खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या व सध्या पॅरोलवर सुटलेल्या फरारी आरोपीकडून जमीन खरेदीचा प्रताप करणाऱ्या पोलीस निरीक्षक देविदास ढोले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या बदलीचे धाडस दाखवले असले, तरी त्यांच्या काळात झालेल्या सर्व गुन्ह्यांच्या तपासाची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनी केली.
राजकीय वरदहस्त व वरिष्ठांची मर्जी या बळावर निरीक्षक ढोले यांनी एका फरारी कैद्याकडून जमीन खरेदी केल्याचे प्रकरण सहायक अधीक्षक पंकज देशमुख यांनी उघडकीस आणले. या बाबत वृत्त प्रसिद्ध होताच ढोले यांच्या बदलीचे आदेश निघाले. ढोले यांची नियंत्रण कक्षात बदली झाली. श्रीधर पवार यांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचा कार्यभार देण्यात आला. ढोले यांनी जमीन खरेदी केल्याचे प्रकरण उघड करताना सहायक अधीक्षक देशमुख यांच्या पथकाने एका फरारी आरोपीच्या मुसक्याही ढोले यांच्या घरासमोरच आवळल्या.
जिल्ह्यात शिक्षा झालेले जे फरारी आरोपी आहेत, त्यांना ‘अभय’ देण्याचे काम स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व त्या त्या पोलीस ठाण्यांतील काही कर्मचारी करीत होते, असे निष्पन्न झाले आहे. ढोले यांच्या गरप्रकाराची चौकशी करून सहायक अधीक्षक देशमुख यांनी वरिष्ठांना अहवाल दिल्यानंतर अतिरिक्त अधीक्षक तानाजी चिखले या प्रकरणी चौकशी करणार आहेत.
दरम्यान, फरारी कैद्याकडून जमीन खरेदी केल्याचे प्रकरण गृह विभागाने गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणी माहिती मागवण्यात आली असून, सामान्य प्रशासन विभागाचे पोलीस महासंचालक उपाध्याय यांच्यामार्फत चौकशी सुरू झाल्याचे सांगण्यात आले. एरवी सामान्य कर्मचारी, अधिकाऱ्यांबाबत कर्तव्यदक्षता दाखवणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणात मात्र अजून कोणत्याही हालचाली सुरू केल्या नाहीत. ढोले यांच्या संपत्तीची चौकशी करावी, तसेच त्यांच्या कारकिर्दीत घडलेल्या व त्यांनी तपास केलेल्या प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कौडगे यांनी केली.
संग्रहित लेख, दिनांक 24th Dec 2013 रोजी प्रकाशित
सर्वच गुन्ह्य़ांच्या तपासाबाबत सेनेचे निवेदन
खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या व सध्या पॅरोलवर सुटलेल्या फरारी आरोपीकडून जमीन खरेदीचा प्रताप करणाऱ्या पोलीस निरीक्षक देविदास ढोले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 24-12-2013 at 01:33 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime inquiry statement of shiv sena nanded