सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डान्स बारवरील बंदी उठून ते पुन्हा सुरु व्हावेत, यासाठी बारमालकांनी प्रयत्न सुरू केले असले तरी पोलिसांनी मात्र अनेक अडचणी निर्माण करून परवानगी न देण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. यापूर्वी छापा पडला आहे का किंवा पिटाअंतर्गत कारवाई झाली आहे का, याची विचारणा केली जात आहे. याबाबतचा तपशीलही पोलिसांनी तयार ठेवला असून असे अर्ज स्वीकारले तरी त्यांना परवाने न देण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात डान्स बारवरील बंदी उठण्यास विलंब लागणार आहे. डान्सबारसाठी वेगळा परवाना आवश्यक असतो. ‘चित्रपटगीतांवर नृत्य’ असा परवाना मिळावा यासाठी बारमालकांना अर्ज करावे लागतात. मुंबई पोलीस आयुक्तांचे उपायुक्त (मुख्यालय) हे परवाने देत असतात. सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविल्यानंतर मुंबईतील अनेक बारमालकांनी यासाठी अर्ज केले. परंतु त्यांना पोलिसांकडून अनेकविध कागदपत्रे मागविली जात आहे. शासनाकडून बंदी उठविण्याविरोधात फेरयाचिका केली जाणार आहे, असेही कारण सांगितले जात आहे. बारमालक पुन्हा न्यायालयात जाऊ नयेत, यासाठी अर्ज सरसकट फेटाळण्याऐवजी ते ठेवून घेतले जात आहे. चौकशीसाठी गेलेल्या बारमालकांना विलंब लागेल, अशी कारणे दिली जात आहेत. आमचे परवाने तरी फेटाळा, अशी मागणी करणाऱ्या बारमालकांना सबुरीचा सल्ला दिला जात आहे. पोलिसांनी ज्या पद्धतीने परवान्यांबाबत भूमिका घेतली आहे ती पाहता आम्हाला पुन्हा परवाने मिळतील किंवा नाही, अशी शंका आहे. एकीकडे हे परवाने नसल्यामुळे पोलिसांकडून ऑर्केस्ट्रा बारवरही कारवाई करून हैराण करून सोडले जात असल्याचा आरोप बारमालकांनी केला आहे.