महागाई विरूध्द केंद्र शासनाच्या निषेधार्थ व डिझेल दरवाढीविरूध्द आज शनिवारी भारतीय जनता पार्टीच्यावतीने येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचे नियोजन अशोक लोहार, गणेश देसाई,पपेश भासले, श्रीकांत घुंटे, तेजस्विनी हराळे यांनी केले.    
पेट्रोल, डिझेल, गॅस व रॉकेल यांची शासनाने भरमसाठ दरवाढ केलेली आहे. यातच नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार केंद्र शासनाने डिझेलवरील नियंत्रण उठवून डिझेल दरवाढ केली आहे. म्हणूनच या दरवाढीच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हाध्यक्ष महेश जाधव, अशोक देसाई, नगरसेवक आर.डी.पाटील, संपतराव पवार, विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली निषेध रॅली काढण्यात आली होती.
मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी या प्रमुख मार्गावरून फिरून ही रॅली शिवाजी चौक येथे आली. या रॅलीमध्ये मोठय़ा प्रमाणात महिला, युवक व नागरिक उपस्थित होते. या वेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.    
या वेळी शहराध्यक्ष महेश जाधव यांनी,केंद्र शासनाच्या कुचकामी आर्थिक योजनांवर हल्ला चढवित, तसेच सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक वस्तूंची वाढ करणाऱ्या मंत्रिमंडळाचा देखील त्यांनी निषेध केला.वाढलेली महागाई, गॅस व इंधन दरवाढ हे जनतेवर आलेले संकट आहे आणि या संकटावेळी भारतीय जनतापार्टी जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी राहून त्यांच्या तीव्र भावना शासनापर्यंत पोहोचविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.    
या वेळी संपतराव पवार, विजय जाधव, संतोष भिवटे, नगरसेवक आर.डी.पाटील, श्रीकांत घुंटे, संदीप देसाई, सहदेव दळवी, नझीर देसाई, राजू माळगे, मधुमती पावनगडकर, भारती जोशी, इंदुबाई हातकर यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.