बाल कामगारासंदर्भात सरकारने अनेक कडक कायदे केले असतानाही कॅबिनेट मंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रविभवनात बाल कामगारांकडून स्वच्छता आणि इतर कामे करवून घेतली जात असल्याचे दिसून आले आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला जवळपास वीस दिवस शिल्लक असून कॅबिनेट मंत्र्यांची निवासाची व्यवस्था असलेला रविभवन परिसरातील कॉटेज सुसज्ज करण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून रंगरंगोटी आणि डागडुजीचे काम रात्रंदिवस सुरू आहे. प्रत्येक कॉटेजमध्ये कुठेही कमतरता राहू नये यासाठी सार्वजानिक बांधकाम विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. रविभवनाचे काम ज्या कंत्राटदाराकडे देण्यात आले आहे त्याने जवळपास ५० ते ६० कामगार कामावर ठेवले असून त्यांना वेगवेगळी कामे देण्यात आली आहे. त्यात काही बाल कामगारांचा समावेश असल्याचे दिसून आले. काही कॉटेजसमध्ये सामान उचलण्याचे काम असो की साफसफाईचे काम असो ते बाल कामगारांकडून केले जात असल्याची माहिती मिळाली. रविभवनात एरवी बैठका आणि मंत्र्यांची ये जा असल्याने हा परिसर नेहमीच मंत्र्यांची बडदास्त ठेवण्यासाठी सज्ज असतो. काही कॉटेजची अधिवेशनापूर्वी दुरस्ती केली जात असून त्यावर लाखो रुपये खर्च केले जातात. दोन दिवसापूर्वी इमारत क्रमांक ४ मध्ये साफसफाई आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचे काम सुरू होते. पहिल्या माळ्यावरली काही खोल्यांचे काम सुरू असताना त्या खोलीतील मलबा खाली टाकल्यानंतर तो उचलण्याचे काम लहान मुले करीत होती. काही मुले कॉटेजच्या परिसरात असलेले गवत काढण्याचे काम करीत होते. त्या मुलांना एका प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी काय काम करतो? असे विचारले असता गवत काढण्याचे काम करीत त्याने असल्याचे सांगितले. कोणी कामाला लावले? असे विचारले असता त्याने नाव सांगण्यास नकार देत तेथून पळ काढला. पाठोपाठ सर्व मुले परिसरातून निघून गेली. रविभवनच्या रंगरंगोटी आणि डागडुजीसाठी सार्वजानिक बांधकाम विभागातर्फे निविदा काढल्या जातात, मात्र एखाद्या कंत्राटदाराकडे काम दिल्यावर त्या कंत्राटदाराच्या कामाबाबत कुठलाच आढावा घेतला जात नसल्याचे दिसून येते.
रविभवन परिसरात २३ निवासस्थाने असून याठिकाणी मंत्रिमंडळातील सर्व कॅबिनेट मंत्र्यांची व्यवस्था ठेवण्यात येते. हैदराबाद हाऊसमध्ये सचिवालय असले तरी अनेक मंत्री या ठिकाणी बसूनच महत्त्वाची कामेकरीत असतात. अधिवेशनाच्या काळात रविभवन परिसरात मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. सर्व कॉटेजेसची रंगरंगोटी करण्यात आली असून फर्निचर आणि सर्व व्यवस्था सुरळीत करण्यासाठी कामगार रात्रंदिवस काम करीत आहेत. रविभवनाचे काम कोणत्या कंत्राटदारांकडे देण्यात आले? असे सार्वजानिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता बघावे लागेल, असे उत्तर मिळाले.