महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आजपासून सुरू झालेल्या ‘कॉपीमुक्त’ बारावी परीक्षेस सुरुवात झाली असली तरी भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्य़ातील परीक्षा केंद्रावर मातृभाषेच्या पेपरलाच ६८ विद्यार्थ्यांंना कॉपी करताना पकडण्यात आले. मंडळाने राबविलेल्या ‘कॉपीमुक्ती’साठी नागपुरातील काही परीक्षा केंद्रावर ठेवण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसला असून या संदर्भात विद्यार्थ्यांसह शिक्षक संघटनांनी आणि पालकांनी नाराजी व्यक्त केली.
सकाळी १० वाजेपासून परीक्षा केंद्रावर विद्याथ्यार्ंनी व त्यांच्या पालकांनी गर्र्दी केली होती. गेल्या दोन वर्षांपासून कॉपीमुक्त आणि तणावरहित परीक्षा घेण्याचा संकल्प मंडळाने केला होता तो यावर्षी राबविला व त्यादृष्टीने मंडळाने तयारीही केली होती. जिल्ह्य़ातील अनेक संवेदनाशील केंद्रावर बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्य़ातील केंद्रावर कॉपीचे प्रकार उघडकीस आले आहे. चंद्रपूरला १६, गडचिरोली ५, गोंदिया २२, भंडारा १७ आणि वध्र्यामध्ये ८ विद्यार्थी कॉपी करताना पकडण्यात आले. नागपुरात मात्र एकही ‘कॉपीबहाद्दर’ पकडण्यात आला नाही.  
ग्रामीण भागातील बहुतेक परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या एक दिवस आधीच म्हणजेच बुधवारी कस्टोडियनच्या स्वाधीन प्रश्नपत्रिका करण्यात आल्या होत्या. त्यामुळे कुठेही अडचणी आल्या नाही, पहिल्या दिवशी फारसे कॉपीचे प्रकार घडले नाही, असा दावा मंडळाने केला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळी परीक्षेबाबत जागृती दिसून येत आहे. जिल्ह्य़ातील विविध केंद्रावर आज भरारी पथकांनी भेटी देऊन परीक्षा केंद्राची पाहणी केली. परीक्षेच्या दरम्यान मोबाईलचा वापर करू नये, अशा सूचना विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दिल्या असताना अनेक विद्याथ्यार्ंनी मोबाईल आणले होते. मात्र, केंद्रावरील शिक्षकांनी ते ताब्यात घेतले आणि परीक्षा संपल्यानंतर त्यांना परत केले. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बंदचा परीक्षेवर काही परिणाम झाला नाही. विद्याथ्यार्ंचे नुकसान होऊ नये यादृष्टीने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी संपावर न जाता काळ्या फिती लावून काम केले.