पूर्णवाद शिक्षण प्रसारक मंडळ व पूर्णा येथील गुरू बुध्दीस्वामी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (शनिवार) पारनेर येथे अखिल भारतीय दर्शन तत्वज्ञान परिषदेचे तीन दिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष गुणेश पारनेरकर यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रात तब्बल १४ वर्षांनंतर हे अधिवेशन होत आहे.
पाश्चात्य तत्वज्ञानाचा हिंदी भाषेतून प्रचार व प्रसार करण्यासाठी सन १९५४ मध्ये अखिल भारतीय दर्शन परिषदेची स्थापना झाली. या संस्थेचे १ हजार ६०० आजीव सभासद आहेत. या अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती संभाजीराव म्हसे यांची निवड करण्यात आली आहे. अधिवेशनाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते होणार असून विष्णू महाराज पारनेरकर आणि गुरूबुद्घी स्वामी शिक्षण प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदीकेश्वर शिवाचार्य महास्वामी यावेळी उपस्थित राहणार आहेत. डॉ. वेदप्रकाश मिश्रा हे उद्घाटन सोहळयाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. अधिवेशनाच्या शैक्षणिक सत्रात तर्क आणि ज्ञानमिमांसा, निती दर्शन, धर्ममिमांसा, तत्वमिमांसा आणि समाज दर्शन या विषयांचा समावेश आह़े  कार्ल मार्क्‍स आणि समकालीन आव्हाने व पूर्णवाद या विषयांवरही परिसंवाद होणार आहेत.  अधिवेशनाचा समारोप दि. १४ ला आमदार विजय औटी यांच्या अध्यक्षतेखाली होईल. अखिल भारतीय दर्शन परिषदेचे अध्यक्ष डॉ. एस. पी. दुबे, महामंत्री डॉ. अंबिका दत्त शर्मा आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाच्या सभापतीपदी बी. एन. मंडख, विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ. रिपुसूदन, तर अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मीकांत पारनेरकर, डॉ. एस. जी. पारळकर, प्रागूलजारसिंह राजपूत, प्रा. आर. एस. पाटील, ई. आर. मठवाले, एस. एस. आबोटी हे परिश्रम घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Darshan philosophy council conference from today in parner