यवतमाळसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्य़ाला विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्यासाठी यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाच्या कामाला गती द्यावी, या मागणीसाठी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लीकार्जुन खरगे यांना नुकतेच भेटले.
यावेळी शिवाजीराव मोघे यांच्यासह विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, आमदार. माणिकराव ठाकरे, वामनराव कासावार, माजी मंत्री संजय देशमुख आदी उपस्थित होते. यवतमाळ जिल्हा कापूस उत्पादक जिल्हा आहे. कापूस व्यवसायाला पर्यायाने जिल्ह्य़ाच्या शेत व्यवसायाला चालना देण्यासाठी यवतमाळ रेल्वेमार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. जिल्ह्य़ात ठिकठिकाणी औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आहेत. मात्र, मोठे उद्योग रेल्वे सुविधा नसल्याने येथे येऊ शकले नाही. रेल्वे मार्ग तातडीने सुरू झाल्यास शेती व्यवसायासह जिल्ह्य़ाच्या औद्योगिकरणालाही चालना मिळणार आहे. त्यामुळे या मार्गाला गती द्यावी, अशी विनंती शिष्टमंडळाने रेल्वेमंत्र्यांना केली. या शिष्टमंडळाने राष्ट्रीय सल्लागार समितीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्यासोबतही रेल्वेमार्गाबाबत चर्चा केली. या मार्गास गती देण्यासाठी राष्ट्रीय सल्लागार समितीने रेल्वे विभागाकडे हा मुद्दा लावून धरावा, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली असल्याचे मोघे यांनी सांगितले.