आर्थिक क्षेत्रात नावाजलेल्या व राज्यात शाखांचे जाळे उभारणाऱ्या अकोला अर्बन को.ऑप .बँकेत तत्कालीन कार्यकारी अधिकारी ओ.टी.राठी यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या कोटय़वधीच्या घोटाळ्याने बँक व्यवस्थापनाला हादरा बसला असला तरी राठी यांच्या कारनाम्याची माहिती कानावर येत असतानाच बँक व्यवस्थापनाने पर्यायी पावले उचलल्यामुळे बँकेचे व्यवहार व्यवस्थित राहिले आहेत. राठी यांनी केलेला घोटाळा ५० कोटीच्या वर जाण्याची शक्यता असून येत्या काही दिवसात आणखी पोलीस तक्रोरी होणार आहेत, अशी माहिती बँक सूत्राकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान, पोलिसांचे पथक कोठारी बंधू व ओ.टी. राठी यांना पकडण्यासाठी मुंबई व पुण्याला रवाना झाले आहे.
कार्यकारी अधिकारी ओ.टी.राठी यांनी संचालक मंडळाची कुठलीही परवानगी न घेता वा संचालक मंडळाला न सांगता १८ कोटीच्या कर्जाचे नियमबाह्य़ वाटप केले. १० वर्षांंपूर्वीचे हे प्रकरण आहे, असे सांगण्यात येते. राठी यांनी अजून काय काय घोटाळे केले ते आता तपासून पाहिले जात आहेत. घोटाळ्याचा हा आकडा ५० कोटीच्या वर जाण्याची शक्यता आहे. याबाबत व्यवस्थापकीय संचालक शंतनू जोशी म्हणाले की, बँकेचा १३५ कोटींचा राखीव निधी आहे. रिझर्व बँकेच्या नियमानुसार हा निधी ठेवण्यात आला असल्याने बँकेचे ठेवीदार व गुंतवणूकदारांना घाबरण्याचे काहीच कारण नाही. ३१ मार्चला बँकेच्या १७०५ कोटींच्या ठेवी होत्या. त्यात आता आणखी वाढ झाली आहे. बँकेचे ४७ कोटींचे समभाग भांडवल आहे. शिवाय, रिझर्व बँकेच्या नियमानुसार व्यवहार होत असल्याने बँकेला कुठलाही धोका नाही. ठेवीदार व गुंतवणूकदारांची मालमत्ता पूर्णपणे सुरक्षित आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर आम्ही त्याचा अहवाल रिझर्व बँकेला सादर केला असून त्यांच्या मार्गदर्शनानुसारच कायदेशीर कारवाई करू.  नंदकिशोर उपाख्य नंदू कोठारी व त्यांच्या बंधुने २००२ मध्ये अर्बन बँकेकडून जवळपास साडेतीन कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या कर्जापोटी कोठारी यांनी बँकेकडे साडेचार कोटीची मालमत्ता गहाण ठेवली होती. नंदू कोठारी यांनी कर्ज परत करण्यापूर्वीच बँकेकडे गहाण ठेवलेली मालमत्ता सोडविली आणि ती परस्पर विकूनही टाकली. यासाठी त्यांना ओ.टी. राठी व एक कनिष्ठ अधिकारी प्रसाद यांनी मदत केली. बँके ने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत ही बाब पूर्णत: नमूद केली आहे. साधारणत: मार्चच्या दरम्यान बँकेच्या संचालक मंडळाने उद्योग समूह क्षेत्रातील सल्लागार तज्ज्ञांकडून बँकेच्या व विशेषत: राठी यांनी केलेल्या घडामोडींची तपासणी केली असता त्या तज्ज्ञास मोठी गडबड आढळून आल्यानंतर त्यांनी कार्यकारी अधिकारी राठी यांना ताबडतोब निलंबित करण्याचा सल्ला दिला होता, असे सांगितले जाते. परंतु, त्यामुळे बँकेच्या प्रतिष्ठेवर परिणाम होईल, अशी भीती वाटून बँकेने लगेच राठींवर कारवाई न करता प्रथम बाजारपेठेची माहिती आणि कल जाणून घेतला व त्यानंतरच या घोटाळयातील कोठारी बंधू, राठी आणि प्रसाद यांची तक्रार पोलीस ठाण्यात केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२० वर्षांत अनेक बँकांना गंडा
घोटाळेबाज कोठारी बंधूंनी गेल्या २० वर्षांत अनेक बँकांना गंडा घालून चांगल्या स्थितीत असलेल्या बँका बुडविल्याचे उघडकीस आले आहे. जिनींग प्रेसिंगचा मोठा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला नियमबाह्य़ मोठय़ा रकमेचे कर्ज देण्याची योजना करून कोठारी यांनी शारदा बँक बुडविली होती. आपल्या तथाकथित प्रतिष्ठेच्या नावावर बँकांना गंडविण्याची योजनाच कोठारी बंधुंनी अमलात आणल्याचे आता उघड झाले आहे. मा शारदा बँक घोटाळा प्रकरणी तेव्हा त्यांना पोलिसांनी अटक केली होती. शहरात बँकांना गंडा घालणारी व्यापाऱ्यांची एक टोळी असून संबंधित बँकांचे बडे अधिकारी अशा टोळीला संरक्षण देत असल्याचे सांगितले जात आहे. अशा सर्व बँकांचे अंकेक्षण करणारे कोण आहेत व ते या घोटाळ्यावर पांघरूण घालत आहेत काय, हे सुद्धा बँक व्यवस्थापनाने तपासून पाहणे आवश्यक झाले आहे.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corruption in akola urban bank