९७व्या घटना दुरुस्तीमुळे सहकार संस्थांना स्वायत्ता प्राप्त झाल्याने कार्यकर्त्यांना आदर्शाचा प्रारंभ स्वत:पासून करावा लागेल, असे मत नाशिकचे ज्येष्ठ समाजसेवक पां. भा. करंजकर यांनी व्यक्त केले.
जळगाव जिल्हा सहकार मंडळाच्या सहकारी शिक्षण प्रशिक्षण दैनंदिनीचा प्रकाशन समारंभ नुकताच करंजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
या वेळी मार्गदर्शन करताना करंजकर यांनी सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचारासह विविध मुद्दय़ांना स्पर्श केला. प्रारंभी जिल्हा मंडळाचे ज्येष्ठ अध्यक्ष बापूराव देशमुख यांनी दैनंदिनीतील प्रशिक्षण कार्याची माहिती दिली.
सहकारातील भ्रष्टाचारातून अनेक संस्था डबघाईस आल्या आहेत. ही सत्यता लक्षात घेऊन सहकार चळवळ वाचवली पाहिजे, असे विचार उपकुलगुरू डॉ. के. डी. पाटील यांनी व्यक्त केले. मंडळाचे उपाध्यक्ष ना. वि. चौधरी यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रदीप देशमुख यांनी आभार मानले. कार्यकारी अधिकारी डी. जी. रोहणकर यांनी सूत्रसंचालन केले.
जिल्ह्य़ातील सहकारी संस्थांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.