महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून प्रकरणाच्या जादा तपासादरम्यान, अटक करण्यात आलेले अॅड. उदयसिंह पाटील व शंकर शेवाळे या दोघांविरोधात शुक्रवारी पोलिसांनी न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले आहे. दोषारोपपत्रानुसार या प्रकरणात उदयसिंह पाटील यांनाच मुख्य सूत्रधार ठरविण्यात आले आहे. दरम्यान, संजय पाटील खून प्रकरणातील तत्कालीन तपासी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनाही जादा तपासादरम्यान, अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी शासनाच्या परवानगीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
मलकापूर येथील डीएमएस कॉम्प्लेक्सबाहेर १५ जानेवारी २००९ रोजी महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांचा गोळय़ा घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणी कुख्यात गुंड सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या यांच्यासह सागर बाबू परमार (वय २०), हमीद रहीम शेख (वय २२), बाबासाहेब रघुनाथ मोरे (वय ३७), आशपाक मुबारक संदे (वय २८), लाजम अल्लाउद्दीन होडेकर (वय २७), सचिन लक्ष्मण चव्हाण (वय २७), संभाजी खाशाबा पाटील (वय ४२), मुदस्सर निजाम मोमीन (वय २५), यमनाप्पा भीमाप्पा दलवाई (वय २५) यांना त्या वेळी अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी केला होता. याबाबतचे आरोपपत्र येथील न्यायालयात सादर केले होते. दरम्यान, फिर्यादीने फेरतपासाची मागणी केली होती. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक अमोल तांबे हे या प्रकरणाचा जादा तपास करीत आहेत. जादा तपासादरम्यान, दोन संशयित निष्पन्न झाले. त्यामध्ये उदयसिंह पाटील व शंकर शेवाळे यांचा समावेश आहे. जादा तपासात २२ जानेवारी २०१३ रोजी शंकर वसंत शेवाळे (वय ३०, रा. शेवाळेवाडी, ता. कराड) याला अटक केली. या खटल्यातील संशयित संभाजी खाशाबा पाटील यांनी दिलेले सुपारीचे २ लाख रुपये शंकर शेवाळेने मलकापूर, जि. कोल्हापूर येथे जाऊन सलिम शेख ऊर्फ सल्या चेप्या यास दिल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. त्यानंतर ३० जानेवारी २०१३ रोजी अॅड. उदयसिंह पाटील यांना अटक करण्यात आली. खुनाचा कट रचणे, आरोपींना पैसे पुरविणे, आश्रय देणे असे आरोप उदयसिंह पाटील यांच्यावर ठेवण्यात आले. सुमारे ८० दिवसांच्या तपासानंतर उदयसिंह पाटील व शंकर शेवाळे या दोन आरोपींविरोधात अमोल तांबे यांनी या फेरतपासाचे दोषारोपपत्र शुक्रवारी न्यायालयात दाखल केले.