पालिकेतील सत्तेचे सुकाणू शहर विकास आघाडीकडे असताना नगराध्यक्षपदाच्या खांदेपालट प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्याने आघाडीत सुंदोपसुंदीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवसेना, काँग्रेस व मनसे यांचा समावेश असलेली शहर विकास आघाडी आणि प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस यांना प्रत्येकी १३ जागा प्राप्त झाल्या होत्या. अपक्ष सुरेश बडगुजर यांनी आघाडीच्या पारडय़ात तुळशीपत्र टाकल्याने आघाडीचे नगरसेवक व काँग्रेसचे नेते अॅड. संदीप पाटील नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले होते. दरम्यान, पालिकेवर झेंडा फडकाविण्यासाठी झालेल्या पडद्यामागील हालचालींमध्ये अपक्ष नगरसेवक बडगुजर यांना अडीच वर्षांच्या पहिल्या टप्यातील सव्वा वर्षांसाठी नगराध्यक्षपद द्यावे, त्यांचा निवडणूक खर्च तसेच त्यांनी सांगितलेल्या एका व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक म्हणून घ्यावे यासारख्या काही तडजोडी झाल्याची चर्चा होती. बडगुजर यांनी सूचित केलेले स्वीकृत नगरसेवकपदाचे दावेदार महेंद्र धनगर यांची निवड होता होता वाद न्यायप्रविष्ट झाला आहे.
नगराध्यक्षपदाची खांदेपालट मार्चमध्ये होणे अपेक्षित होते. परंतु मे महिना उलटत आला तरी विद्यमान नगराध्यक्ष अॅड. संदीप पाटील हे पदाचा राजीनामा देत नसल्याने शहर विकास आघाडीत अस्वस्थतता आहे. आघाडीचे नेते माजी आमदार कैलास पाटील व शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी अॅड. पाटील यांच्या राजीनाम्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यांचे निकटवर्तीय व उद्योगपती अॅड. संजय जैन हे नगराध्यक्षपदाचे दावेदार बडगुजर यांचे सद्यस्थितीत पाठीराखे असल्याने आघाडीतील शिवसेना खांदेपालटासाठी उत्सुक आहे. काँग्रेस मात्र ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्यास अनुकूल आहे. यामुळे पालिकेतील राजकारण ढवळून निघाले आहे.
अॅड. पाटील आगामी निवडणुकीत काँग्रेसकडून तिकिटासाठी दावेदार मानले जात असल्याने त्यांना अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करू देण्याचे काही जणांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र आघाडीतील कलगीतुरा पाहण्यात व्यस्त आहे.
खांदेपालटात राष्ट्रवादी हिसका दाखविण्याची सुप्त तयारी करीत असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादीला झुलविणाऱ्या बडगुजरांना नगराध्यक्षपद मिळू देण्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd May 2013 रोजी प्रकाशित
चोपडा पालिकेतील सत्ताधारी आघाडीत सुंदोपसुंदी
पालिकेतील सत्तेचे सुकाणू शहर विकास आघाडीकडे असताना नगराध्यक्षपदाच्या खांदेपालट प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्याने आघाडीत सुंदोपसुंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना, काँग्रेस व मनसे यांचा समावेश असलेली शहर विकास आघाडी आणि प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस
First published on: 22-05-2013 at 08:47 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conflicts in choda corporation