‘जोधा अकबर’ २००८ साली प्रदर्शित झाला. त्यावेळी आशुतोष गोवारीकरने आपण आगामी चित्रपट गौतम बुद्धांवर करणार असल्याची घोषणा केली होती. ‘जोधा अकबर’साठी आशुतोषने भरपूर संशोधन केले होते. ‘बुध्दा’वरचा चित्रपटही असाच मोठा आहे. हिंदी आणि इंग्रजीत तयार होणाऱ्या या चित्रपटासाठी खूप मोठय़ा प्रमाणावर संशोधन करण्याची गरज असल्याचे त्याचे म्हणणे होते.
मात्र, आता पाच वर्ष उलटूनही बुद्धाचा मुहूर्त काही आशुतोषला साधता आला नाही. आता शेखर कपूर आणि आशुतोष एकत्र आले असून मोठय़ा पडद्याऐवजी मर्यादित भागांच्या मालिकेच्या रूपात ‘बुध्दा’ छोटय़ा पडद्यावर प्रदर्शित केला जाणार असल्याची माहिती निर्माते बी. के. मोदी यांनी दिली आहे.
बुध्दा ही ‘स्पाईस स्टुडिओ’ची निर्मिती असून तो आता झी टीव्हीवर महामालिका स्वरूपात प्रदर्शित केला जाणार आहे. साधारण ५० भागांच्या या मालिकेत युवराज सिध्दार्थ ते गौतम बुध्दापर्यंत झालेला त्याचा प्रवास दाखवला जाणार आहे. ‘बुध्दा’ हा भव्यदिव्य चित्रपट का आकाराला आला नाही, याचे स्पष्टीकरण अजून कुठेही आलेले नाही. पण, बुध्दावरच्या या चित्रपटासाठी संशोधन आणि अभ्यास करण्यात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर व शेखर कपूर यांचा बराच वेळ खर्ची गेला आहे.
गौतम बुध्दांच्या आयुष्यातील अनेक ऐतिहासिक संदर्भाचा खजिनाच या दिग्दर्शक द्वयीकडे जमा झाला आहे. त्यामुळे बुध्दा साकारण्याची कल्पना मनातून जातही नाही आणि तो साकारतही नाही अशा अडचणीत सापडलेल्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना मालिकेच्या रूपाने एक  चांगला पर्याय सापडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buddha made by ashutosh govarikar will appear on small screen