेथॉनमध्ये छायाचित्रांच्या वर्गीकरणाचे काम देण्याचे ठरले. त्यानुसार आवाहन करण्यात आले आणि महिलांनी भरभरूप प्रतिसाद दिल्याचे देशमुख म्हणाले. मराठीचा हा ऑनलाइन ज्ञानकोश अधिक समृद्ध करण्यासाठी सर्व नेटकरांकडून अशाच प्रकारचे नेहमी सहकार्य मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6127 editing on wikipedia on womens day