माझे जीवनगाणे..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर हे ज्याप्रमाणे चतुरस्र कवी आहेत त्याचप्रमाणे मफल रंगविण्याचं त्यांचं कसबही थक्क करणारं आहे. हा आविष्कार पाहण्याचं भाग्य तुम्हा-आम्हाला लाभलं, मात्र पुढच्या पिढीलाही त्यांची महती कळावी, या ध्यासाने पछाडलेल्या सांगलीतील दंतशल्य विशारद डॉ. बाळकृष्ण चतन्य या त्यांच्या चाहत्याने पाडगावकरांचा जीवनप्रवास चित्रित करण्याचा घाट घातला व तो सुफळ संपूर्ण झालाही. ‘चैतन्य मल्टिमीडिया’ने ‘माझे जीवनगाणे’ हा दोन डिव्हीडींचा संच रसिकांपुढे सादर केला आहे. पाडगावकरांचे जुने स्नेही देवदत्त सोहोनी यांचे बहुमोल सहकार्य या डिव्हीडींसाठी लाभले आहे.
या डिव्हीडींमध्ये केवळ मुलाखत व काव्यवाचनच नाही तर या कवीचा चढत गेलेला आलेख, सुहृदांच्या आठवणी, समकालीन कलाकारांचे किस्से आदींचा समावेश आहे. एकूण चार तासांच्या या दोन डिव्हीडी पाहताना अक्षरश: दंग व्हायला होते. प्रसिद्ध निवेदक भाऊ मराठे यांनी पाडगावकरांशी संवाद साधला आहे. पाडगावकर मुळातच दिलखुलास असल्याने त्यांची प्रसन्नता कायम ठेवण्याचे तसेच बोलण्याच्या ओघात निसटलेले धागे पुन्हा जोडण्याचं काम मराठे यांनी खुबीनं केलं आहे.
आईला कविता करण्याची आवड होती, तिच्या ट्रंकेत नेहमी केशवसुत, गडकरी आणि बालकवींचे कवितासंग्रह असत, असं पाडगावकर सांगतात तेव्हा या प्रतिभेचा उगम कोठून झाला, हे लक्षात येतं. यातील अनेक आठवणी अतिशय हृद्य आहेत. ते अवघे १४ वर्षांचे असताना त्यांची कविता वाचून उद्या ह्याच्या नावाचं नाणं पडणार आहे, अशी बा. भ. बोरकरांनी दिलेली प्रशस्ती असो किंवा ‘जिप्सी’ हा काव्यसंग्रह वाचल्यानंतर आता मी कविता करणं थांबवलं तरी चालेल ही कुसुमाग्रजांनी दिलेली दाद असो, हे पाहताना पाडगावकरांची महती नव्याने अधोरेखित होते. ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनी आपला गौरव काव्यक्षितिजावरचा नवा तारा असा केला होता, हे सांगताना पाडगावकर आजही मोहरून जातात, तर कवितेशिवाय कोणत्याही प्रकारात व्यक्त होऊ नका, हा कवी ना. घ. देशपांडे यांचा सल्ला आपण शिरोधार्य मानला हे ते आवर्जून सांगतात. कवितेची पहिली ओळ सूचल्यानंतर तिचं बोट धरून मी पुढे जातो, ती कल्पनाच माझी कविता पूर्ण करते, अशा प्रकारे ते आपल्या सृजनाचं रहस्य सांगतात. माझ्या कवितेचा पहिला श्रोता माझी बायकोच असते, असंही ते नमूद करतात.
वसंत बापट आणि िवदा करंदीकर यांच्यासोबत जमलेल्या गट्टीच्या आठवणींनाही यात उजाळा मिळणं अनिवार्यच. आम्हा तिघांचा कंपू जमला, चांगल्या कवितांचा प्रसार करण्यासाठी खेडोपाडीही फिरलो, सख्ख्या भावंडांप्रमाणे आमचं परस्परांवर प्रेम होतं, अशा शब्दांत त्यांनी हे मत्र उलगडलं आहे.
कवी शंकर वैद्य, संगीतकार यशवंत देव, साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर आदींची मनोगतेही यात आहेत. आयुष्याच्या या टप्प्यावर मला कोणतीही खंत नाही, अजूनही लोकांचं एवढं प्रेम मिळतंय याविषयी पाडगावकर आनंद व्यक्त करतात. या डिव्हीडींसाठी इच्छुकांना riyazmala@gmail.com या ई-मेलवर अथवा ९३७२१४७००९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

बहुआयामी गोपू
नाटककार, लेखक, कवी, समीक्षक, संपादक, विचारवंत तसेच चीन विषयावरचे राजकीय तज्ज्ञ अशा अनेक प्रांतांत लीलया विहार करणाऱ्या गोिवद पुरुषोत्तम ऊर्फ गो. पु. देशपांडे यांच्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाचा वेध ‘बहुआयामी गो.पु.’ ह्या डिव्हीडीमध्ये घेण्यात आला आहे. ‘दर्शन’ निर्मित या डिव्हीडीची संकल्पना आणि निर्मिती अनिल सडोलीकर व डॉ. आशुतोष दिवाण यांची आहे.
कडवे मार्क्‍सवादी असणाऱ्या गो.पु. यांची काही मते मात्र त्यांच्या समविचारी मंडळींपेक्षा खूपच वेगळी आहेत, हे यात दिसून येतं. धार्मिक आणि दार्शनिक परंपरा या गंभीरपणे दखल घेण्याजोग्या आहेत, धर्माविषयीच्या अज्ञानातून त्यावर टीका करणे योग्य नाही. हा त्यांचा विचार वेगळा ठरतो. तसंच मार्क्‍सचा अभ्यास करताना जाणवलं की समाजाबाबतचं चिंतन केवळ मानवतावादी असून चालत नाही तर त्यात विज्ञाननिष्ठा लागते, तुमचं शोषण होतं एवढंच मार्क्‍स सांगत नाही तर त्याचा प्रतिकार करता येतो, हेही सांगतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विरोधकांशी दोन हात करायचे असतील तर आधी त्याची बलस्थानं ओळखावी लागतात, हेही मार्क्‍स सांगतो.. ही गोपुंची निरीक्षणं त्यांच्यातील चिंतनशील लेखकाचं दर्शन घडवतात. गोपुंचा मार्क्‍सवाद हा कधीच पोथीनिष्ठ नव्हता तर सर्जनशील होता, त्यावर अभंग निष्ठा होती, अशी प्रशस्ती प्रा. राम बापट यांच्यासारख्या विचारवंताने यात दिली आहे. मराठी रंगभूमीवर मलाचा दगड ठरलेल्या ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ या आपल्या नाटकाच्या लेखनामागचा विचार गोपुंनी यात मांडला आहे. आपल्याकडील राजकीय विचारधारेची समीक्षा होण्याची गरज आहे, असं वाटल्याने हे नाटक लिहिलं, असं ते सांगतात. डॉ. श्रीराम लागू, भालचंद्र नेमाडे, सतीश आळेकर, प्रा. सदानंद मोरे यांनी या नाटकाच्या आठवणी जागविल्या आहेत. अतिशय वेगळ्या फॉर्ममध्ये असणारं हे नाटक वाचताक्षणीच मला आवडलं व ते मला करायला द्या, अशी विनंती मी गोपुंना केली, असं डॉ. लागू सांगतात तर हे नाटक पाहिलं तेव्हा गोपु आपले मित्र असल्याचा अभिमान वाटला, असं मनोगत नेमाडे व्यक्त करतात. हे नाटक चर्चात्मक चच्रेची अ‍ॅलर्जी असलेल्यांनी या नाटकाच्या वाटेला जाऊच नये, असं आपल्या खास शैलीत पं. सत्यदेव दुबे सांगताना दिसतात. अमृता सुभाष, ज्योती सुभाष, दिलीप देशपांडे, विकास देशपांडे, अरुणा सांब्राणी, प्रा. अश्विनी देशपांडे, सुधन्वा देशपांडे, केतकी वर्मा या त्यांच्या कुटुंबीयांच्या मनोगतांमुळेही गोपुंचं चतुरस्र व्यक्तिमत्त्व उलगडत जातं. गोपुंच्या ‘सत्यशोधक’ आणि ‘अंधारयात्रा’ या नाटकांतील प्रवेशही यात पाहण्यास मिळतात.

मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cinema songs