सार्वजनिक वितरण व्यवस्था मोडीत काढण्यासाठी एकसंधपणे होणारे प्रयत्न हाणून पाडण्याचा निर्धार करत उत्तर महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानदार, हमाल-मापारी व रॉकेल वितरकांसह विविध समविचारी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
धुळे येथे मोर्चेकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विवेक गायकवाड यांच्याकडे निवेदन दिले. ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशन आणि स्वस्त धान्य दुकानदार संघटना यांच्या वतीने धुळ्यात महात्मा गांधी पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला. बैलगाडय़ांसह हमाल, मापारीही मोर्चात सहभागी झाल्याने वाहतूक काही ठिकाणी विस्कळीत झाली.
संघटनेचे प्रांताध्यक्ष महेश घुगे यांच्या नेतृत्वाखाली धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुक्यांतून मोर्चेकरी सहभागी झाले होते. कामगार नेते एम. जी. धिवरे, बलराज मगर, भिकन वराडे, रवींद्र आघाव, शरद वराडे यांसह संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
नाशिकमध्ये किरकोळ परवानाधारकांना केरोसिन वाटपासाठी जोडलेल्या कार्डधारकांच्या धान्याचा कोटा देण्यात यावा, गॅस सिलिंडर वाटपाचे अधिकार देण्यात यावेत किंवा किरकोळ केरोसिन परवानाधारक व रास्त भाव दुकानदारांना शासकीय सेवेत नोकरी देण्यात यावी, अशा मागण्या अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानाधारक महासंघाने केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Along with kerosene sellerssmall shops owners arrenged morcha