सोलापूर गुजराती मित्र मंडळाने यंदा अमृत महोत्सवी वर्षांत पदार्पण केले असून त्यानिमित्त येत्या शनिवारी, १२ जानेवारी रोजी या अमृत महोत्सवी वर्षांचा औपचारिक उद्घाटन सोहळा आयोजिला आहे. याशिवाय तीन दिवस विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बिपीनभाई पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुरारजी पेठेतील गुजराती मित्र मंडळाच्या सभागृहात मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षांचा उद्घाटन सोहळा गुजराती चित्रलेखाचे संपादक भरत घेलाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. नवनीत प्रकाशन संस्थेचे संचालक डुंगरशीभाई गाला यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभातच स्व.हरिभाई वेणीभाई देसाई अतिथिगृहाच्या विस्तारित कक्षाचे उद्घाटन उद्योगपती नितीनभाई देसाई (पुणे) यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी मंडळाच्या ७५ वर्षांच्या वाटचालीवर प्रकाश टाकणारी चित्रफीतही दाखविण्यात येणार असल्याचे बिपीनभाई पटेल यांनी सांगितले. याच दिवशी रात्री नऊ वाजता गुजराती लोकनृत्यांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. गुजरात राज्य युवा व सांस्कृतिक विभागाने हा कार्यक्रम पुरस्कृत केला असून यात नियती नृत्य अकादमीचे २१ कलावंत सहभागी होणार असल्याची माहितीही पटेल यांनी दिली.
मंडळाने गेल्या १४ वर्षांंपासून नेत्राभिंगारोपण शिबिरांचे आयोजन केले असून या शिबिराचा समारोप रविवारी, १३ जानेवारी रोजी होणार आहे. यानिमित्ताने ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. उमा प्रधान यांनी गेले दोन महिने नेत्र तपासणी करून १२५ नेत्ररुग्णांवर मोफत नेत्रभिंगारोपण केले आहे. सोमवारी, १४ जानेवारी रोजी किरण भट्ट दिग्दर्शित ‘चलती का नाम गाडी’ हा गुजराती विनोदी नाटय़प्रयोग सादर केला जाणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. सोलापूर गुजराती मित्र मंडळाची स्थापना १९३८ साली करण्यात आली होती. गेल्या ७५ वर्षांत मंडळाच्या संचालक मंडळाची एकदाही निवडणूक झाली नाही, याचा अभिमानाने उल्लेख करीत बिपीनभाई पटेल यांनी मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध समाज व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली. या पत्रकार परिषदेस मंडळाचे विश्वस्त केशवभाई रांभिया, प्रवीणभाई व्होरा, विजय पटेल, मुकेश मेहता, मधिलाल दंड, संदीप जव्हेरी आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jan 2013 रोजी प्रकाशित
सोलापूर गुजराती मित्र मंडळाचा अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम
सोलापूर गुजराती मित्र मंडळाने यंदा अमृत महोत्सवी वर्षांत पदार्पण केले असून त्यानिमित्त येत्या शनिवारी, १२ जानेवारी रोजी या अमृत महोत्सवी वर्षांचा औपचारिक उद्घाटन सोहळा आयोजिला आहे. याशिवाय तीन दिवस विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बिपीनभाई पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
First published on: 10-01-2013 at 08:03 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Charming programs in platinum jubilee year of solapur gujarati friend circle