मुंबईमधील अनेक उजाड उद्यानांचे उकिरडे बनले आहेत. जुगारी आणि गर्दुल्ल्यांचे ते अड्डे बनले आहेत. उद्यानांच्या या अवस्थेकडे नगरसेवकांचे लक्ष नाही. मात्र उद्यानांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांच्या बारशाची घाई काही नगरसेवकांना लागली आहे. काही नगरसेवकांनी उद्यानांच्या नामकरणाचा विडाच उचलला आहे. नगरसेविकाही त्यात मागे नाहीत. या बारशामागे नेमके दडलंय काय, असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडला आहे. आगामी निवडणुकांचा कालखंड लक्षात घेतला तर या बारशांची घाई का हे लक्षात येऊ शकते.
मुंबईमध्ये विकासाचे वारे वाहू लागताच मोकळ्या जागा दिसेनाशा होऊ लागल्या. उरलीसुरली उद्याने आणि मैदानांचे उकिरडे बनले अथवा जुगारी आणि गर्दुल्ल्यांचे अड्डे बनले. स्वाभाविकच लहान मुले आणि त्यांचे पालक, विशेषत: महिला या उद्यानांकडे फिरकेनाशा झाल्या. अशा उद्ध्वस्त उद्यानांकडे पालिका प्रशासनाबरोबरच नगरसेवकांचेही दुर्लक्ष झाले आहे.
या पाश्र्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या बाजार आणि उद्यान समितीच्या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेवर सादर करण्यात आलेल्या २० प्रस्तावांपैकी १५ प्रस्ताव उद्याने आणि मैदानांच्या बारशाचे आहेत. बारशाचे प्रस्ताव सादर करणाऱ्यांमध्ये नगरसेविका संध्या दोशी आघाडीवर आहेत. तशी शिफारस संध्या दोशी यांनी केली आहे.
अंधेरी पूर्व येथील मोगरापाडा येथे उद्यानासाठी एक आरक्षित भूखंड असून त्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा आग्रह नगरसेवक अनंत (बाळा) नर यांनी धरला आहे. त्याचबरोबर नगरसेवक योगेश भोईर, प्रकाश दरेकर, प्रवीण छेडा, नगरसेविका संध्या यादव, अजंता यादव यांनीही आपापल्या विभागातील उद्याने आणि मैदानांच्या बारशासाठी शिफारशी केल्या आहेत. इतकेच नव्हे तर उद्यानांसाठी आरक्षित असलेल्या काही भूखंडांवर वृक्षवल्ली बहरण्यापूर्वीच त्यांचे बारसे करण्याचाही घाट काही नगरसेवकांनी घातला आहे.
यापूर्वीही बाजार आणि उद्यान समितीमध्ये उद्याने, मैदानांच्या बारशासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले होते. मात्र प्रशासनाकडे ते धूळ खात पडले आहेत. उद्याने आणि मैदानांच्या बारशाच्या २१ प्रस्तावांवर प्रशासनाने अहवालच सादर केलेला नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी बारशाचा बार उडवून देण्याचा नगरसेवकांचा विचार आहे. त्यामुळे समितीने मंजूर केलेल्या, परंतु त्यावर कोणतीही कारवाई न झालेल्या प्रस्तावांची जंत्री सादर करण्याचा तगादा नगरसेवकांनी प्रशासनाच्या मागे लावला आहे.
काही उद्यानांच्या बारशांचे प्रस्ताव असे..
बोरिवलीतील गोराई सेक्टर १ मधील उद्यानास क्रांती उद्यान, गोराई, चारकोप सेक्टर ५ मधील उद्यानास शिवतीर्थ उद्यान, गोराई चारकोप सेक्टर ३ मधील थीम पार्कचे श्री नागदेव ओंकारेश्वर मनोरंजन पार्क, गोराई, चारकोप सेक्टर ५ मधील उद्यानास त्रिवेणी उद्यान असे नाव देण्याचे प्रस्ताव संध्या दोशी तर अंधेरी, मोगरापाडातील उद्यानास डॉ.बाबासाहेब आंबेडकर असे नाव देण्याचा प्रस्ताव नगरसेवक अनंत नर यांनी दिला आहे.