गेल्या अनेक वर्षांपासून विठ्ठल मंदिरातील नामदेव पायरीच्या वर असलेल्या नगारखान्यातून पहाटेच्या वेळी निघणारे मंजूळ सूर बंद पडले होते. तेच सनई चौघडय़ाचे सूर भल्या पहाटे भक्त, नागरिक यांच्या कानी आता पडणार आहेत. अन् मंदिर परिसरात आजूबाजूस राहणाऱ्यांना या सुरेल सुमधुर सनई चौघडय़ाचे सूर कानी पडले.
या सनई चौघडय़ाच्या मंगल सुमधुर, सुरांची सुरुवात पुणे येथील प्रसिद्ध सनईवादक डॉ. प्रमोद गायकवाड यांच्या सनईवादनाने दि. १३ जानेवारी रोजी झाली अन् सारे वातावरणच बदलून गेले. गेल्या अनेक वर्षांपासून खंडित झालेली परंपरा पूर्ववत चालू झाली.
या कार्यक्रमास समितीचे सदस्य बाळासाहेब बडवे, प्रा. जयंत भंडारे, वसंत पाटील, कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, व्यवस्थापक एस. एस. विभुते, माजी नगरसेवक काशिनाथ थिटे पाटील, शहर निरीक्षक दयानंद गावडे, खडके आदी उपस्थित होते.
समिती कार्यरत होण्यापूर्वी विठ्ठल मंदिराच्या नगारखान्यातील सनई चौघडय़ाचे सूर निघाले, की परिसरातील लोकांना पहाटेचे ५ वाजले असे समजत. पंढरीतील मंदिर परिसर व आजूबाजूच्या लोकांचा दिवस सुरू व्हायचा तो मंदिरातून येणाऱ्या मधुर अशा सनई चौघडय़ाच्या सुरांनी. ती परंपरा अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांनी अध्यक्ष होताच चालू केली आहे.
पहाटेच्या वेळी मंदिरातून निघणारे मधुर मन प्रसन्न करणारे सनई चौघडय़ाचे सूर हे ४ कि.मी. अंतरावर राहणाऱ्या लोकांना ऐकू जाणार असून, पहाटेच्या प्रहरी कानावर पडलेल्या श्रीहरीच्या सनईच्या सुरांनी दिवसाची सुरुवात आता दररोज होणार आहे.