शहरातील गजानन मंदिर ते पुंडलिकनगर भागातील अतिक्रमणे हटविताना या विभागाचे प्रमुख विठ्ठल डाके यांना शुक्रवारी दुपारी धक्काबुक्की झाली. शैलेश हॉटेलजवळील ज्यूस बार व चिकन सेंटरचे अतिक्रमण काढल्यानंतर जमावाने अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांना घेरले. या प्रकारानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर पथकाने अतिक्रमणाची कारवाई अध्र्यावर सोडली.
शहरातील गजानन मंदिर भागात अतिक्रमण काढण्यास गेलेल्या पथकाने मनसेशी संबंधित असणाऱ्या काही कार्यकर्त्यांच्या टपऱ्या काढल्या. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी मोठा जमाव जमविला. या वेळी अधिकारी व कार्यकर्त्यांत वाद झाला. या दरम्यान डाके यांना धक्काबुक्की झाली. विशेष मोहिमेंतर्गत पथकाने सिडको बसस्थानकाजवळ २२, हेडगेवार रुग्णालयाजवळ १४, सेव्हन हिलजवळील १० अतिक्रमणे हटविली.
पथक निघून गेल्यानंतर राष्ट्रवादीचे होर्डिग्स काढले गेले नाहीत, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. या अनुषंगाने महापालिका आयुक्तांनाही निवेदन देणार असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. पुढच्या आठवडय़ापर्यंत अतिक्रमण मोहीम सुरू राहणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.