पश्चिम उपनगरांतील प्रवाशांची वाढती संख्या आणि मागणी यांचा विचार करून परिवहन विभागाने मालाड आणि गोरेगाव येथे शेअर रिक्षांचे आठ नवीन मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गापैकी पाच मार्ग मालाड आणि तीन मार्ग गोरेगाव येथे सुरू होणार आहेत. या आठ मार्गासह रिक्षा आणि टॅक्सी यांच्या नव्या स्टँडनाही मान्यता मिळाली आहे. या नव्या मार्गामुळे पश्चिम उपनगरांतील अनेक प्रवाशांची वाहतुकीची समस्या सुटणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये पश्चिम उपनगरांतील रहिवाशांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांत मिळून एकूण ६० शेअर रिक्षांचे मार्ग आहेत.
यापैकी काही मार्ग बंद आहेत, तर नव्याने विकसित झालेल्या भागांमध्ये जाणारे शेअर रिक्षांचे मार्ग नाहीत. त्यामुळे येथे राहणाऱ्या प्रवाशांना प्रसंगी जादा भाडे देऊन प्रवास करावा लागतो. या प्रवाशांना डोळ्यासमोर ठेवून परिवहन विभागाने पश्चिम उपनगरांतील मालाड आणि गोरेगाव या दोन उपनगरांत आठ नवे शेअर रिक्षांचे मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या नव्या शेअर रिक्षांच्या मार्गासह रिक्षांचे आणि टॅक्सींचे नवीन दोन स्टँडही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे रिक्षा स्टँड कुर्ला येथे एलबीएस रोडवरील फिनिक्स मॉल आणि सीएसटी रोडवरील कपाडिया नगर येथे आहेत. ऐरोली टोल प्लाझा, मुलुंड आणि हिरानंदानी कॉम्प्लेक्स, पवई येथे दोन नवे टॅक्सी स्टँड साकारण्यात येणार आहेत.