गुणी कलावंत आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांच्या अपघाती निधनाने मराठी नाटय़-चित्रपट-मालिकासृष्टी आणि प्रेक्षकही हळहळले. या कलावंतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अवघे मराठी कलावंत मंगळवारी एकत्र आले. दोन्ही कलावंतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या भावनेतून अभिनेता प्रसाद ओकच्या पुढाकाराने अक्षय-आनंद निधी उभारण्यात येत असल्याचे श्रद्धांजली सभेत जाहीर करण्यात आले. आपल्या लाडक्या कलावंतांना मदत करण्यासाठी रसिकांनाही सहभागी होता येणार आहे. अपघाती किंवा अकाली निधन पावलेले अनेक कलावंत असले तरी अशा प्रकारे गुणी कलावंतांच्या प्रति आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रथमच मराठी-नाटय़-मालिकासृष्टीतील कलावंत एकत्र आले होते.
वामन केंद्रे, सचिन, मुक्ता बर्वे, विक्रम गोखले, मोहन जोशी, अशोक शिंदे, निखिल साने, प्रसाद सुर्वे यांच्यासह सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, सांस्कृतिक संचालनालयाचे आशुतोष घोरपडे आदी मान्यवरांनी आनंद अभ्यंकर-अक्षय पेंडसे यांच्या आठवणी जागविल्या. तसेच अकाली अथवा अपघाती निधन पावणाऱ्या कलावंत-तंत्रज्ञ-नाटकातील पडद्यामागचे कलावंत आदींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी कायमस्वरूपी योजना असायला हवी, असे मत व्यक्त झाले. सरकारनेही यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती विक्रम गोखले यांनी केली. ललित कला केंद्रमध्ये असतानाच्या अक्षय पेंडसेच्या आठवणी मुक्ता बर्वे, वामन केंद्रे यांनी जागविल्या. तर झी मराठीचे प्रमुख निखिल साने यांनी आनंद अभ्यंकर हे सातत्याने अकरा वर्षे ‘वादळवाट’ मालिकेपासून ते सध्या सुरू असलेल्या ‘मला सासू हवी’ या मालिकेपर्यंत झी मराठीसोबत काम करीत होते, असे सांगितले.
अतिशय सज्जन, अजातशत्रू व्यक्तिमत्त्व असलेले आनंद अभ्यंकर यांच्या अभिनयाबरोबरच माणूस म्हणूनही ते खूप चांगले होते, असे उपस्थितांपैकी प्रत्येकानेच नमूद केले. आपला जीवश्चकंठश्च मित्र गमावल्याची भावना व्यक्त करून अभिनेता अशोक शिंदे यांनी रात्रीचा प्रवास करू नका, असे भक्ती बर्वे नेहमी आम्हा दोघांना सांगायच्या. परंतु, दुर्दैवाने त्यांचे आणि आनंद अभ्यंकरचे निधनही रात्री प्रवास करताना अपघातात झाले, असे सांगितले तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले. महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी सर्व निर्मात्यांनी चित्रपटाच्या सबंध युनिटचा समूह विमा उतरविणार असल्याचे सांगितले. या श्रद्धांजली सभेला सुबोध भावे, विजय कोंडके, सतीश रणदिवे, अलका कुबल, चंद्रकांत कुलकर्णी, अजय वढावकर, अशोक हांडे, राणी वर्मा, प्रतीक्षा लोणकर, मोहन परब आदी कलावंत-निर्माते-दिग्दर्शक उपस्थित होते.
आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी अक्षय-आनंद निधी या नावाने कॉसमॉस बँक, डेक्कन जिमखाना शाखा, पुणे येथे बचत खाते (क्रमांक – ०२७०५०१०९२०६५) उघडण्यात आले आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत या खात्यात इच्छुक दात्यांना रक्कम जमा करता येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jan 2013 रोजी प्रकाशित
अक्षय-आनंद निधीची स्थापना, समूह विमाही उतरविणार
गुणी कलावंत आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांच्या अपघाती निधनाने मराठी नाटय़-चित्रपट-मालिकासृष्टी आणि प्रेक्षकही हळहळले. या कलावंतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अवघे मराठी कलावंत मंगळवारी एकत्र आले.
First published on: 25-01-2013 at 02:32 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay anand fund established will take group insurance