आर्यन हॉस्पिटॅलीटीच्या बांधकामाबाबत पंधरा दिवसात चौकशी करण्यात येईल. यासंदर्भात सर्व बाबी तपासून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी मंगळवारी टोलविरोधीकृती समितीच्या सदस्यांना दिले. आयआरबी कंपनीकडे सोपविलेल्या भूखंडावर आर्यन हॉस्पिटॅलीटीचे बांधकाम सुरू आहे. हा भूखंड बिगरशेती नसताना आणि तेथे नैसर्गिक नाला वाहत असताना केले जात असलेले बांधकामास तात्पूर्ती स्थगिती द्यावी, अशी मागणी टोलविरोधी कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीवेळी केली.    
जिल्हाधिका-यांशी झालेल्या चर्चेवेळी कृती समितीच्या सदस्यांनी अनेक मुद्दे मांडले. निमंत्रक निवास साळोखे, अ‍ॅड.गोविंद पानसरे, रामभाऊ चव्हाण, बाबा इंदूलकर, प्रकाश कोरे, पंडितराव सडोलीकर, बाबापार्टे, पद्माकर कापसे, जयकुमार शिंदे, हिंदुराव शेळके आदींनी चर्चेत भाग घेतला. दिलीप देसाई म्हणाले, बांधकामाच्या जागेतून जाणारा नाला कंपनीने सादर केलेल्या नकाशामध्ये दाखविलेला नाही. त्याची चौकशी न करताच नगररचना व महसूल विभागाच्या अधिका-यांनी परवानगी दिली आहे.
पर्यावरणाच्या नियमाचे उल्लंघन होत चालले आहे. त्यावर जिल्हाधिकारी माने यांनी कोणतेही आरोप करण्यापूर्वी पुराव्यानिशी बोलणे गरजेचे आहे, अशा शब्दांत फटकारण्याचा प्रयत्न केला. अ‍ॅड.महादेवराव आडगुळे यांनी १९०२ ते २०११ याकालावधीतील नकाशा सादर करून बांधकामाच्या ठिकाणातून नाला वाहत असल्याचे दाखवून दिले.
अद्याप ही जागा बिगरशेती केली नसल्याचे त्यांनी ५ ऑगस्टचे भूमी अधिलेख कार्यालयातील पत्राव्दारे दाखवून दिले. भारतीय दंडविधान कायद्यानुसार सामाजिक सुरक्षितता धोक्यात येत असेल तर चौकशी करावी व बांधकामास परवानगी देऊ नये, असे नमूद केले आहे. हे अधिकार जिल्हाधिका-यांना आहेत, असे निदर्शनास आणून बाबा इंदूलकर यांनी कंपनीने बांधकामाच्या ठिकाणी अतिरेकी हल्ला होऊ शकतो, असे पत्र सादर केल्याचे सांगितले.