शहरातील संजयनगर-बायजीपुरा भागात २४ वर्षांच्या तरुणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना गुरुवारी रात्री घडली. जिन्सी पोलीस ठाण्यात राम बोडखे, प्रतीक चंचलानी, संदीप सरकटे, अनिल वाजेकर या चौघांवर बलात्काराचा गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. दरम्यान, आरोपीमधील प्रतीक चंचलानी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. तर मानसी देशपांडे खून व बलात्कार प्रकरणात निर्दोष सुटलेला आरोपी राम बोडखे याचाही या गुन्ह्य़ात समावेश आहे. वैद्यकीय अहवालातही तरुणीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले असल्याचे पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया यांनी सांगितले.संजयनगर-बायजीपुरा भागात गुरुवारी रात्री अकराच्या दरम्यान भावाची वाट पाहत उभ्या असलेल्या तरुणीला चौघांनी पळवून नेले व  तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरुणीने आरडाओरड केल्यानंतर शेजारचे लोक जागे झाले. एका आरोपीला काही नागरिकांनी पकडले. तिघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी सकाळी तिघांना अटक केली. ज्या गाडीवरून आरोपी आले होते, त्याची तोडफोडही करण्यात आली.  तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली, तर बोडखे याला लोकांनी बेदम मारहाण केल्याने तो जबर जखमी झाला. पोलिसांनी त्याला उपचारार्थ घाटी रुग्णालयात दाखल केले.