उस्मानाबादेत होणार प्रारंभ
राज्यातील ३०० महाविद्यालयांना सोबत घेऊन जैविक शेती वाढविण्यासाठी दि. १२पासून जैविक शेती जनजागृती अभियान सुरू करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाची विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए. एम. देशमुख यांनी माहिती दिली. यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक या लोकनेत्यांनी महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. या दोघांचेही हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने हे अभियान सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण यांच्या मते विद्यापीठ विकासाचे केंद्र बनले पाहिजे. ते शेतकऱ्यांपर्यंत गेले पाहिजे. त्यांच्या मतानुसारच सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने या वर्षी रासायनिक खत व कीटकनाशकांमुळे होणारे दुष्परिणाम शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शेती उत्पादनाकडे अधिक लक्ष देण्यात आले.
मुबलक पाणी, संकरित वाण, रासायनिक खते व कीटकनाशके उपलब्ध केल्यामुळे उत्पादन वाढले. परंतु ते शाश्वत नसल्याचे आता समोर येत आहे. रासायनिक खते, कीटकनाशकामुळे माणसाला कर्करोग, मूत्रपिंड निकामी होणे, मज्जा संस्थेवर होणारे परिणाम, मेंदू व यकृताचे विकार बळावू लागले आहेत.
 एकंदरीत रासायनिक खतांचा व कीटकानाशकांचा मानवी जीवनावर विघातक परिणाम होऊ लागला आहे. सामाजिक आरोग्याला महत्त्व देण्यासाठी, शेतक ऱ्यांना जैविक शेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी राष्ट्रीय युवकदिनी येथे विद्यापीठ उपकेंद्रातून या अभियानाला प्रारंभ होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Biological farming with three hundred colleges from tommarow