अर्जुनी मोरगाव तालुक्यात गेल्या एका आठवडय़ापासून संततधार अतिवृष्टीचा १४० गावांना फटका बसला असून ८२७ कुटुंबातील ३ हजार ३०३ व्यक्ती बाधित झाले आहेत, तर तालुक्यातील पन्नास टक्क्यांपेक्षाही जास्त ३ हजार ६६६ हेक्टर शेतीचे नुकसान झालेले असून शासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार राजकुमार बडोले यांनी रविवारी नवेगावबांध येथील विश्रामगृहात आयोजित आढावा बठकीत केली आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत आमदार राजकुमार बडोले यांच्या वतीने आढावा बठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी संबंधित अधिकारी बठकीत उपस्थित होते.
आढावा बठकीत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून कार्यवाही सुरू असल्याचे तहसीलदार संतोष महाले यांनी सांगितले. त्यात तालुक्यातील अतिवृष्टीमुळे १४० गावे बाधित झाली असून ८२१ घरांचे अंशत:, तर ६ घरे पूर्णत: नुकसान व दोन जण जखमी, तर ७ जनावरे मरण पावल्याची माहिती देण्यात आली. त्यात ८२१ घरांचे २९ लाख ५२ हजार ६००, तर ६ घरांचे १ लाख ३७ हजारांचे नुकसान झाले असल्याची माहिती देण्यात आली. अतिवृष्टीने जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे १२ रस्त्यांचे नुकसान झाले असून त्यांना दुरुस्तीसाठी ५२ लाख, तर पक्क्या रस्त्यांसाठी ३ कोटी १८ लाखाचा निधी आवश्यक असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
तालुका कृषी अधिकारी पोरशेट्टीवार यांनी तालुक्यातील ३ हजार ६६६ हेक्टर शेती अतिवृष्टीने बाधित झाली असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून युद्धपातळीवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सिंधुरकर यांनी इटखेडा, केशोरी व वडसा कोहमारा ते वडसा मार्ग नुकसानग्रस्त झालेल्या असल्याची माहिती देऊन दुरुस्तीसाठी कार्यवाही सुरू आहे. तसेच जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी जगताप यांनी तालुक्यातील कान्होली, सरांडी, रिढी,गवर्रा, केशोरी, कोहळगाव व ताडगाव येथील तलाव क्षतिग्रस्त झाल्याची माहिती दिली. विद्युत विभागाच्या वतीने सहाय्यक अभियंता चतुर्वेदी यांनी महागाव-सिरोली परिसरात विद्युत खांब वाकल्याचे सांगून दुरुस्तीचे काम सुरू आहे, तर आरोग्य विभागाच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी संजय गुज्जनवार यांनी तालुक्यात कोणतीही रोगाची साथ नसून प्रत्येक गावातील पाण्याचे नमुने तपासण्याचे काम व घरोघरी जाऊन सव्र्हे करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती दिली.
आमदार बडोले यांनी आढावा बठकीनंतर नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यात भिवखिडकीजवळील गागेझरी तलावातील पाण्यामुळे तलाव परिसरातील अंदाजे ८० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. काही शेती उखडल्याने कृषी विभागाच्या वतीने त्याची वेगळी मोजणी करण्यात येणार असल्याची माहिती सांगितली. या परिसरातील पूर्ण पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर ताडगाव, झरपडा, माहुरकुडा व बोरी इत्यादी भागाची पाहणी करण्यात येऊन त्वरित कार्यवाही करून भरपाई देण्यासंबंधी सूचना आमदार राजकुमार बडोले यांच्या वतीने करण्यात आली. तसेच शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई ७ हजार ५०० रुपये प्रती हेक्टर ही शेतकऱ्यांची थट्टाच असल्याचे सांगितले. ही अल्पशी रक्कम शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शासन करत असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या विकासाच्या नावावर धंदा करणारे शासनाचाच उदोउदो करण्यात धन्यता मानत असल्याचे चित्र दिसत असून ही नुकसान भरपाई आपल्याजवळूनच देत असल्याचा आव आणत असल्याचा आरोपही आमदार राजकुमार बडोले यांनी केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Aug 2013 रोजी प्रकाशित
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १४० गावांना अतिवृष्टीचा फटका
अर्जुनी मोरगाव तालुक्यात गेल्या एका आठवडय़ापासून संततधार अतिवृष्टीचा १४० गावांना फटका बसला असून ८२७ कुटुंबातील ३ हजार ३०३ व्यक्ती बाधित झाले
First published on: 07-08-2013 at 10:13 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arjuni morgaon taluka suffers more of heavy rain fall